Gajanan Maharaj : श्री महाराजांनी बाबांना भवसागरातून पार लावले

Share
  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

हा प्रसंग माझे वडील आजारी असताना घडलेला आहे. वर्ष २००३. वडील आजारी पडल्यामुळे त्यांना दवाखान्यात अॅडमिट केले होते. सर्व तपासण्या आणि उपचार सुरू होते. अकोला येथील तज्ज्ञ डॉक्टरांची शुश्रूषा सुरू होती. वयोमानपरत्वे वडिलांची सोडियम व पोटॅशियम लेवल कमी-जास्त होणे सुरू होते. शुगर होतीच. अशा परिस्थितीत त्यांना भान राहत नव्हते, मधूनच ग्लानीत जायचे. दवाखान्यात दहा – अकरा दिवस होऊन गेले होते. नातेवाइकांपैकी एका ज्येष्ठ नातेवाइकांनी एकदा बाबांना नूरॉलॉजिस्टकडे घेऊन जावे, असे सुचविले.

नागपूर येथे एका अनुभवी डॉक्टरांकडे वडिलांना नेण्याचे ठरले. चौकशी केली असता सर्व नूरॉलॉजिस्ट डॉक्टर्स कुठल्या तरी कॉन्फरन्सकरिता मुंबई येथे गेले आहेत, असे कळले. त्यामुळे नागपूर येथे न जाता बाबांना औरंगाबाद येथे नेण्याचे ठरले. त्यानुसार औरंगाबाद येथील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये वडिलांना नेऊन अॅडमिट केले. दवाखान्यात गेल्याबरोबर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. वेगवेगळ्या तपासण्या सुरू झाल्या. वडिलांची तब्येत ठीक नव्हतीच, त्यामुळे ते ग्लानीमध्ये होते.

आमचा एक जवळचा मित्र औरंगाबाद येथे होता. काही वर्षांपूर्वी तो ह्या औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये नोकरी करीत असे (प्रशासकीय अधिकारी). त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या पुष्कळ ओळखी होत्या. त्याच्या मदतीमुळे वडिलांना दवाखान्यात दाखल करण्याकरिता पुष्कळ मदत झाली. माझे व माझ्या भावाचे मधूनमधून आयसीयूमध्ये येणे – जाणे सुरू होते. आत गेलो तेव्हा वडील थंडीने कुडकुडत असल्याचे दिसले. तसे मी तेथील नर्सच्या लक्षात आणून दिले. त्यांनी लगेच बॉडीटेम्प्रेचर वगैरे तपासले. टेम्प्रेचर खूपच वाढले आहे, असे त्यांनी मला सांगितले व बाहेर जाण्यास सांगितले. मी बाहेर आलो, पण मन मात्र आयसीयूमध्येच घोटाळत होते.

थोड्या वेळाने पुन्हा आयसीयूमध्ये गेलो. पाहतो तर बाबांचा देह अत्यंत थंडीने जास्तच कुडकुडत आहे, असे दिसले. जवळ गेलो, त्यांच्या ब्लँकेटला हात लावून पाहिले तर ते पांघरून पाण्याने थबथबलेले आहे, असे लक्षात आले. पुन्हा नर्सला बोलवून विचारले. तेव्हा त्यांनी मला सांगितले की, शरीराचं तापमान कमी होण्याकरिता असे करावे लागते. बाबांकडे पाहत असताना डोळे भरून आले. आपण इथे उभे असताना हा सर्व प्रकार बघत आहोत, पण काहीच करता येत नाही, आपण अगतिक आहोत या भावनेने अंतःकरणात भावना दाटून आल्या होत्या. ही परिस्थिती जवळच उभा असलेला मित्र बघत होता. त्याने मला बाजूला नेऊन आयसीयूच्या मुख्य डॉक्टरांची भेट घालून दिली आणि त्यांना सांगितले की, “डॉक्टर, हा माझा मित्र आहे. याला एक डॉक्टरपेक्षा एक मित्र म्हणून मार्गदर्शन करा.” ते डॉक्टर देखील सहृदय होते. त्यांनी मला जे सांगितले ते असे, “आता तुमच्या वडिलांची तब्येत अगदीच सावरता येण्यापलीकडे जात आहे. एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला असे सांगेन की, यांना आता जीवनरक्षक प्रणालीवर ठेवावे लागेल (ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तत्सम साधने) आणि एक मित्र म्हणून असे सांगतो की, हे सर्व तुम्ही करू नये. कारण परिस्थिती आता परमेश्वरास्वाधीन आहे. हे सर्व करणे आता व्यर्थ आहे. हे सर्व करणे म्हणजे एकप्रकारे त्यांना अजून त्रासदायक होईल.”

हे ऐकून, मनुष्य अगतिक आणि हतबल होतो, म्हणजे नेमके काय‌? हे मला त्याक्षणी समजले. तसाच बाहेर आलो. लहान बंधू प्रशांत याला हे सर्व सांगितले आणि “आपण आता बाबांना जीवनरक्षक प्रणाली लावायची गरज नसल्याचे डॉक्टरांचे सांगणे आहे”, असे निक्षून सांगितले. त्याला लक्षात येईना की दादा असे का म्हणत आहे. तो देखील दुःखाने व उद्वेगाने सैरभैर झाला. तद्नंतर आमचे एक ज्येष्ठ नातेवाईक, जे सदैव आमच्या पाठीशी उभे असत, त्यांनी आम्हा दोघा बंधूंना समजावून सांगितले.

आम्ही दोघे पुन्हा आयसीयूमध्ये आलो. बाबांकडे अश्रूपूर्ण नयनांनी पाहिले. दुःखावेग आवरला जात नव्हता. लहान बंधू प्रशांत याला बाहेर जाण्यास सांगितले. मी स्वतः बाबांच्या पायाजवळ क्षणभर उभा राहिलो. समोर सद्गुरू गजानन महाराजांची प्रतिमा (फोटो) दिसली. मनोभावे नमस्कार करून मनातील विवंचना त्यांना सांगितली आणि विनवणी केली की, “महाराज, आता बाबांची तब्येत पाहावली जात नाही. यांना आता भवसागरातून पार लावा”. एवढी महाराजांकडे प्रार्थना केली. बाबांच्या दोन्ही पायांवर डोके ठेवले. झालेल्या सर्व प्रमाद आणि चुकांबद्दल क्षमा मागितली. डोळेभरून एकवार बाबांना पाहिले आणि आयसीयूमधून बाहेर आलो आणि तुम्हाला खरे वाटणार नाही, क्षणभरात नर्स बाहेर आली आणि तिने माझे बाबा आता या जगात नाहीत, अशी दु:खद वार्ता आम्हाला सांगितली.

श्री महाराजांनी बाबांना भवसागरातून पार लावले होते. प्रत्येक संकटसमयी श्री महाराज सदैव आमच्या पाठीशी असतात आणि तेच या सर्व दुःख संकटांची होळी करून त्यातून तारून नेतात, अशी आमची दृढ श्रद्धा आहे.

क्रमश:

Recent Posts

रेणुका माता छात्रावास, चिपळूण

सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…

3 hours ago

मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…

6 hours ago

रोहित शर्माने टी-२०मधून निवृत्ती घेतल्यानंतर बदलला प्रोफाईल फोटो, मिलियनहून अधिक लाईक्स

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…

7 hours ago

देशात ११३ वैद्यकीय कॉलेज सुरु करण्यास मान्यता

महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…

8 hours ago

अमेरिकेत आर्थिक मंदीची लाट; सुमारे एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याची भीती

वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…

8 hours ago

Hair Fall: केसगळती रोखायची असेल तर जरूर खा हे पदार्थ, हेअरफॉल होईल कमी

मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…

8 hours ago