पंतप्रधानांनी दिल्लीत पीएम स्वनिधी योजनेंतर्गत १ लाख फेरीवाल्यांना केले कर्ज वितरित
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित केले आणि या योजनेचा भाग म्हणून दिल्लीतील 5000 फेरीवाल्यांसह 1 लाख फेरीवाल्यांना (SVs) कर्जाचे वितरण केले. त्यांनी पाच लाभार्थ्यांच्या हाती पीएम स्वनिधी कर्जाचे धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधानांनी दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याच्या दोन अतिरिक्त मार्गिकांची पायाभरणी देखील केली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी शेकडो शहरांमधून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या लाखो फेरीवाल्यांच्या उपस्थितीची दखल घेतली.
महामारीच्या काळात फेरीवाल्यांच्या क्षमतेची आठवण करून देत पंतप्रधानांनी दैनंदिन जीवनातील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. देशभरातल्या एक लाख फेरीवाल्यांच्या खात्यात पैसे थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत आणि त्याबरोबरच दिल्ली मेट्रो, लाजपत नगर-साकेत-जी ब्लॉक आणि इंद्रलोक- इंद्रप्रस्थ या दोन अतिरिक्त मार्गिकांचा प्रारंभ करण्यात आला असे पंतप्रधानांनी सांगितले. आपले कठोर परिश्रम आणि स्वाभिमानाने आपल्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या लाखो फेरीवाल्यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. जरी त्यांच्या मालविक्रीच्या गाड्या आणि दुकाने लहान असली तरी त्यांची स्वप्ने खूप मोठी आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. यापूर्वीच्या सरकारांनी फेरीवाल्यांच्या कल्याणाकडे फारसे लक्ष पुरवले नव्हते ज्यामुळे त्यांना अनादर आणि अडचणींचा सामना करावा लागला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांची पैशाची गरज उच्च व्याज दर असलेल्या कर्जाद्वारे भागवण्यात आली तर उशिरा होणाऱ्या कर्जफेडीमुळे त्यांनी सन्मान गमावला आणि अधिक जास्त व्याजदर लागू झाले, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी हे देखील नमूद केले की त्यांना कोणत्याही प्रकारच्या कर्जाची हमी नसल्याने बँकांची सोय उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत बँक खाते नसल्यामुळे आणि व्यवसायाची नोंद नसल्याने बँकेतून कर्ज मिळवणे त्यांच्यासाठी अशक्य झाले होते. “पूर्वीच्या सरकारांनी फेरीवाल्यांच्या गरजांकडे लक्ष दिले नाही किंवा त्यांच्या समस्या हाताळण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत”, पंतप्रधान मोदी म्हणाले.
“तुमचा हा सेवक गरिबीतून वर आलेला आहे. मी गरिबी पाहिलेली आहे. म्हणूनच ज्यांची कोणीच काळजी घेतली नाही त्यांची काळजी मोदींनी घेतली, इतकेच नव्हे तर मोदींनी त्यांची पूजा केली,” असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की ज्यांच्याकडे हमी देण्यासाठी तारण म्हणून काहीच नव्हते त्यांना मोदींच्या गॅरंटीने आश्वस्त केले.रस्त्यावरील विक्रेत्यांच्या सचोटीचे देखील त्यांनी कौतुक केले.रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांच्या नोंदी तसेच डिजिटल व्यवहारांचे प्रमाण यांच्या आधारावर 10, 20 आणि 50 हजारांची कर्जे दिली जात आहेत. आतापर्यंत, 62 लाख लाभार्थ्यांना 11,000 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यापैकी निम्म्याहून अधिक लाभार्थी महिला आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.