लोकसभा उमेदवारी मिळाल्यानंतर प्रीतम मुंडेंबाबतही व्यक्त झाल्या पंकजाताई
बीड : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) काल ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील २० जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत. बीड लोकसभा मतदार संघातून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचा पत्ता कट झाला आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत ही सन्मानाची गोष्ट असल्याचे म्हटले. तसेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि प्रीतम मुंडे यांच्याविषयीही त्या व्यक्त झाल्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, लोकसभेसाठी मला उमेदवारी जाहीर झाली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. त्यामुळे माझी भावना आभाराची आहे. थोडी संमिश्र भावना यासाठी आहे कारण १० वर्षे प्रीतम मुंडे खासदार होत्या. मी राज्याचं राजकारण करत होते. आता केंद्रात राजकारण करणार आहे. तसा प्रभारी म्हणून कामाचा अनुभव आला आहे. मुंडे साहेब गेल्यानंतर डॉक्टरीपेशा सोडून प्रीतम राजकारणात आल्या, गेली १० वर्षे त्या संसदेत होत्या. आमच्या दोघींमध्ये समन्वय होता. प्रीतम मुंडेंना मी विस्तारीत करणार नाही. त्या शद्बावर मी कायम आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
मी निवडून येण्यासाठी धनंजय मुंडेंचं योगदान असेल
उमेदवारी जाहीर झाली आता धनंजय मुंडे यांची भेट घेणार का? यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, "माझे बंधू धनंजय हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांचा पक्ष आणि भाजप यांची राज्यात युती आहे. त्यामुळे जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत. आमच्या युतीनंतर माझ्या मतदार संघावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यानंतर मला लोकसभेची संधी मिळाली. त्यामुळे जेवढ्या मताने प्रीतमताई निवडून आली होती. त्यापेक्षा जास्त मताने मी निवडून येण्यासाठी त्यांचं योगदान असेल."
धनंजय मुंडेंनी सहकार्य केले तर...
धनंजय मुंडेंना परळीत सहकार्य करणार का? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडेंच्या येण्यानंतर परळी विधानसभेत आम्हाला जास्त त्रास होणार नाही. त्यांनी सहकार्य केले तर त्यांना देखील सहकार्य मिळेल.






