मुलाच्या नावापुढे वडिलांअगोदर आईचेही नाव कागदोपत्री लावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच मंजूर झाला आहे. राज्य सरकारने हा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता, आता मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव, आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
जागतिक महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर करताना शिंदे सरकारने महाराष्ट्रातील महिलांना ही एक भेट दिलेली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणात शासकीय अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १ मे २०२४ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने जन्म प्रमाणपत्र, शाळेची कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड अशा सर्व सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे अनिवार्य केले आहे. राज्य सरकारने खऱ्या अर्थांने हा निर्णय घेऊन राज्यातील मातांचा एकप्रकारे सन्मानच केला आहे. आता या निर्णयामुळे प्रत्येकाच्याच नावापुढे आईचे नाव प्रथम, त्यानंतर वडिलांचे नाव व शेवटी आपले आडनाव कागदोपत्री पाहावयास मिळणार आहे.
घरातील महिलेचे महत्त्व हे अनन्यसाधारणच असते. समाजामध्ये मातांच्या मार्गदर्शनाखाली, संस्काराखाली अनेक मुले नावारूपाला येतात, पण तो मुलगा कोणाचा अशी समाजातून विचारणा झाल्यावर सर्वप्रथम पित्याच्याच नावाने ओळख करून दिली जाते. मातेचे परिश्रम, त्याग हा पडद्याआडच राहतो, तो कधीही कागदोपत्री येत नाही. इतिहासातही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींचा अपवाद वगळता इतर कोणाच्याही मातांच्या नावाची दखल इतिहासाने घेतलेली पाहावयास मिळत नाही. शिवछत्रपतींचे नाव घेतल्यावर वीर जिजामातेचे नाव सांगण्याची कोणालाही गरज भासत नाही व भासणारही नाही. स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी- हदयी अमृत नयनी पाणी, अशीच आमुची माता सुंदर असती तर आम्हीही सुंदर झालो असतो – वदले छत्रपती, स्त्री ही क्षणाची पत्नी असली, तरी ती अनंत काळाची माता असते, असल्या सुभाषितांचा बालमनापासूनच आपणावर भडीमार होत असतो. भिंतीवर तशा आशयाची सुभाषितेही पाहावयास मिळतात. पण ही केवळ चर्चेतील भाषा व चर्चेतीलच मोठेपणा होता.
घरातील महिलांचे अस्तित्व कागदोपत्री कुठेही फारसे पाहावयास मिळत नव्हते, पण आता राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे घरातील महिलांचे विशेषत: मातांचे अस्तित्व आता कागदाेपत्रीही पाहावयास मिळणार आहे. आजवर केवळ पित्याचेच नाव मुलाच्या नावापुढे कागदोपत्री होते, पण आता शासकीय निर्णय मंजुरीमुळे मुलाच्या नावापुढे आईचेही नाव लावलेले आपणास पाहावयास मिळणार आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयाची राजकीय व सामाजिक पातळीवर लगेच दखल घेण्यात आली, केवळ दखलच नाही तर अनेकांनी सोशल मीडियावरही व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटरवरही आपल्या नावापुढे आईचे नाव जोडत कृतीतून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी सुरू केली असून, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ अशी पाटी सोमवारी झळकली. या मजल्यावर येणाऱ्यांसाठी ही पाटी आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या कृतीचे आता आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनीही अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता येत्या काळात समाजजीवनात जाहिररीत्या मातेच्या नावाला आदरपूर्वक कागदोपत्री स्थान मिळाल्याचे पाहावयास मिळणार आहे.
मंत्रालयीन निर्णयामुळे जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद, बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली. आरोग्य विभागाने जन्म-मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा. तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म-मृत्यू नोंदवहीत बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंद करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विवाहित स्त्रियांच्या बाबतीत विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
समाजात आजमितीला महिला अत्याचाराच्या, विनयभंगाच्या, अत्याचाराच्या घटनांचा आलेख वाढतच चालला आहे. त्या घटनांनी समाजव्यवस्थेला कलंकित होण्याची वेळ आता आलेली आहे. समाजात अपकृत्ये करणाऱ्याची वाच्यता झाल्यावर कोणाचा रे मुलगा, अशी विचारणा झाल्यावर नकळतपणे पित्याचे नाव समोर येत असते, पण आता कागदावर मातेचेही नाव प्रथमदर्शनी येणार असल्याने आपल्या दुष्कृत्यामुळे आपल्या पित्यासोबत आता मातेच्याही नावाला काळिमा लागणार आहे, याचेही भान आता प्रत्येकाला ठेवावे लागणार आहे. मनुष्य कितीही नराधम झाला, आपल्या वर्तनाने कितीही खालच्या पातळीवर घसरला तरी मातेवरचे त्याचे प्रेम किचिंतही कमी होत नाही. त्यामुळे आता आपल्या मातेचे नावलौकिक जपण्यासाठी आपल्या हातून वाईट कृत्य घडणार नाही याचीही शतदा काळजी घ्यावी लागणार आहे. वास्तविक आपल्या नावापुढे पित्याच्या नावापुढे मातेचा कागदोपत्री उल्लेख होणे यापूर्वीच अमलात येणे आवश्यक होते. उशिरा का होईना, याची अंमलबजावणी होत आहे, हेही नसे थोडके. या निर्णयाचे प्रत्येकाने आता स्वागत केलेच पाहिजे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…