
मुंबई: उन्हाळा अजून नीटसा सुरूच झाला नाही आणि फेब्रुवारी महिन्यापासूनच हायटेक शहर बंगळुरूमध्ये जलसंकट सुरू झाले आहे. इतकी परिस्थिती बिघडली आहे की मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही पाण्याची कमतरता झाली आहे. लाखो लोक पाण्यासाठी तरसत आहेत. मात्र यातच इंडियन प्रीमियर लीगबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे टेन्शन वाढले आहे.
खरंतर, बीसीसीआयने आयपीएल २०२४च्या हंगामातील सुरूवातीच्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जारी केले आहे. या दरम्यान ३ सामने बंगळुरूच्या एम के चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहेत. पहिला सामना २५ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे.
सुरूवातीच्या सामन्यांवर होणार परिणाम?
मात्र त्याआधी या शहरात आलेल्या जलसंकटामुळे सामना होणे कठीण दिसत आहे. यातच येथील सामने दुसऱ्या मैदानावर शिफ्ट केले जावेत अशी मागणी केली जात आहे. यातच KSCA ने स्पष्ट केले आहे की या जलसंकटाचा परिणाम आयपीएलच्या सुरूवातीच्या तीन सामन्यांवर होणार नाही कारण स्टेडियमच्या सीवेज संयंत्राचे पाणी मैदानाचे आऊटफिल्ड आणि पिचसाठी केला जाईल.
KSCAचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभेंदु घोष म्हणाले, सध्या आम्ही कोणत्याही संकटाचा सामना करत नाही आहोत. आम्हाला पाण्याच्या वापराबद्दल राज्य सरकारकडून माहिती मिळाली आहे. आम्ही दिशानिर्देशांचे पालन करण्याबाबत सातत्याने मीटिंग करत आहोत.