
पियुष गोयल, अनुराग ठाकूर यांच्यासह नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ या दिग्गजांना मिळाले तिकीट
मुंबई : भाजपने उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात आमदार मिहीर कोटेचा यांना तिकीट देऊन, भाजपने मनोज कोटक यांना धक्का दिला. याशिवाय बीडमधून पंकजा मुंडे यांना तिकीट दिल्याने, त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापले गेले आहे. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून भाजपने स्मिता वाघ यांना तिकीट दिले. तिकडे अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट दिले आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने बुधवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर, नगरमधून सुजय-विखे पाटील, माढामधून रणजीत निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळ्यातून सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत.
या यादीत भाजपने दिल्लीच्या उरलेल्या दोन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. पूर्व दिल्ली येथून हर्ष मल्होत्रा आणि उत्तर पश्चिम दिल्लीतून योगेंद्र चंदोलिया यांना तिकीट देण्यात आले आहे. तर दादरा नगर हवेली येथून कलाबेन देलकर यांना तिकीट देण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना हिमाचलच्या हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर धारवाड येथून प्रल्हाद जोशी, नागपूरमधून नितीन गडकरी, करनाल येथून मनोहर लाल खट्टर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने सिरसा येथून अशोक तंवर यांना उमेदवार निवडले आहे.
पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (वाराणसी), अमित शाह (गांधीनगर) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (लखनऊ) यांच्या नावाचा समावेश होता. दुसऱ्या यादीत भाजपने उमेदवारी दिलेल्यांची नावे
महाराष्ट्र
१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार २) रावेर - रक्षा खडसे ३) जालना- रावसाहेब दानवे ४) बीड पंकजा मुंडे ५) पुणे- मुरलीधर मोहोळ ६) सांगली - संजयकाका पाटील ७) माढा- रणजीत निंबाळकर ८) धुळे - सुभाष भामरे ९) उत्तर मुंबई- पियुष गोयल १०) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा ११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर १२) अहमदनगर- सुजय विखे पाटील १३) लातूर- सुधाकर श्रृंगारे १४) जळगाव- स्मिता वाघ १५) दिंडोरी- भारती पवार १६) भिवंडी- कपिल पाटील १७) वर्धा - रामदास तडस १८) नागपूर- नितीन गडकरी १९) अकोला- अनुप धोत्रे २०) नंदुरबार- डॉ. हिना गावित गुजरात
साबरकांठा- भीखाजी दुधाजी ठाकोर अहमदाबाद पूर्व- हसमुखभाई सोमाभाई पटेल भावनगर- निमुबेन बम्भानिया वड़ोदरा- रंजनबेन धनंजय भट्ट छोटा उदयपुर (एसटी)- जशुभाई भीलुभाई राठवा सूरत- मुकेशभाई चंद्रकांत दलाल वलसाड (एसटी)- धवल पटेल हरियाणा
अंबाला- बंतो कटारिया सिरसा- अशोक तंवर करनाल- मनोहर लाल खट्टर भिवानी-महेंद्रगढ- चौधरी धरमबीर सिंह गुडगांव- राव इंद्रजीत सिंह यादव फरीदाबाद- कृष्ण पाल गुर्जर हिमाचल प्रदेश
हमीरपुर- अनुराग सिंह ठाकुर शिमला (एससी)- सुरेश कुमार कश्यप