
झी मराठी वाहिनीने अचानक घेतला कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय
मुंबई : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा एकेकाळी लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर असणारा कार्यक्रम आता बंद होणार आहे. येत्या शुक्रवारी या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम बंद होणार असल्याची फक्त चर्चा होती, मात्र आता झी मराठी वाहिनीने (Zee Marathi channel) अचानक कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याबाबत टीममधील केवळ चार कलाकारांना माहिती देण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण टीमसाठी हा एक मोठा धक्का आहे.
'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम सुरुवातीची काही वर्षे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. याच्या राज्यभरात झालेल्या दौर्यांनाही भरभरुन प्रतिसाद मिळाला. मात्र, गेल्या काही वर्षात हा कार्यक्रम टीआरपीच्या (TRP) शर्यतीत मागे पडत गेला. त्यामुळे तब्बल दहा वर्षांनी 'चला हवा येऊ द्या' प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या शूटिंगचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, याबद्दल झी मराठीच्या टीमने 'चला हवा येऊ द्या'मधील भाऊ कदम (Bhau Kadam), कुशल बद्रिके (Kushal Badrike), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) आणि श्रेया बुगडे (Shreya Bugde) या चौघांनाच कल्पना दिली होती. इतर विनोदवीर आणि क्रू मेंबर यांना काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे या कार्यक्रमाशी जोडल्या गेलेल्या २०० पेक्षा अधिक मंडळींना याचा धक्का बसला आहे. 'चला हवा येऊ द्या' अचानक बंद होणार असल्याने या सर्व कलाकारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
'चला हवा येऊ द्या'ची टीम चॅनलवर नाराज
गेल्या १० वर्षांपासून आपण ज्या कार्यक्रमाचा भाग आहोत तो कार्यक्रम अचानक काही कारणाने बंद होत असल्याने 'चला हवा येऊ द्या'च्या संपूर्ण टीमकडून चॅनलवर नाराजी व्यक्त केली जात आहे. सागर कारंडेने सर्वात आधी 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून निरोप घेतला होता. त्यानंतर या कार्यक्रमाचा सूत्रधार डॉ. निलेश साबळेने काही काळासाठी ब्रेक घेतला. त्यानंतर लगेचच कुशल बद्रिकेने देखील कार्यक्रम सोडला. पण चॅनलसोबत बोलणं झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा कार्यक्रम करण्यास होणार दिला होता.
'चला हवा येऊ द्या'चा शेवटचा एपिसोड असणार खास
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड खूपच खास असणार आहे. अत्यंत दिमाखात या कार्यक्रमाचं शूटिंग पार पडणार असून विनोदवीरांसाठी खास निरोपसमारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच 'शिवा', 'पारू', 'पुन्हा कर्तव्य आहे' आणि 'नवरी मिळे हिटलरला' या कार्यक्रमांचं प्रमोशन होणार आहे. 'चला हवा येऊ द्या'चा शेवटचा एपिसोड प्रेक्षकांना येत्या शुक्रवारी पाहायला मिळणार आहे.