Sunday, July 14, 2024
Homeब्रेकिंग न्यूजरेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पंतप्रधानांच्या हस्ते ८५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या ६,००० रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि प्रकल्प राष्ट्राला समर्पित

देशभरातील १० वंदे भारत ट्रेन आणि इतर रेल्वे सेवांना हिरवा झेंडा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये ८५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या ६,००० रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. नवनवीन योजनांच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांचा सातत्याने विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. आज ८५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असून रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. तसेच दहेज येथे पेट्रोनेट एलएनजीच्या पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्सची पायाभरणी केली आणि १० वंदे भारत ट्रेन व ४ वंदे भारत ट्रेनच्या विस्तारासह इतर रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवला.

प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘अहमदाबाद-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस’च्या शुभारंभासह रेल्वेच्या विविध उपक्रमांची पायाभरणी तसेच लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुंबई सेंट्रल स्थानकावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री मोदी म्हणाले, २०२४ या वर्षात सुमारे ११ लाख कोटींहून अधिक योजनांचे भूमिपूजन अथवा उद्घाटन झाले असून विकासाची ही गती कमी होऊ दिली जाणार नाही. मागील काही वर्षात रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी झाले असून वीजेवर चालणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढली आहे. वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढून विस्तार देखील होत आहे. रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे. भारतातील सेमी हायस्पीड रेल्वेची मागणी इतर देशात वाढून भारतातील रेल्वेच्या कारखान्यांना अधिक काम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकता मॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असून तरुणांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आज भूमिपूजन आणि लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमध्ये राज्यातील एकूण ५०६ प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये १५० वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल्स, १७० इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम, १३० सौर पॅनेल, १८ नवीन रेल्वेमार्ग/ रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण/ गेज रुपांतरण, १२ गुड्स शेड, सात स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली, चार गती शक्ती कार्गो टर्मिनल, तीन विद्युतीकरण प्रकल्प, लातूर येथे कोच कारखान्याचे लोकार्पण, बडनेरा येथे वॅगन दुरूस्ती कार्यशाळा, पुणे येथील वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपो, पाच जनऔषधी केंद्रांचे उद्घाटन, चार रेल कोच रेस्टॉरंटचे उद्घाटन आदींचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

तसेच देशभरात ५० प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रे, २२२ रेल्वे गुड्स शेड, ५१गति शक्ती मल्टी-मॉडल कार्गो टर्मिनल, २६४६ स्थानकांचे डिजिटल नियंत्रण, ३५ रेल्वे कार्यशाळा / लोको शेड / पिटलाइन्स / कोचिंग डेपो, दुहेरीकरण / मल्टी-ट्रॅकिंग ५० किमी रेल्वे मार्ग, १०४५ किमीच्या ८० रेल्वे लाईनवरील विभागांचे स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग, ३५ रेल्वे कोच रेस्टॉरंट्स, १५०० हून अधिक एक स्टेशन एक उत्पादन स्टॉल, ९७५ सौर उर्जेवर चालणारी स्टेशन/सेवा इमारती, २१३५ किमी रेल्वे लाईन विभागांचे विद्युतीकरण, ४०१किमी न्यू खुर्जा- सनेहवाल ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर विभाग, न्यू मकरपुरा-न्यू घोलवड वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर विभागाचा २४४ किमी, अहमदाबाद येथे ऑपरेशन कंट्रोल सेंटर, फलटण – बारामती नवीन रेल्वे लाईन आणि ९ इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टम अपग्रेडेशन कामाचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त राज्यात लातूर येथे कोच कारखान्याचे लोकार्पण, बडनेरा येथे वॅगन दुरुस्ती कार्यशाळा आणि पुणे येथील वंदे भारत मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपो, लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, पिंपरी, सोलापूर आणि नागभीड (चंद्रपूर जिल्हा) येथे ५ जन औषधी केंद्रांचे उद्घाटन, नाशिकरोड,अकोला,अंधेरी आणि बोरिवली येथे ४ रेल कोच रेस्टॉरंटचे उद्घाटन/समर्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविलेल्या १० वंदे भारत ट्रेनमध्ये कलबुरगि-बेंगळुरू वंदे भारत ट्रेन आणि अहमदाबाद-मुंबई सेंट्रल वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जगाच्या प्रगतीत भारताचा मोठा वाटा असल्याचे सांगून २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल, असा विश्वास व्यक्त केला. तर मंत्री लोढा यांनी राज्यपाल श्री. बैस आणि मुख्यमंत्री श्री. शिंदे हे दोघेही सर्वसामान्यांच्या विकासाचा विचार करणारे कॉमन मॅन असल्याचा उल्लेख केला. रेल्वे ही सर्वसामान्यांसाठी अतिशय उपयुक्त सिद्ध होत असून रेल्वेमार्फत सुरू होत असलेल्या विविध उपक्रमांचा मुंबई आणि महाराष्ट्राला लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा

म्हैसूर – चेन्नई, लखनौ-देहराडून, कलबुरगि – बेंगळुरू, रांची – वाराणसी, हजरत निजामुद्दीन – खजुराहो, सिकंदराबाद – विशाखापट्टणम, न्यू जलपाईगुडी – पाटणा, पाटणा – लखनौ, अहमदाबाद – मुंबई सेंट्रल आणि भुवनेश्वर – विशाखापट्टणम.
पंतप्रधानांनी इतर रेल्वे सेवांव्यतिरिक्त ४ वंदे भारत ट्रेनच्या विस्ताराला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये अहमदाबाद -जामनगरला ओखा पर्यंत,अजमेर-दिल्ली सराय रोहिल्ला चंदीगड पर्यंत,गोरखपूर-लखनौ प्रयागराजपर्यंत आणि तिरुअनंतपुरम-कासरगोड मंगळूरपर्यंत या सेवांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -