मुंबई: भारताचा अव्वल क्रिकेट सूर्यकुमार यादव टाचेच्या सर्जरीनंतर बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून जात आहे. मात्र इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्सच्या पहिल्या दोन सामन्यांतील त्याच्या उपलब्धतेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
आयपीएलचे सुरूवातीचे दोन सामने खेळणार नाही सूर्या?
मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या अभियानाची सुरूवात २४ मार्चपासून करत आहे. त्यांचा पहिला सामना उपविजेता गुजरात टायटन्सविरुद्ध रंगणार आहे. आयसीसी रँकिंगमधील हा अव्वल टी-२० फलंदाज पुनरागमनसाठी जोरदार प्रयत्न करत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्यकुमार रिहॅबिलिटेशनच्या योग्य मार्गावर आहे आणि तो निश्चितपणे आगामी सत्रात पुनरागमन करेल.
दरम्यान, हे निश्चित नाही की एनसीएच्या स्पोर्ट्स सायन्स आणि मेडिकल टीमने गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांविरुद्ध खेळण्यास परवानगी दिली की नाही.
मुंबई इंडियन्स आणि भारतासाठी महत्त्वाचा आहे सूर्यकुमार यादव
सूर्यकमार यादव मुंबईच्या महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावावर ६० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार शतके आणि १७१हून अधिक स्ट्राईक रेटसोबत २,१४१ धावा आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ४ जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताच्या फलंदाजीमध्ये सूर्यकुमारचे स्थान महत्त्वाचे आहे. सूर्यकुमारने आपला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेत खेळला होता. तेव्हा त्याने टी-२०मध्ये भारताचे नेतृत्व केले होते.