Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यभ्रमणध्वनी निर्मितीची एक अतुलनीय यशोगाथा

भ्रमणध्वनी निर्मितीची एक अतुलनीय यशोगाथा

एका दशकात भारतात मोबाइल फोन(भ्रमणध्वनी) उत्पादनात झालेली वाढ म्हणजे जणू उत्पादन क्षेत्रातील अतुलनीय यशोगाथा होय. वर्ष २०१४ मध्ये देशात विक्री झालेल्या एकूण मोबाइल फोनपैकी ७८% हे आयात केलेले होते, तर आजमितीस ९७% मोबाइल फोनचे उत्पादन स्वदेशी आहे. आयसीईए अर्थात इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन या औद्योगिक संस्थेच्या अहवालानुसार, मूल्याच्या दृष्टीने भ्रमणध्वनी उत्पादन हे आर्थिक वर्ष २०१४-१५ मधील १८,९०० कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये अंदाजे ४.१० लाख कोटी रुपयांपर्यंत म्हणजे २० पटीने वाढले आहे. गेली १० वर्षांत भारतात एकूण २४५ कोटींहून अधिक मोबाइल फोन संचांची निर्मिती करण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष २०१४ – १५ मध्ये भारतातील मोबाइल फोनची निर्यात केवळ १,५५६ कोटी रुपये होती. मात्र, आर्थिक वर्ष २०२४च्या अखेरीस ती अंदाजे १,२०,००० कोटी रुपये असेल, अशी उद्योजकता क्षेत्राची अपेक्षा आहे. या निर्यातवृद्धीमुळे आता वैयक्तिक वस्तू म्हणून मोबाइल फोनची निर्यात ही भारतातील ५वी सर्वात मोठी निर्यात बनली आहे. उत्पादन, निर्यात आणि स्वयंपूर्णतेमधील झपाट्याने होत असलेली वाढ ही अनुकूल धोरण, वातावरण आणि उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, डीपीआयआयटी, वाणिज्य मंत्रालय, वित्त मंत्रालय, नीती आयोग आणि प्रधानमंत्री कार्यालय या प्रमुख सरकारी मंत्रालयांमधील घनिष्ठ एकजुटीचे द्योतक आहे.

मे २०१७ मध्ये, भारत सरकारने मोबाइल हँडसेटच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी फेज्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम (पीएमपी) अर्थात प्रावस्थाबद्ध उत्पादन कार्यक्रमाची घोषणा केली. या उपक्रमामुळे भारतात एक बळकट स्वदेशी मोबाइल उत्पादन परिसंस्था तयार करण्यात मदत झाली आणि मोठ्या प्रमाणात उत्पादनाला प्रोत्साहन मिळाले. वर्ष २०१४ मध्ये फक्त २ मोबाइल फोन फॅक्टरी असलेला भारत आता जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाइल फोन उत्पादक बनला आहे. मोठ्या प्रमाणावरील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी (एलएसईएम) आणि आयटी हार्डवेअरसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना पीएलआय ही भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी स्पर्धात्मक ठिकाण बनवण्याच्या दिशेने प्रगती करत आहे. पीएलआय योजना पात्र उद्योजकांना निर्धारित कालावधीसाठी वाढीव विक्री मूल्याच्या ३% ते ५% पर्यंत प्रोत्साहन देते.

पीएलआय योजनेने फॉक्सकॉन, पेगट्रॉन, रायझिंग स्टार आणि विस्ट्रॉन सारख्या आघाडीच्या जागतिक करार उत्पादकांना भारतात उत्पादन ढाचा तयार करण्यासाठी आकर्षित केले आहे. दुसरीकडे, सॅमसंग कंपनी नोएडामध्ये जगातील सर्वात मोठी मोबाइल फोन फॅक्टरी चालवते. स्मार्टफोनच्या क्षेत्रात ॲपल आणि सॅमसंगने देशातील मोबाइल फोनची निर्यात वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय बनावटीची उपकरणे लंडन, नेदरलँड, ऑस्ट्रिया आणि इटली व्यतिरिक्त मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात आहेत. मोठी देशांतर्गत बाजारपेठ आणि वाढत्या निर्यात बाजारपेठेसह भारतातील मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन साखळीतील घटकांचा दृष्टिकोनही उत्साही आहे.(प्रेस इन्फाॅर्मेशन ब्युराे)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -