नागपूर : महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. मांजर चावल्यानंतर एका ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. ही घटना नागपूरमधील हिंगणा तालुक्यातील उखडी गावात घडली आहे. श्रेयांशू कृष्णा पेंदाम असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवालानंतर मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. शनिवारी श्रेयांशु आपल्या मित्रासोबत खेळत होता. घराजवळ एक मांजर त्याच्या जवळ आली. मांजरी सोबत खेळता खेळता तिने त्याच्या पायाला चाव घेतला, असे त्याने आईला सांगितले. या घटनेच्या काही वेळानंतर त्याला मळमळ आणि ओकाऱ्या सुरु झाल्या. त्यामुळे त्याचे आईवडील श्रेयांशूला घेऊन हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयात गेले. मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर श्रेयांशुच्या कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
दरम्यान, मांजराने चावा घेतल्याने मृत्यू ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. मांजराने दंश केल्यानंतर इतक्या कमी वेळात मृत्यू होणे कठीण आहे. मांजराने हल्ला केल्याने तो घाबरला. त्यामुळे काही वेळात त्याला ओकाऱ्या सुरू झाल्या. त्यानंतर ओकारी बाहेर न येता घशातून श्वसन नलिकेत जाऊन श्वास रोखल्याने त्याचा मृत्यू झाला असावा. अथवा आणखी कोणत्या विषारी श्वापदाने दंश केला असू शकतो. मांजर चावल्याने इतक्या कमी वेळात मृत्यू होणे दुर्मीळ आणि अतिशय दुःखद घटना आहे. नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे आताच सांगणे कठीण आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर निश्चित कारण समोर येईल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी प्रवीण पडवे यांनी सांगितले.