स्त्रीत्वाचे पदर उलगडताना…

Share

विशेष: अलका कुबल, प्रसिद्ध अभिनेत्री

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीविषयक विविध प्रश्नांवर चर्चा होत असली तरी खरे बघता मला प्रत्येक दिवस महिला दिन वाटतो, असे सर्वप्रथम सांगू इच्छिते. अलीकडे जग बदलले, समाज बदलला, सामाजिक स्थिती बदलली तसे महिलांचे क्षितिजही विस्तारले. आता असंख्य महिला आपल्या कार्यकर्तृत्वाने जगाला अचंबित करत आहेत. त्यामुळेच महिला दिन साजरा करताना पालकांनी घरातील मुलींवर उत्तम संस्कार करण्याचा वसा घ्यायला हवा असे वाटते. प्रत्येक मुलीमध्ये, स्त्रीमध्ये प्रचंड इच्छाशक्ती, श्रमशक्ती, बुद्धी असते. फक्त तिला योग्य वेळी, योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. यासाठी लहानपणापासून पालकांची साथ मिळाली, तर ती इतिहास घडवू शकते. लहानपणापासून होणारे संस्कार, शिकवण मनात कायमची बिंबते, रुजते. त्यामुळेच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

याबरोबरच मुलींसाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. ते असेल तर पाया भक्कम होण्यास मदत होते. शिकलेली, स्वत:च्या पायावर उभी असणारी महिला आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी ताकदीने सामना करू शकते. स्वत: कमवत असल्यास, स्वत:ची वेगळी ओळख असल्यास वाटेत येणारे अडथळे पार करून जाण्याचा धीर तिच्यामध्ये आपसूक येतो. त्यामुळेच महिला दिनाच्या निमित्ताने हेदेखील सांगेन की, महिलेने सशक्त आणि सक्षम व्हायला हवे. तसे पाहायला गेले तर त्यांना चांगले काय आणि वाईट काय याची उपजत जाणीव असते. म्हणून काळाच्या ओघात, प्रलोभनांमध्ये नको त्या दिशेने वहावत जाण्यापेक्षा आपल्या ध्येयाकडे, कारकिर्दीकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कालौघात बाकीच्या गोष्टी मिळतातच. त्या थांबत नाहीत. पण कधी कधी इतरांसाठी त्याग करण्यात बाईचे आयुष्य मात्र हातून निसटून जाण्याचा धोका असतो. स्वाभाविकच एकदा वेळ निघून गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी करायच्या राहून जातात. म्हणून ध्येयाचा पाठपुरावा करण्यात मागे राहू नये, असे मी समस्त महिलावर्गाला सांगेन. आजची तरुणाई देशाचे भवितव्य घडवणारी असते. त्यातही एक महिला पूर्ण घर घडवते. त्यामुळेच महिलांनी गांभीर्याने याचा विचार करायला हवा.

सध्या पुरुषांप्रमाणे महिलांपुढेही अनेक प्रलोभने आहेत. काही वेळा त्यात वाहवत जाण्याचा धोकाही असतो. अशा अनेक घटना रोज आपल्या वाचनात येतात. म्हणूनच आपण नेमके काय करतो, याचे भान असणे गरजेचे आहे. ही खबरदारी घेतली, तर पुढे वाईट परिणाम भोगावे लागणार नाहीत. ही बाब वैवाहिक संबंध जोडतानाही लक्षात ठेवावी. प्रत्येक मुलीने आयुष्यात येणारा जोडीदारच नव्हे, तर त्याचे संपूर्ण घर आपल्यासाठी योग्य आहे की नाही, याचा त्रिवार विचार करावा. ते आपल्या भवितव्याचा विचार करतील की नाही, हा विचार प्रत्येकीने अत्यंत गांभीर्याने करणे गरजेचे आहे.

जोडीदार आयुष्यभर तुमच्याबरोबर राहणार असतो. तुमच्या विचारांवर, धारणांवर परिणाम टाकणार असतो. आजकाल लग्नानंतर अवघ्या एक-दोन वर्षांमध्ये घटस्फोट घेण्याचे वाढलेले प्रमाण बघता ही बाबही अत्यंत महत्त्वाची वाटते. अलीकडे सोशल मीडियाद्वारे अगदी महिन्याभरात एखाद्याशी मैत्री होते, बघता बघता प्रेम आहे असे वाटून लग्नाचा निर्णयही घेतला जातो. लग्न होते. पण नंतर तितक्याच लवकर विचारांमधील तफावत लक्षात येऊन नाती तुटतात. सध्याच्या सज्ञान, शिक्षित मुलींनी याचा अवश्य विचार करावा. एकदा चुकलेला हा निर्णय भविष्यात अनेक संकटांची मालिका समोर घेऊन येतो. त्यामुळे सतर्क राहण्याखेरीज पर्याय नाही, हे समजून घ्यावे.

यानिमित्ताने अलीकडे प्रकाशात आलेल्या दोन-चार बातम्यांची प्रकर्षाने नोंदही घ्यावी लागेल. नुकतेच पुण्यासारख्या ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असणाऱ्या शहरात अमली पदार्थांचा प्रचंड साठा आढळून आला. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत काही कोटींमध्ये असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर काही दिवसांमध्येच विद्यार्थीदशेतल्या दोन युवती एका टेकडीवर अमली पदार्थांच्या नशेत आढळल्याचे वृत्त आले. त्या तरुणींवर अमली पदार्थांचा अंमल एवढा अधिक होता की, आपण कुठे आहोत वा आजूबाजूला काय सुरू आहे, याचे भानही त्यांना नव्हते. अशाच प्रकारे महिलांमधील वाढती व्यसनाधिनता, गुन्हेगारी प्रकरणांमधील वाढता सहभाग यासंबंधीच्या बातम्याही चर्चेत येत असतात. त्यामुळेच महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे त्यांच्यावरील अन्यायावर चर्चा होत असताना, त्यांच्या हक्कांसंबंधी आवाज उठवताना अशा चुका टाळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. केवळ एकांगी विचार न करता वस्तुस्थिती लक्षात घेऊन ऊहापोह केला, तरच संभाव्य धोके टाळून महिलांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगणे शक्य होईल आणि असे झाले, तरच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होण्याचे समाधान लाभेल.

मुलगी स्वत:हून सांगत नाही म्हणजे तिला कोणतीच समस्या नाही, असा समज पालकांमध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. दोन्ही बाजूंकडील सस गैरसमजामुळे संवादाची प्रक्रिया थांबते. आपल्या भावविश्वात रमणाऱ्या तरुण मुलींना आईने केलेली विचारपूस नकोशी वाटते. आपण आणि आपले भावविश्व यामध्येच रमण्याची वृत्ती वाढीस लागते. त्यामुळे अनेक वर्षे आईशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण नात्यामध्ये बाधा निर्माण होते. यातून भविष्यात अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे मुलींनीही भावविश्वाबरोबर आईशी असलेले मैत्रीपूर्ण नाते जपण्याची गरज असते.

अलीकडे अनेक स्त्रिया नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर असतात. मुलांच्या आर्थिक गरजा भागवल्या आणि वेळच्या वेळी जेवायला दिले म्हणजे आपली जबाबदारी संपली असा काहींचा गैरसमज असतो. यामुळे मुलांबरोबर गप्पा मारण्यासाठी खास वेळ काढणे अनेकांना जमत नाही; परंतु त्याचा परिणाम घरातील मुलींवर मोठ्या प्रमाणात होतो. आई आणि मुलीच्या नात्यामध्ये संवादाला अधिक महत्त्व असते. अर्थात हा संवाद दोन्ही बाजूने निर्माण होण्यासाठी लहानपणापासूनच मुलीची योग्य जडणघडण आवश्यक असते.

आई गृहिणी असेल, तर घरात राहणाऱ्या आपल्या आईला बाहेरचे काहीच कळत नाही अशी भावना मुलींमध्ये विशेषत: कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींमध्ये निर्माण होते. स्त्री नोकरी करणारी असेल, तर आईला आपल्यासाठी वेळच नाही अशी भावना मुलींमध्ये निर्माण होऊ शकते. मुलीच्या मनातील या दोन्ही समजुती काढून टाकण्याचे काम आईनेच करायला हवे. यासाठी मुलीशी मोकळा संवाद साधायला हवा. कॉलेजमधील वातावरण, मित्रमैत्रिणी वा आवडणारी एखादी बाब अशा अनेक विषयांवर तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारायला हव्यात. आपल्या मुलीचे प्रत्येक मत चुकीचे आहे किंवा तिच्या वागण्या-बोलण्यातील बदल चुकीचे आहेत, असा समज प्रथमत: मनातून काढायला हवा. आधुनिक काळात वावरणाऱ्या आपल्या मुलीला नवीन गोष्टींचे आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. या आकर्षणांबद्दल नाक न मुरडता मोकळेपणाने चर्चा करायला हवी. उपभोगाच्या संस्कृतीतील झगमगाट किती क्षणिक असतो, हे तिला समजावून सांगायला हवे.

मुलीला वाढवताना भावविश्वात शिरून संवाद साधणे हिताचे ठरते. स्पर्धेच्या काळातील नवीन संधींचा शोध घेऊन आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुलीला प्रोत्साहन द्यायला हवे. आजच्या आधुनिक काळातील करिअरचे महत्त्व लक्षात घेऊन मुलीच्या विकासाला संधी प्राप्त करून द्याव्यात. अर्थातच आपली एखादी इच्छा अपूर्ण राहिली म्हणून मुलीने अमूक एका क्षेत्रात करिअर करावे हा अट्टहास अयोग्य म्हणावा लागेल. सध्या पूर्वीपेक्षा मुलींसाठी अनेक क्षेत्रे खुली झाली असून पालकांनी त्यांचा व्यापक विचार करायला हवा. मुलीच्या मानसिकतेचा आणि भावविश्वाचा विचार करून संधींची जाणीव करून द्यायला हवी.

मुलगी अधिक संवेदनशील आहे म्हणून तिला काही क्षेत्रे नाकारून चालणार नाही. नोकरीच्या संधींबरोबरच मुलींना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. अर्थात मुलींनीही पालकांच्या अनुभवाचा आणि भूमिकेचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केल्यास फायद्याचे ठरेल. पालक नेहमीच आपल्या मनाविरुद्ध वागतात किंवा आई मला समजून घेतच नाही, असा कांगावा करण्यापेक्षा मुलींनी समजुतीचे एक पाऊल टाकल्यास संवादामध्ये मोकळेपणा येऊन पालकांना ‘मुलगी’ म्हणून काळजी वाटणार नाही. तसेच संवादातील मोकळेपणामुळे पालकही मुलींवर अतिरिक्त बंधने लादणार नाहीत. एकूणच या प्रक्रियेत मुलगी आणि आईच्या नातेसंबंधाची भूमिका महत्त्वाची मानावी लागेल.

Recent Posts

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

27 minutes ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

3 hours ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

3 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

4 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

5 hours ago