Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीDharavi Umesh Keelu : भले शाब्बास! उमेश कीलू बनला धारावीतील पहिला आर्मी...

Dharavi Umesh Keelu : भले शाब्बास! उमेश कीलू बनला धारावीतील पहिला आर्मी ऑफिसर

दहा बाय पाच फूटाची खोली, वडिलांचा मृत्यू… पण उमेशचा धीर नाही खचला

मुंबई : हलाखीची आर्थिक परिस्थिती, तुटपुंजं वेतन, गरजेच्या सोयीसुविधांचा अभाव ही आव्हाने समोर उभी ठाकलेली असतानाही उंचच उंच भरारी मारणार्‍या अनेक तरुणांची कहाणी आजवर आपण ऐकली आहे. या कहाण्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असतात. असाच एक आदर्श घालून ठेवला आहे धारावीच्या (Dharavi) उमेश कीलू (Umesh Keelu) याने. केवळ दहा बाय पाच फूटांच्या खोलीत राहून आणि वडिलांच्या निधनाचा मोठा धक्का पचवून उमेश आर्मी ऑफिसर (Army officer) बनला आहे. त्याच्या या यशाचं (Success) सर्वच स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे.

खरं तर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी. अगदी लहानलहान गल्ल्या, त्यात पाय ठेवताच संपणारी लहान आकाराची घरं, पाणी, वीज यांसारख्या गरजेच्या वस्तूंचा अभाव असलेली धारावी गुन्हेगारीसाठीही प्रसिद्ध आहे. मात्र, याच धारावीत राहून उमेशने आपलं स्वप्न साकार केलं आहे. मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, याचं उमेश ज्वलंत उदाहरण आहे.

उमेश कीलू आवश्यक सुविधा नसतानाही भारतीय लष्करात कमिशन्ड ऑफिसर झाला आहे. शनिवारी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये पासिंग आऊट परेडचे आयोजन करण्यात आले होते, त्यानंतर तो आता लेफ्टनंट झाला आहे. त्यामुळे त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण धारावी जमली होती.

कशी आहे उमेशची कारकीर्द?

उमेश कीलूचा जन्म मुंबईतील धारावीच्या सायन कोळीवाडा झोपडपट्टीत झाला. १० बाय ५ फुटांच्या घरात तो आपल्या कुटुंबासह राहत होता. सर्व आर्थिक अडचणी असतानाही त्याने IT मध्ये B.Sc आणि Computer Science मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. एनसीसी एअर विंगशी असलेल्या संबंधामुळे त्याला सी प्रमाणपत्र मिळाले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने सायबर कॅफेमध्ये अर्धवेळ नोकरी केली आणि संगणक ऑपरेटर म्हणून काम केले. तसेच त्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि ब्रिटीश कौन्सिलसह आयटी सेवा क्षेत्रातही काम केले. उमेश कीलूने गेल्या काही वर्षांत सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) पास करण्यासाठी एकूण १२ प्रयत्न केले, त्यानंतर तो आता प्रतिष्ठित अकादमीमध्ये सामील झाला आहे.

याच दरम्यान उमेशच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. २०१३ मध्ये त्यांना अर्धांगवायू झाला. यानंतर त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली, कारण तो घरात एकमेव कमावता होता. वडिलांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर तो मुंबई धारावी येथे अंत्यसंस्कारासाठी गेला आणि नंतर अकादमीत परतला. त्याने मोठ्या समर्पणाने कठोर परिश्रम केले आणि कमिशन्ड ऑफिसर बनून आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण केले.

काय आहेत उमेशच्या भावना?

पीटीआयशी बोलताना उमेशने म्हटले की, माझे वडील पेंटर होते. २०१३ मध्ये त्यांना अर्धांगवायू झाला आणि तेव्हापासून ते अंथरुणाला खिळून होते. सैन्य प्रशिक्षणासाठी रिपोर्ट करण्याच्या एक दिवस आधी मार्च २०२३ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आज मी माझे ११ महिने प्रशिक्षण पूर्ण केले आणि सैन्यात एक कमिशन्ड ऑफिसर आहे. मी त्या भागातील (धारावी, मुंबई) पहिला अधिकारी आहे आणि हा खूप अभिमानाचा क्षण आहे. तेथे प्रचंड बेरोजगारी आहे आणि मला आशा आहे की ते देखील माझ्याकडून प्रेरित होऊन सैन्यात सामील होतील”, अशा भावना उमेशने व्यक्त केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -