Sunday, April 20, 2025

छत्री

बाई प्रत्येक मुलाचे चित्र अगदी बारकाईने बघत होत्या. काही मुलांनी चित्रे खूपच सुरेख काढली होती. प्रत्येकाने बालसुलभ आणि बालमनाच्या कल्पनेप्रमाणे चित्रं काढली होती. चित्रं बघताना बाईंचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. अचानक चित्रं बघता बघता बाईंचा चेहरा बदलला. कारण संपूर्ण वर्गात हे एकच चित्र वेेगळे आणि चुकीचे काढले होते.

कथा : रमेश तांबे

मधल्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळा भरली. मीनाने डबा झटपट संपवून तो दप्तरात नीट ठेवून दिला. तितक्यात चित्रकलेच्या बाई वर्गावर आल्या. चित्रकलेचा तास म्हणजे साऱ्या वर्गाचा आवडता तास. त्यामुळे सर्वच मुलांना आनंद झाला. “चला चित्रकलेच्या वह्या काढा आणि पावसाळ्यातील निसर्गचित्र काढा” असे बाईंनी सांंगताच मुलांनी पटापट वह्या काढल्या आणि पावसाचे चित्र काढण्यात सारी मुले दंग झाली.

मीनाने सावकाश आपली वही बाहेर काढली आणि रंगीत खडूच्या सहाय्याने ती चित्र काढू लागली. मीनाने काळेकुट्ट ढग काढले. त्यातून पडणारा पाऊस दाखवला. खेळणारी मुले, डोंगर, नदी सारं काही दाखवलं आणि शेवटी ढगांच्या वर एक छत्री घेतलेली बाई! थोडा वेळ चित्राकडे एकटक पाहिलं आणि समाधानाने हसली. बराच वेळ वर्गात सर्वत्र शांतता पसरली होती. पण मधेच कुणीतरी आपल्या मित्राला हाक मारून खोडरबर विचारे,तर कुणी रंगीत खडू मागत होते. हा हा म्हणता तीस-चाळीस मिनिटे कधी संपली ते कळलेच नाही. बाईनी वेळ संपल्याची खूण केली आणि प्रत्येकाने आपापली चित्रे माझ्याकडे आणून द्यावीत, असे सांगितले.

मीनानेदेखील चित्राचे रंगकाम संपवून ते बाईंकडे नेऊन दिले. आता वर्गात तू काय चित्र काढले, मी काय काढले यावर चर्चा सुरू झाली. पण त्या गडबडीकडे बाईंनी पूर्ण दुर्लक्ष केले आणि मुलांनी काढलेली चित्रे त्या पाहू लागल्या. बाई प्रत्येक मुलाचे चित्र अगदी बारकाईने बघत होत्या. काही मुलांनी चित्रे खूपच सुरेख काढली होती. कुणी पडणारा पाऊस आणि पावसात खेळणारी मुले, तर कुणी पूर आलेली नदी आणि त्यात वाहून जाणारी झाडे, कुणी काळे काळे ढग आणि लखलखणारी वीज, तर कुणी खिडकीत उभं राहून बाहेरचा पाऊस बघणारी मुलं, कुणी आकाशात दिसणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य आणि हिरव्यागार रानात चरणारी, हुंदडणारी गायीगुरे काढली होती. अशी बालसुलभ आणि बालमनाच्या कल्पनेप्रमाणे चित्रं काढली होती. चित्रं बघताना बाईंचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता.

चित्रं बघता बघता बाईंचा चेहरा एकदम बदलला. कारण संपूर्ण वर्गात हे एकच चित्र वेेगळे आणि चुकीचे काढले होते. बाईंनी चित्रावरचे नाव वाचले आणि म्हणाल्या, “मीना हे तू कसले चित्र काढले आहेस. ढग आणि ढगांच्या वर छत्री घेतलेली बाई! अगं ए वेडाबाई, ढगाच्या वर कधी पाऊस पडतो का?” मीना बाईंजवळ गेली आणि काहीच न बोलता शेजारी उभी राहिली. पण बाई साऱ्या वर्गाला चित्र दाखवत म्हणाल्या, “बघा आपल्या मीनाताईंचे चित्र. मीनाने ढगाच्या वर छत्री घेतलेली बाई दाखवली आहे.” मीनाचे चित्र बघून सारी मुलं खो-खो हसू लागली. बाई म्हणाल्या, “मीना तू पाचवीत शिकतेस ना! मग तुला तर चांगलेच माहीत असायला हवे की, पाऊस हा ढगातून खाली पडतो आणि तरीही तू ढगांच्या वर छत्री घेतलेली बाई का काढली आहेस”?

मीना मान वर करून बाईंशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. मीनाच्या डोळ्यांत करुणा भरली होती. त्या शांत आणि करुणेने भरलेल्या डोळ्यांनी बघत ती बाईंना म्हणाली, “मॅडम सगळे लोक म्हणतात की, माझी आई आकाशात गेली आहे देवाला भेटायला. मग पावसात आई भिजेल ना! म्हणून मी ढगाच्या वर छत्री काढली आहे आईसाठी.” मीनाचे ते निरागस उत्तर ऐकून बाईंना अगदी भरून आलं. त्यांचे डोळे पाण्याने डबडबले आणि मीनाला जवळ घेऊन पाठीवर हात फिरवत म्हणाल्या, “मीना खरंच खूपच छान चित्र काढलं आहेस.” असं म्हणत बाईंनी मीनाला आपल्या मिठीत घेतलं आणि आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -