Wednesday, July 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजरिक्षा-टॅक्सीवाल्यांची मानसिकता आणि सामान्य माणूस

रिक्षा-टॅक्सीवाल्यांची मानसिकता आणि सामान्य माणूस

प्रत्येक टॅक्सी ही थांबल्यासारखी होऊन डबल वेगात पुढे जात होती. पण एक टॅक्सी थांबली. त्यामुळे मला त्या चालकाशी बोलता आले, तेव्हा त्याला त्या वृद्ध गृहस्थांबद्दल सांगून मी त्यांना घेऊन जाण्याची विनंती केली. त्या टॅक्सीवाल्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि तो त्याच्या वाटेने निघून गेला.

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठ, काला घोडा येथे गेले होते. कार्यक्रम साधारण रात्री सात-साडेसात वाजता संपल्यावर मुंबई युनिव्हर्सिटीच्या बाहेर टॅक्सीसाठी उभे होते. माझ्याबरोबर आणखी दोन मैत्रिणीही होत्या. आम्ही कोणत्याही टॅक्सीला हात करायला पुढे गेलो की एक तरुण मुलगा, आमच्या बरोबरीने तिथे धावायचा. असे साधारण पाच-सहा टॅक्सींच्या बाबतीत घडले. शेवटी मी त्याला विचारले की, “तुम्हाला कुठे जायचे आहे?” तर तो म्हटला की, “सीएसटी रेल्वे स्टेशन.” मी त्याला सांगितले की, “आम्हालाही तिथेच जायचे आहे. जर टॅक्सी मिळाली, तर सोयीचे म्हणून आपण चौघेही एकत्र जाऊया जेणेकरून परत टॅक्सी शोध नको”, तर तो पटकन म्हणाला की, “तुम्ही तिघेजण आहात, पण माझ्याबरोबर माझे काका आहेत.” त्याने एका दिशेकडे बोट दाखवले आणि मी पाहिले एक वयोवृद्ध गृहस्थ तेथे बराच वेळ बसून होते. जेमतेम एक एक पाऊल सावकाश टाकत ते तेथे जाऊन बसताना मी पाहिले होते. एका कोपऱ्यात अंग आक्रसून ते झाडाभोवती केलेल्या कट्ट्यावर बसले होते. त्यांच्यासमोर दोन जड बॅगाही ठेवलेल्या होत्या. या बॅगांसहित, त्या वृद्ध गृहस्थाला घेऊन तरुणाला बसने जाता येणे शक्यच नव्हते. माझ्या मनात विचार आला की, आम्ही सहज बसने जाऊ शकतो. आम्हाला टॅक्सी मिळाली तरी त्या दोघांनाच त्याने जाऊ द्यायचे, असे मनात ठरवले.

दरम्यान तीन-चार टॅक्स्यांनी अशीच नकारघंटा वाजवली. प्रत्येक टॅक्सी ही थांबल्यासारखी होऊन डबल वेगात पुढे जात होती. पण एक टॅक्सी थांबली. त्यामुळे मला त्या चालकाशी बोलता आले, तेव्हा त्याला त्या वृद्ध गृहस्थांबद्दल सांगून मी त्यांना घेऊन जाण्याची विनंती केली. त्या टॅक्सीवाल्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि तो त्याच्या वाटेने निघून गेला. शेवटी आम्ही बसने जायचा निर्णय घेतला. बसस्टॉप थोडासाच पुढे होता. स्टॉपवर आम्ही पंधरा मिनिटे उभे होतो. तितक्यात त्या मुलाने अजून दहा-बारा रिकाम्या टॅक्स्यांना हात केला असेल, पण टॅक्सी थांबायची नाही किंवा थांबली, तर सीएसटी रेल्वे स्टेशन ऐकून निघून जायची. त्यांच्याकडे असलेल्या त्या जड बॅगा पाहून माझ्या लक्षात आले की, त्यांना बाहेरगावची गाडी पकडायची आहे!

टॅक्सीची वाट पाहणे आणि बसस्टॉपवर मिळून अर्धा तास तरी गेला असेल. मी ही घटना पाहत होते. कोणत्याही टॅक्सीवाल्याला त्यांची दया आली नाही. त्यांना ज्या दिशेकडे जायचे होते, त्या दिशेकडे ते निघून जात होते.

येथे मला माझ्या मनात विचार आला की, टॅक्सी-रिक्षा या वाहनांवर काही निर्बंध असावेत का? ही वाहने रिकामी असताना त्यांनी ज्या दिशेकडे माणसांना जायचे त्या दिशेकडे त्यांना घेऊन जायचे का? की त्यांना स्वतःला ज्या दिशेकडे जायचे आहे त्या दिशेकडच्या ग्राहकांना घेऊन जायचे? कितीतरी ओला-उबेरसारख्या टॅक्स्यासुद्धा एखाद्या भागात अजिबात फिरकत नाहीत किंवा त्यांनी कॉल घेतला तरी त्यांना तो भाग लक्षात येताच ते कॅन्सल करतात. काही लोकांकडे असे अॅपसुद्धा नसतात. अशा वेळेस माणसांनी करायचे काय? वृद्ध माणसे असतात, आजारी माणसे असतात, गर्भवती स्त्रिया असतात, खूप घाईत असलेली माणसे असतात किंवा सर्वसामान्य माणसांकडे काही अवजड वस्तू असू शकतात. कुठेतरी बस- ट्रेन-विमान पकडण्यासाठी वा नोकरीतील मस्टर गाठण्यासाठी, मीटिंगसाठी ठरावीक वेळेत पोहोचायचे असते. अशा माणसांनी नेमके करायचे काय?

शहरांमधील ट्रॅफिक खूप वाढले आहे. मोठ्या प्रमाणात बस, टॅक्सी सर्व्हिस उपलब्ध असूनही ते कमी पडत आहेत. खेडेगावाकडे जाणाऱ्यांचे तर अजून वेगळे हाल आहेत. रिक्षा-टॅक्सीवाले अवाच्या सव्वा भाव मागतात. ग्राहकांचे प्रचंड अडवणूक करतात. ज्याप्रमाणे आपली गाडी बंद पडली किंवा आजारी माणसांसाठी ॲम्ब्युलन्स बोलवायची असेल, तर त्या प्रकारच्या सर्व्हिसेस कमीत कमी काही शहरात अलीकडे उपलब्ध आहेत. अशा प्रकारे एखाद्या माणसाला कुठेतरी पोहोचायचे असेल आणि कोणतेही वाहन मिळत नसेल, तर त्यासाठीसुद्धा सर्व्हिस असावी असे मला वाटते. अशी सर्व्हिस एका फोन नंबरवर उपलब्ध असावी. एखादा वेळेस एखाद्याची समस्या खरंच कधी कधी गहन अशी असू शकते!

एखाद्या वेळेस एखाद्या टॅक्सी किंवा रिक्षावाल्याला घरी परतायचे असेल आणि तो ग्राहकांना सोडत खूप दूरवर आलेला असेल, तर तो एखाद्या दिशेचे ग्राहक नाकारू शकतो. पण सरसकट अशा घटना घडतात. त्या बसस्टॉपवर त्या दिवशी कोणती तरी बस आली. ती सीएसटीला जाणारी होती त्यामुळे आम्ही तिघी कशातरी चढलो. मी मागच्या काचेतून वळून वळून त्या टॅक्सीच्या मागे धावणाऱ्या मुलाकडे आणि कोपऱ्यात बसलेल्या त्यात वृद्धाकडे पाहात राहिले. माझे डोळे नकळतपणे भरून आले. कित्येक वेळा, किती असाह्य असतो आपण, हे लक्षात आले.

दुसऱ्या दिवशी घराच्या अगदी जवळ असलेल्या एका मॉलमध्ये गेले. काही जरुरी सामान घेतले आणि मॉलची ढकलगाडी ढकलत रिक्षा स्टॅण्डपर्यंत आले. एका रांगेत आठ ते दहा रिक्षा उभ्या होत्या आणि ते रिक्षावाले मॉलमधून गाडी ढकलत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडे पाहत होते. मी बाहेर येत असतानाच तिघा-चौघांनी एकदमच विचारले की, कुठे जायचे आहे? मी माझ्या घराचा पत्ता सांगताच सगळे मागे फिरले याचे कारण माझे घर फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर होते. इतक्या जड बॅगा घेऊन मला दोन पावलंसुद्धा टाकणे मुश्कील होते तरीसुद्धा मी त्या सर्व रिक्षावाल्यांना ओलांडून रस्त्याच्या पलीकडे चालत गेले आणि मग तिथे कोणती तरी रिक्षा मला मिळाली आणि मी घरापर्यंत आले.

काही रिक्षा-टॅक्सी स्टॅण्डवर सरकारने नेमून दिलेली माणसे लाइनीतून आलेल्या प्रत्येक माणसाला रिक्षा-टॅक्सी मिळवून देण्याचे काम करतात, पण ही सेवा सर्वत्र उपलब्ध नाही. वाढती लोकसंख्या आणि रिक्षा-टॅक्सी चालकांची मनमानी यामुळे सामान्यांचे हाल होत असतात. या आठवड्यात घडलेल्या या दोन घटना जरी मी इथे देत आहे, तरी यानिमित्ताने प्रत्येकाला अनेक घटना निश्चितपणे आठवतील! कधी कधी आपण स्वतःलाच अशा समस्येसाठी मदत करू शकत नाही, तर दुसऱ्यांना कशी मदत करणार, याचा विचार करून मी अस्वस्थ होते. रिक्षा-टॅक्सीचालकांच्या समस्या असणारच, फक्त त्या समस्या आणि त्यामागची त्यांची मानसिकता मी जाणत नाही. सरकारपर्यंत कोणतीही गोष्ट कशी पोहोचवावी, याचाही मनात विचार चालू आहे. यावर निश्चितपणे काही नियम करून या समस्येवर उपाय शोधता येईल का, याचा विचार या लेखाच्या निमित्ताने सुज्ञ वाचकांनाही मांडावा, अशी अपेक्षा आहे.

pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -