Share

नक्षत्रांचे देणे: डॉ. विजया वाड

मुलं हौसेनं कॉन्व्हेंटमध्ये घाला की काही करा… बरोब्बर मराठी मित्र पकडतात नि चक्क मराठीत बडबडतात. २७ फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन होता नि इंग्रजी शाळेतही सरकारी फतव्याचे योग्य पालन केले गेले होते. महाराष्ट्रात राहाता ना? मग सुरेश भट यांची कविता प्रत्येकास मुखोद्गत हवी. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’… प्रथम मुख्याध्यापकांनी ती आठवडाभर आधी (२७ फेब्रुवारीच्या) आत्मसात केली. लगेच साऱ्या शिक्षकांना ती मुद्रांकित करून वाटली. ‘वर्गावर्गात म्हणून घ्या’ आज्ञापत्र काढले. ‘आले हेमाच्या मना तेथे कोणाचे चालेना.’ अशी समस्त शिक्षक वर्गाची दैना झाली. फर्नांडिस, डिसूझा, मस्कारोन्हास, कोणीही का असा! ‘बोलतो मराठी’ हा पाढा वाचा म्हणजे झालं.

शिक्षकांना सवय आज्ञा सोडायची. पण आता आले का स्वत:च्या अंगाशी? हेमा स्वत: वर्गावर्गात जाणार होते. त्याप्रमाणे वीसही तुकड्या त्यांनी पार केल्या नि समाधान पावत आपल्या खुर्चीत विराजमान झाले. शिक्षण निरीक्षक आले तरी आता चिंता नव्हती. त्यांची मान उंच होती. ‘लाभले आम्हास भाग्य’ त्यांना चालीवर पाठ होती. वर्गावर्गात पाठ करून घेतली होती. आता चिंता नव्हती. शिक्षण निरीक्षकच काय? त्यांचा बाप (चुकले) तीर्थरूप आला/आले तरी काळजी नाही. मराठीचा जयकार चक्क इंग्रजाळलेल्या शाळेत! वा! व्वा! व्वा!… स्वत:ची पाठ हेमांनी पुन्हा पुन्हा थोपटली. शहाण्या बायकोकडून ती वारंवार थोपटून घेतली. मुलांना (स्वत:च्या) ती कविता येते ना? याची खातरजमा करून घेतली.

मुक्ता (हेमाचे कन्यारत्न) म्हणाली, “बाबा, आम्हाला इंग्रजी शाळेत का घातलेत?”
“इंग्रजी फाडफाड बोलता यावे म्हणून.”
“त्याने काय होणार?”
“बरंच काही साध्य होईल.”
“विस्ताराने सांगा.”
“सांगतो.” बाबांनी आसन जमवले.
“हे बघ मुक्ता, इंग्रजी येणं भलं असतं. लोकांवर पटकन् छाप पडते. छाप पडली की मुलाखतीत निवड होणं सोप्पं जातं.”
“पण आता तर मराठीचाच बोलबोला होतो आहे.”
“मराठी दिवस आहे ना?”
“फक्त २७ फेब्रुवारी पुरताच मराठीचा बोलबाला?”
“अगं नाही मुक्ता. मराठी आपली मातृभाषा आहे.”
“मग इंग्रजी शाळेत का घातले?”
“मी मराठी शाळेत शिकलो नि इंग्रजीचा सराव नसल्याने कार्यालयात मागे पडलो.”

“तुम्ही झालात की हेडक्लार्क.”
“पण मोठ्ठा साहेब नाही ना झालो.”
“हो. तेही खरंच म्हणा. मी होईन ना साहेबीणबाई?”
“साहेबीण म्हणजे नोकरीत साहेब हो.”
“तेच म्हणते मी.”
“माझे आशीर्वाद आहेत बाळा तुला.”
“आता रोज १० ओळी शुद्ध मराठीत लिही, बरं का मुक्ता!”
“हो बाबा. १० ओळी म्हणजे टू मच होतात पण बाबा.”
“मग किती ओळी?”

“पाच ओळींनी सुरुवात करू. मग सहा, मग सात, मग आठ, मग नऊ नि एकदाच्या मग दहा! मग बास् हं बाबा.”
“खरंच बास हो!” आईने लेकीची कड घेतली. लेकीला जास्तीचा लिखित त्रास होऊ नये अशी तिची स्वाभाविक इच्छा होती आणि पाच ओळी मुक्ताने लिहिल्या. चक्क मराठीत! त्या अशा… “मला बाबांनी मराठी लिव म्हणून सांगले. मी लिवते. मी मराठी बोलते सुद्ध! पण ते पुरेसे नाय त्यांना. लिवता आलं पायजेल. वाचता आले पायजेल. तरच आपुन मराठी. तरच मराठीचा आपुनला अभिमान. असे काय काय बडबडले. पन खरं सांगू का? मला इंग्रजी शाळेत घालून बाबांनी चूक क्येली. फुक्कटची शिक्षा! पाच ओळी संपल्या. हुश्श!”

आईने तपासले. वाहवा केली. बाबांनी चुका काढल्या. ‘लिव’ नाही लिही. सांगले नाही सांगितले. सुद्ध नाही, शुद्ध! नाय नाही, ते ‘नाही’ हवे. आपुन नाही ‘आपण.’ क्येली नाही, केली. फुक्कटची नाही ‘फुकटची’… आता दमलो. चुका काढून.
लेक म्हणाली, “बाबा काळजी करू नका. मी गाजवणार माझे भाषण.” “चुकाविरहित बोल बाळ.”
“अहो बाबा, मी ‘मराठीण’ आहे.” “मराठीण?” बाबांनी विचारले.
“मालकला फेमिनाईन जेंडर मालकीण ना? तसं मराठीण!” बाबांनी कपाळाला हात लावला.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर २४ तासाच्या तपासाची माहिती! दहशतवाद्यांबद्दल ४ गोष्टी जाणून घ्या

नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…

8 minutes ago

Load shedding : उकाड्यामुळे वीजेची मागणी वाढली! भारनियमन होणार का?

मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…

16 minutes ago

चीनमध्ये ‘गोल्ड एटीएम’चा धुमाकूळ; आता एटीएमद्वारे सोने द्या, पैसे घ्या!

शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…

35 minutes ago

तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे हादरली जमीन

तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…

37 minutes ago

IPL 2025 on Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ MI विरुद्ध SRH सामन्यात मोठे बदल, मृतांना दिली जाणार श्रद्धांजली

चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू  हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…

39 minutes ago

Aatli Batmi Futli : ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटात मोहन आगाशे आणि सिद्धार्थ जाधवची दिसणार केमिस्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…

42 minutes ago