Saturday, July 20, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथननवे शिक्षण धोरण व भाषा संवर्धन

नवे शिक्षण धोरण व भाषा संवर्धन

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सर्वत्र होऊ घातली आहे. सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनावर हे धोरण भर देते. नव्या शैक्षणिक धोरणातील भाषाविषयक तरतुदी खालीलप्रमाणे :
– त्या त्या राज्याची भाषा, हिंदी व इंग्रजी हेे कोठारी आयोगाचे त्रिभाषा सूत्राचे धोरण नव्या शैक्षणिक धोरणातदेखील स्वीकारले आहे.

– शालेय स्तरावर शक्य होईल, तिथपर्यंत स्थानिक भाषा शिकवली जावी व आठवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून दिले जावे या मुद्द्यावर भर दिला आहे. (दहावीपर्यंत मातृभाषेतून शिक्षणाची निवड हे उचित वाटते कारण, तोच सहज व आनंददायी शिक्षणाचा पर्याय आहे.)

– मातृभाषा व इंग्रजी दोन्ही सक्षम व्हाव्या यादृष्टीने प्रयत्न करण्यावर नव्या शैक्षणिक धोरणात भर दिला आहे. सर्व पाठ्यपुस्तके मातृभाषा व राज्यभाषेत उपलब्ध असावीत.

– प्रत्येक जिल्ह्यात असे बहुशाखीय विद्यापीठ असावे, जिथे स्थानिक भारतीय भाषा हेे शिकवण्याचे माध्यम असेल.

– संस्कृत, अभिजात भारतीय भाषा, पाली, प्राकृत, पर्शियन भाषांचे साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हायला हवे.
या वरील मुद्द्यांसोबत नव्या शैक्षणिक धोरणात माध्यमिक स्तरावर थाई कोरियन, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज आणि रशियन अशा भाषा शिकण्याकरिता संधी असतील, असाही एक मुद्दा आहे. या मुद्द्याची चिकित्सा करताना मला असे वाटते की, विदेशी भाषा शालेय वा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करताना त्या आपल्या भाषांना पर्याय म्हणून येतात. मग विद्यार्थी आपल्याच भाषांवर फुल्या मारून विदेशी भाषा शिकतात.

विदेशी भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या स्वरूपात अध्ययनासाठी उपलब्ध असाव्यात. ज्यांना त्या शिकायच्या आहेत, ते त्यांचा अभ्यास करतील पण त्यांच्यामुळे आपल्या भाषांवर घाला येऊ नये. मात्र आपल्या भाषांच्या बाबतीत आपणच कधी फारसे सजग व संवेदनशील नसतो. विदेशी भाषा ही परदेशगमनाची किल्ली वाटल्याने त्यांचा स्वीकार शालेय जीवनापासूनच केला जातो, जणू मुलांना आपल्या भाषांशी जोडणारा धागा नकोच आहे, मग शालांची निवडही तशीच केली जाते. मुलांना आपल्या भाषांपासून तोडण्याचे काम पालकच करतात.

नवे धोरण उच्च शिक्षणात आपल्या भाषेतून अध्ययन करता यायला हवे या मुद्द्यावर भर देते. मराठीपुरते बोलायचे, तर त्याकरिता विविध ज्ञानक्षेत्रांशी निगडित कोणकोणती पुस्तके मराठीत अनुवादित झाली आहेत, याचा अभ्यास महत्त्वाचा ठरेल. तो अनेक दिशांनी व्हायला हवा.

आज खूप पुढची वाटणारी गोष्ट वेगाने कालबाह्य होते त्याकरिताच अद्ययावत असणे हे सर्व स्तरांवर गरजेचे आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात तर अधिकच! पर्यावरण, तंत्रज्ञान, इतिहास, भूगोेल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र अशा विविध विषयांचे नवनवीन ज्ञान आपल्या भाषांमध्ये जितक्या लवकर येईल तितके ते शिक्षणक्षेत्रात अध्ययनाकरिता खुले होईल. एकीकडे याकरिता पुढाकार घेणे व दुसरीकडे आपल्या भाषांमधून व्यवसायाच्या संधी निर्माण करणे अपरिहार्य आहे. मराठी भाषा आपोआप जगेल नि ती आचंद्रसूर्य नांदेल अशा भ्रामक कल्पनांतून बाहेर पडून मायभाषेच्या संवर्धनासाठी कृतिशील पावले उचलावीच लागतील!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -