हलकं-फुलकं: राजश्री वटे
आता भेटू पुढच्या वर्षी… असं म्हणत गुलाबी थंडीने निरोप घेतला… हिवाळ्याचं सकाळचं कोवळं ऊन पांघरायला मन आतुर असायचं, खिडकीतून उन्हाचे कवडसे घरात डोकवायचे, तेव्हा अलगद उन्हाच्या मिठीत शिरायचं… कानावर ‘घनश्याम सुंदरा’ ही भूपाळी हलकेच साद घालते… ते कोवळं ऊन अंगावर झेलत वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेत मनातील सुखाचा शोध घ्यावा! खरंच, आपल्याला कळतं का सुख नेमकं कशात असतं… नाहीच कळत… शोधावं लागतं ते !!
निसर्गाचं देणं म्हणजे सुख… जसं गुलाबी थंडीत असतं, कोवळ्या उन्हात असतं… धरतीला कवेत घेण्यासाठी ऊन खाली उतरतं, तेव्हा सूर्याचं दर्शन घ्यावं… तेव्हाच फक्त डोळे भरून पाहू शकता त्याचं तेजस्वी रूप… मन प्रसन्न होऊन जातं.
कोवळं ऊन अंगावर झेलत गवतावर अनवाणी चालून पाहायचं… दवबिंदूंचे मोती पायाला लगडून जातात… तो ओलसर स्पर्श नखशिखांत थंडावा देतं… देहापासून मनापर्यंत! गवतातील पायवाटेवरून रमत-गमत सैर करा… सुखावतो, मखमली स्पर्श गवताच्या पात्यांचा… आठवण करून देतो, जेव्हा आईचं बोट धरून याच वाटेनं गेला होतात तिचा मायाळू स्पर्श अनुभवत… अजूनही गंधाळली आहे ती वाट… आभास आहे तिचा त्या वाटेवर! असा पहाटेचा आनंद मनावर झेलत श्वासात मोगरा भरून घ्यावा… मनाच्या गाभ्यापर्यंत!
केशरी दांडीचा पारिजात शीर्षासनात पाहून हसावे मनसोक्त… अंगणात सडा टाकून पाण्याने सुगंधित झालेली माती अंगावर रांगोळीची नक्षी काढून निवांत पहूडली आहे, ते बघून दारावरील तोरण झुलते आहे… किती मन प्रसन्न करणारी सकाळ… सुखाचंं ऊन पेरणारी… निंबोणीच्या झाडावर बांधलेल्या झोक्यावर सुखाचे हिंदोळे घेत जगावं मनसोक्त… निवांत क्षणी आवडतं पुस्तक वाचत लोळत पडावं… त्यातील भावनिक प्रसंगात गुंतून जातं मन हळुवार आणि हलकेच डुलकी लागते नकळत… सुखाची! कधी एकटंच पाहावं एखादं नाटक, सिनेमा… संवाद घडतो त्या पात्रांशी… मनाचा एक वेगळाच सुखद अनुभव… थ्रिलिंग! लहान बाळाला कवटाळून, बेबी पावडरचा येणारा सुवास भरून घ्यावा श्वासांत, रोमरोम फुलून येईल प्रेमानं… लडिवाळ सुख!
कधी कुणाचं म्हातारपण न्याहाळावंं कुतूहलाने… एखादी आजी सकाळीच तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालत असते… तो टवटवीत उत्साहाचा झरा टिपून घ्यावा अलगद… आजोबांच्या काठीला धरून फिरून यावे जोडीनं मजेत! दिवसातून एकदा तरी प्यारवाली झप्पी द्यावी घरातल्यांना… ओंजळ सुखाने भरून जाते! जाता जाता… ‘काही तरी दे’ म्हणत समोर आलेल्या हातावर ‘ते काहीतरी’ देणं म्हणजे आंतरिक समाधानाचा अनुभव! खळखळून गप्पा मारणाऱ्या मैत्रीचा आस्वाद घ्यावा रम्य संध्याकाळी… मंद समईच्या उजेडात देवाला न्याहाळून पाहावं. मला सगळं सुख दिलंस म्हणून आभार मानावे… आई-वडिलांसमोर नतमस्तक व्हावे… स्वत:मध्येच सुखाचे मार्ग सापडत जातात…
समुद्रकिनारी लाटांनी पाय भिजवत वाळूत पायांनी रेघोट्या ओढत दूरवर चालत जावं… सागराशी मनाची देवाण-घेवाण घडणारच… दूरवरून येणाऱ्या मंदिरातील घंटानाद कान तृप्त करून जातो… नकळत हात जोडले जातात भक्तीने! मंत्रोच्चार करत डोळे मिटून ध्यानस्थ व्हावे… अशा सुखाच्या पायऱ्या चढत जातात मनातील… नक्कीच सुख म्हणजे काय असतं याचं उत्तर सापडेल!! मनाच्या सतारीची तार छेडावी… हार्मोनियमवर बोटे फिरवावी लयीत… तबल्यावर ताल धरावा… ढोलकीवर थाप मारावी हलकेच… मनातच रंगू द्यावी मैफल गाण्याची… कैफ चढत जातो सुखाचा!
होळीच्या रंगात न्हाऊन जावं… टाळाच्या गजरात भान थिरकावं… देवीचा जागर करावा… पावसात झिम्माड होऊन जावं… दिवाळीत पणतीच्या प्रकाशात न्हाऊन निघावं… दूरवरून ऐकू येणारी संबळ… काया दणदणून जाते… आतल्या आत नाचून घेतं मन जोशात!! असं दिवसभर सुखाच्या शोधात भटकणारं मन रफी-लताचं जुनं गाणं ऐकत झोपेच्या आधिन होतं… निवांत होत सुखाने रात्रीच्या कुशीत शिरतं… पुन्हा उद्याचा नवा सूर्योदय बघण्यासाठी…
सुख शोधताय ना…? आहे की तुमच्याच अवती-भवती!!!