Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडीराजकीय

Rajsthan politics : राजस्थानमध्ये ३२ नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडत हाती धरले कमळ!

Rajsthan politics : राजस्थानमध्ये ३२ नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडत हाती धरले कमळ!

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का!


जयपूर : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) तयारीत सर्व राजकीय पक्ष (Political parties) गुंतलेले असतानाच काँग्रेसला (Congress) मात्र ऐन निवडणुकांच्या वेळी पक्ष सोडून चाललेल्या आपल्या नेत्यांची चिंता करावी लागत आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वी राजस्थानमध्ये (Rajsthan) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे निकटवर्तीय असलेले माजी मंत्री आणि काँग्रेस नेते लालचंद कटारिया यांच्यासह पक्षाच्या ३२ नेत्यांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला आहे.


मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, भाजपा प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत जयपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात काँग्रसेच्या ३२ नेत्यांचा भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसच्या या आघाडीच्या नेत्यांसह त्यांच्या अनेक समर्थकांनी पक्षाची साथ सोडत कमळ हातात घेतले.


राजस्थान काँग्रेसमध्ये पडलेल्या या फुटीमुळे येथील समीकरणं बदलली आहेत. काँग्रेसची साथ सोडून भाजपात आलेल्या नेत्यांमध्ये नागौरमधील अनेक दिग्गज जाट नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसमधून झालेल्या पक्षांतरामुळे भाजपामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर आता राजस्थानमध्ये पुन्हा एकदा २५ पैकी २५ जागा जिंकण्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे.



पक्षांतर करणार्‍या नेत्यांमध्ये कोणाचा समावेश?


काँग्रेस सोडून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांमध्ये लालचंद कटारिया यांच्यासह गेहलोत सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेले राजेंद्र यादव, माजी आमदार रिछपाल मिर्धा, खिलाडीलाल बैरवा, आलोक बेनीवाल, विजयपाल मिर्धा, भीलवाडाचे माजी जिल्हाध्यक्ष रामपाल शर्मा यांचा समावेश आहे. या नेत्यांपैकी कटारिया हे अशोक गेहलोत यांचे समर्थक आहेत. तर खिलाडीलाल बैरवा हे सचिन पालयट यांचे कट्टर समर्थक आहेत. तसेच रामपाल शर्मा हे सी.पी. जोशी यांचे निकटवर्तीय आहेत.


भाजपामध्ये आलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये दोन माजी मंत्री आणि ४ माजी आमदारांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय माजी आमदार रामनारायण किसान, अनिल व्यास, निवृत्त आयएएस ओंकार सिंह चौधरी, गोपालरामा कुकुणा, अशोक जांगिड, प्रिया सिंह मेघवाल, सेवालदाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश चौधरी, राजेंदेर परसवाल, शैतान सिंह मेहरडा, रामनारायण झाझडा यांचाही समावेश आहे.

Comments
Add Comment