विशेष : मंजिरी ढेरे
उन्हाळा दाह वाढवणारा असतोच; खेरीज परीक्षांचा हा काळा मानसिक ताप आणि ताण वाढवणाराही असतो. अशा या तणावग्रस्त वातावरणामध्ये उन्हाच्या झळा अंमळ जास्तच तीव्र जाणवतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पूर्वीपासूनच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा अवास्तव ताण घेण्याची पालक आणि विद्यार्थ्यांची मानसिकता राहिली आहे. आता तर ही व्याधी संसर्गजन्य आजारासारखी पसरली असून मुले स्नेहसंमलनांच्या ‘कचाट्या’तून बाहेर पडून कधी एकदा परीक्षेच्या तयारीला लागतात, असे पालकांना होऊन जाते. बरे, आता हा तणाव धारण करण्यासाठी दहावी वा बारावीच्या परीक्षांची वाटही पाहिली जात नाही. अगदी आठवी-नववीच्या परीक्षांपासून याचे पडघम कानी येतात आणि शेवटची थाप करिअरकडे नेणाऱ्या ‘अंतिम पग’वर पडते. तोपर्यंत ते लहानगे आणि काळानुरूप वय वाढत जाणारे विद्यार्थी याच ओझ्याखाली परीक्षा देत राहतात. खरे पाहता इतक्या परीक्षा दिल्यानंतर, परीक्षांच्या सिद्धतेच्या अनेक पातळ्या अभ्यासल्यानंतर, शिकवण्या आणि इतर साहित्याच्या मदतीने भरपूर अभ्यास केल्यानंतर परीक्षांचा बागुलबुवा वाटण्याची काहीच गरज नाही. मात्र आज आठवीच्या विद्यार्थ्यांपासून तिशीच्या वयातील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीदशेतील मुला-मुलींनाही तो वाटतो आणि यामुळे येणाऱ्या ताण तसेच नैराश्यातून उमलत्या वयात काही आत्महत्येचे पाऊलही उचलतात. म्हणूनच दहावी-बारावीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांच्या परीक्षांचा काळ संपत आला असला तरी खालच्या वर्गाच्या परीक्षांचा तसेच वर्षभर सुरू असणाऱ्या कोणत्या ना कोणत्या स्पर्धा परीक्षांचा काळ लक्षात घेता यावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे ठरते.
यातील पहिला मुद्दा अर्थातच परीक्षांची पूर्वतयारी आणि तणावाच्या व्यवस्थापनाचा आहे. परीक्षेपूर्वीचे हे काही दिवस अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात. परीक्षा जवळ आली असताना वर्षभर केलेल्या अभ्यासाचा, मेहनतीचा कस लागणार असतो. म्हणूनच अभ्यासाला आणि दैनंदिन वेळापत्रकाला योग्य दिशा देण्यासाठी विद्यार्थ्यांना काही टीप्सचा उपयोग होऊ शकतो. त्यांचा अवलंब केल्याने परीक्षेचा ताण येणार नाही आणि अभ्यासाची भीतीही वाटणार नाही. अभ्यास प्रामाणिकपणे केला आणि डोके शांत ठेवून पेपर लिहिले की काम फत्ते! मात्र काम फत्ते होण्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावे लागतील, हेही खरे. बऱ्याच विद्यार्थ्यांना जास्तीत-जास्त गुण मिळवून उज्ज्वल भविष्याची कवाडे उघडायची असतात, तर काहींना उत्तीर्ण होण्यापुरते गुण मिळवून गाडी पुढे ढकलायची असते. विद्यार्थी कोणत्याही क्षमतेचे असोत, परीक्षेला निर्भयतेने सामोरे जाणे हेच प्रत्येकाचे ध्येय असते. ते पूर्ण करण्यासाठी गरज असते ती थोडे सजग राहण्याची.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षांच्या काळात स्वत:वर प्रमाणापेक्षा जास्त ओझे लादून चालणार नाही हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे. हा विद्यार्थीदशेतील महत्त्वाचा टप्पा असला तरी प्रत्येक पाऊल संयमाने टाकायला हवे. या काळात आपल्या क्षमतेला जास्तीत-जास्त वाव देण्याचा प्रयत्न करावा. हे करताना मन शांत आणि एकाग्र ठेवावे. एका मर्यादेपेक्षा जास्त ताण घेतला, तर अभ्यासात लक्ष लागणार नाही. परीक्षांच्या काळात दिनक्रम काहीसा बदलावा लागतो. पण चोवीस तास पुस्तक समोर धरून किंवा रात्री जागरण करून काहीही साध्य होत नाही. त्यापेक्षा मन लावून ठरावीक वेळ अभ्यास केला, तर फायदा होतो हे कायम स्मरणात ठेवावे. परीक्षा अगदी जवळ येऊन ठेपली असताना विद्यार्थ्यांनी अभ्यासातील नवीन बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करू नये. आतापर्यंत केलेल्या अभ्यासाची शांत चित्ताने उजळणी करावी. उजळणी करण्यासाठी दिवसभरातील वेळ तीन विषयांसाठी वाटून घेता येईल.
प्रत्येक विषयाच्या उजळणीला सुरुवात करण्यापूर्वी थोडी विश्रांती घ्यावी. या विश्रांतीमुळे मन ताजेतवाने होते आणि आधी केलेला अभ्यास नीट लक्षात राहतो. प्रत्येक विषयासाठी दिलेला वेळ वाचन आणि लिखाणाचा सराव यामध्ये विभागावा. मूळ परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका सोडवताना या सरावाचा उपयोग होतो. अभ्यास करताना अवघड वाटणाऱ्या मुद्द्यांवर जास्त भर द्यावा. सोपा वाटणारा अभ्यास करण्यासाठी कमी वेळ लागतो. आधी सोपा अभ्यास केला आणि नंतर अवघड विषय हातात घेतले की, अभ्यास नीट होत नाही आणि वेळही वाया जातो. उजळणी करताना संपूर्ण पुस्तक वाचण्यावर भर देऊ नये. असे केल्याने शेवटी शेवटी कंटाळा येतो आणि एखादा महत्त्वपूर्ण पाठ्यक्रम दुर्लक्षित राहतो. या दिवसांमध्ये आपण किती अभ्यास करतो यापेक्षा मित्र-मैत्रिणी किती अभ्यास करतात, याकडे काहींचे लक्ष असते. हे टाळून इतरांना अभ्यास करायला किती वेळ लागतो याची तुलना करत आपल्याला जास्त वेळ का लागतो, याचा विचार करत बसू नये. असे करून आपण स्वत:लाच निराश करतो.
कोणत्याही परीक्षेची तयारी करताना टाइम मॅनेजमेंटचे महत्त्व समजून घेणे गरजेचे असते. वेळेचे अचूक गणित आखता आले, तर अभ्यासही व्यवस्थित होतो. परीक्षांच्या या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी स्व-अभ्यासावर भर द्यायला हवा. मागच्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर दिला, तर उपयोग होतो. अभ्यासामध्ये काही अडचण असेल तर आई-वडिलांची, शिक्षकांची किंवा मित्र-मैत्रिणींची मदत घेता येईल. नोट्स तयार करून अभ्यास करणेही हिताचे ठरेल. या नोट्समध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहिण्यापेक्षा मुद्दे स्वरूपात लिहिली, तर कमी वेळेत अधिक फायदा होतो. आपल्याला केवळ परीक्षेसाठी आणि चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास करायचा नसून त्या ज्ञानाचा भविष्यात उपयोग झाला पाहिजे, हा विचार कायम लक्षात ठेवावा. त्या दृष्टीने घोकंपट्टीवर भर न देता सर्व विषय मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सर्व विषयांच्या अभ्यासासाठी समान वेळ द्यावा. अभ्यासाला महत्त्व देण्याबरोबरच आहाराकडे आणि आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असते. पुरेशी झोप घेतली, तर आरोग्य उत्तम राहते.
परीक्षेच्या पहिल्या दिवशीच आपला बेंच तुटलेला नाही ना, आजूबाजूला कॉपीच्या चिठ्ठ्या नाहीत ना, याची खात्री करून घ्यावी. परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश केल्यावर परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळ आधी पुस्तक हातात धरून बसू नये. कारण, त्यावेळी मनावर ताण असतो. या परिस्थितीत आतापर्यंत केलेला अभ्यासही विसरण्याची शक्यता असते. भाषा विषयांची प्रश्नपत्रिका सोडवताना निबंध, पत्र असे सविस्तर प्रश्न सर्वप्रथम सोडवण्यास प्राधान्य द्यावे अन्यथा, पहिले काही प्रश्न सोडवण्यात खूप वेळ जातो आणि निबंध, पत्र यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे लिहिताना खूप कमी वेळ हाताशी उरतो. कमी गुणांची उत्तरे एक-दोन ओळींमध्ये संपवावीत. फापटपसारा लिहीत बसू नये. मोठ्या प्रश्नांची उत्तरे लिहिताना मुद्दे मांडण्यावर भर द्यावा. पेपर सोडवताना आजूबाजूला काय चालले आहे ते न पाहता लक्ष आपल्या लेखनावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा.
या संपूर्ण काळात पालकांनी मुलांच्या खाण्या-पिण्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असते. याचा अर्थ त्याने तिन्ही त्रिकाळ पोळी-भाजी, भात-आमटी असाच आहार घ्यावा असे नाही. फळांचे ज्यूस, सॅलड अशा पदार्थांचा आहारात समावेश करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे आवडीच्या पदार्थांनाही प्राधान्य द्यावे. जंक फूड मात्र कटाक्षाने टाळले पाहिजे अन्यथा, ऐन परीक्षेच्या वेळी मुलांची तब्येत बिघडू शकते. घरातील मुलगा किंवा मुलगी महत्त्वपूर्ण इयत्तांच्या परीक्षा देणार असते, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. दुसरीकडे कुटुंबातील घडामोडींचा परिणामही मुलांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे परीक्षेच्या काळात घरातील वातावरण शांत ठेवणे आवश्यक असते. या काळात आई-वडिलांनी भांडणे आणि मतभेद टाळायला हवेत. या काळात मुलांना आई-वडिलांच्या पाठिंब्याची गरज असते. त्यामुळे परीक्षेचे आणि अभ्यासाचे अकारण ओझे न लादता त्यांनी हातात पुस्तक धरून बसायलाच हवे, असा आग्रह धरू नये. त्याच्याबरोबर मोकळ्या वेळेत फिरताना अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांवर हलक्या-फुलक्या गप्पा माराव्यात. सलग तीन-चार तास अभ्यास केल्यावर त्यांना काही वेळ फिरायला घेऊन जावे. विशेषत: संध्याकाळी एक फेरफटका मारल्याने ताजेतवाने वाटते. परीक्षेच्या काळात मुलांनी मित्र-मैत्रिणींशी संपर्क ठेवू नये, असा आग्रह धरणेही चुकीचे आहे. याचे कारण दिवसातील काही वेळ मित्र-मैत्रिणींशी बोलल्याने मन हलके होते. अभ्यासाबाबतही चर्चा करता येते. मनमोकळ्या गप्पांमुळे मुलांच्या मनावरील ताणही हलका होतो आणि ते परीक्षेसाठी मानसिकदृष्ट्याही सज्ज होतात.