Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलकृत्रिम उपग्रह

कृत्रिम उपग्रह

आपल्या पृथ्वीभोवतीच्या हवामानाचा, वातावरणाचा, सूर्यमालेतील ग्रह, उपग्रहांचा, आकाशातील घटनांचा अभ्यास करण्यासाठी काही देश उपग्रह आकाशात सोडतात. ते फक्त पृथ्वीभोवतीच पृथ्वीच्या गतीने व दिशेने फिरतात म्हणून त्यांना भूस्थिर उपग्रह म्हणतात. रेडिओंचे, दूरदर्शनचे संदेश वा इतर प्रकारचे संदेशवहनही या उपग्रहांमार्फत होते. भारतानेही असे अनेक कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले आहेत.

कथा : प्रा. देवबा पाटील

नंदपूरचे आनंदराव हे आपल्या शेतात सतत खपणारे एक साधारण शेतकरी होते. त्यांना बऱ्याच वर्षांनंतर एक सुंदरसे, गोंडस, गोड असे कन्यारत्न झाले. त्यामुळे घरात सर्वच अतिशय आनंदात होते. आनंदरावांनी आपल्या लाडलीचे नाव यशश्री असे ठेवले. दिसामासाने यशश्री वाढत होती. आनंदराव तिला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपत होते. आईचा तर ती जीव की प्राण होती. शैशवावस्थेतच तिच्या अंगच्या गुणांची चुणूक दिसू लागली. शैशवपणापासूनच तिची हुशारी, चौकस प्रवृत्ती दिसून आली. तिला समजायला लागल्यापासून ती सतत तिच्या आईला व आनंदरावांना वेगवेगळे बालसुलभ प्रश्न विचारायची. आई-बाबाही तिच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे द्यायचेत.

निसर्गाची तर तिला खूपच आवड होती. वडिलांच्या मागे लागून, त्यांच्या दुचाकीवर बसून ती शेतात जायची.तेथे शेतात बाबांसोबत फिरणे, मस्त बागडणे, उडते फुलपाखरे, पक्षी बघणे, निसर्गाचा आनंद लुटणे यात तिला खूप मजा वाटायची. पाळीव पशूंचा, पाखरांचा तिला चांगलाच लळा होता. दारी आलेल्या कुत्र्याला पोळी टाकणे, पाखरांना दाणे टाकणे या गोष्टी तर ती आठवणीने करायची. अंगणात पाखरांना दाणे टाकले की आजीसोबत पाखरांची दाणे टिपण्याची मजा बघत बसायची. ती संध्याकाळच्या वेळी बाबांसोबत गच्चीवर बसून आकाशातले चंद्र-चांदण्या बघण्यात भान हरपून जायची. बाबांना आकाशाबद्दल, चंद्र-चांदण्यांबद्दल सतत वेगवेगळे प्रश्न विचारायची. तर अशी ही यशश्री दिसामासाने मोठी होत होत आठव्या वर्गात गेली. एका दिवशी तिला तिच्या वर्गात वर्गशिक्षिकेने आपल्या सूर्यमालेबद्दल शिकविले. त्यादिवशी रात्री तिने घरी सगळ्यांची जेवणे आटोपल्यानंतर आपला अभ्यास आधी पटकन आटोपून घेतला. नंतर आपल्या बाबांजवळ गेली नि म्हणाली, “बाबा, आपण आपल्या घराच्या गच्चीवर बसू याना.”

“हो, बेटा. चल.” तिचे बाबा म्हणाले.

दोघे बाप-लेकं गच्चीवर गेले. गच्चीवर गेल्यावर एका ठिकाणची जागा झाडूने साफ करून ते बाप-बेटे तेथे बसले.

“बाबा, या चांदण्या किती सुंदर दिसतात, कशा छान छान चमकतात, काही मस्त लुकलुकतात.” ती म्हणाली.

“हो बाळा. खरंच खूपच छान दिसतात त्या चांदण्या,” आनंदराव म्हणाले.

“बाबा, बघा तो तारा कसा छान हळूहळू फिरत आहे.” यशश्रीने त्या ताऱ्याकडे बोट दाखवित वडिलांना सांगितले.

“बेटा तो तारा नाही तर आपल्या पृथ्वीवरून आकाशात सोडलेला कृत्रिम उपग्रह आहे,” आनंदराव म्हणाले.

“कृत्रिम उपग्रह! कशासाठी सोडतात बाबा त्याला आकाशात?” यशश्रीने विचारले.

“आपल्या पृथ्वीभोवतीच्या हवामानाचा, वातावरणाचा, सूर्यमालेतील ग्रह, उपग्रहांचा, आकाशातील घटनांचा अभ्यास करण्यासाठी काही देश असे उपग्रह आकाशात सोडतात. त्यांना भूस्थिर उपग्रह म्हणतात. अर्थात ते काही स्थिर नसतात, तर ते सतत पृथ्वीभोवती भ्रमण करीत असतात. पण ते फक्त पृथ्वीभोवतीच पृथ्वीच्या गतीने व दिशेने फिरतात म्हणून त्यांना भूस्थिर उपग्रह म्हणतात. तसेच रेडिओंचे, दूरदर्शनचे संदेश वा इतर प्रकारचे संदेशवहनही या उपग्रहांमार्फत होते. म्हणूनच आपण रेडिओ ऐकू शकतो, टीव्ही बघू शकतो. आजकाल तर या उपग्रहांचे अनेक प्रकारे उपयोग होतात. भारतानेही असे काही उपग्रह आकाशात सोडले आहेत. माहीत आहेत का तुला?” आनंदरावांनी सहजगत्या विचारले.

“हो, बाबा. पहिला आर्यभट्ट, नंतर भास्कर, रोहिणी व आजकाल इन्सॅट, जीसॅट उपग्रहांची मालिका इ.” यशश्रीने सांगितले. ती पुढे म्हणाली, “पण बाबा, ते तर आपल्याला नेहमी आपल्या डोक्यावरच फिरताना दिसतात व चमकतातही.”

“त्याचे असे आहे, पृथ्वीची स्वत:भोवती फिरण्याच्या गतीसमानच उपग्रहांची भ्रमणगती ठेवतात म्हणजे ते पृथ्वीच्याच गतीने व दिशेने फिरतात. त्यामुळे तेसुद्धा पृथ्वीभोवती चोवीस तासांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. म्हणून ते आपणाला नेहमी डोक्यावरच फिरताना दिसतात. तेसुद्धा सूर्याचा प्रकाश परावर्तित करतात म्हणून तेही चमकतात,” आनंदरावांनी सांगितले. “मग त्यांची आपसात टक्कर होत असेल ना बाबा?” यशश्रीने बालसुलभ प्रश्न विचारला. “पृथ्वीचे गुरुत्वबल आणि त्यांचे गतीजबल यांच्या संतुलनाने ते पृथ्वीभोवती फिरते ठेवतात. त्यांची पृथ्वीवरून उंची वेगवेगळी ठेवलेली असते आणि भ्रमणकक्षाही निरनिराळी असते. त्यामुळे त्यांची टक्कर होत नाही. विद्युत चुंबकीय तरंगांद्वारे त्यांचे पृथ्वीवरून नियंत्रण होते व त्यांद्वारेच ते पृथ्वीवर माहिती, संदेश पाठवितात,” आनंदरावांनी सांगितले. अशा त्या बापलेकांच्या गप्पागोष्टी सुरू असताना तिला झोप येऊ लागली व त्यांच्या गप्पा तेथेच थांबल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -