निमित्त: ॲड. मेघना कालेकर
“मेरे सवालों का जवाब दो, दोsss ना” अनेक प्रश्नार्थक आर्जवाने सुरू होणारा रोमांचकारी प्रवास, त्यातून मिळणाऱ्या उत्तराची ओढ तितकीच हवीहवीशी गोड. अनेक काळापासून वेगवेगळ्या क्षेत्रांत, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर “प्रश्न-उत्तरे” यांचा सिलसिला कायमच सुरू झाला. कुतूहल व त्यातून निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांचा घेतलेला शोध, त्यातून मिळालेली उत्तरे. गर्भवतीच्या डोहाळ जेवणावेळी काय अपत्य होणार? यावर तिची केली जाणारी गोड चेष्टा.
आपला अनादी-काळापासूनचा प्रवास हा आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आलेल्या प्रश्नार्थक कुतूहलातून उत्तरांच्या शोधाकडे होत असतो, यातून निर्माण झालेले अनेक क्षेत्रांतील शोध, विज्ञान, आरोग्य, अवकाश, समुद्र, संगीत, शिक्षण यांसारख्या अनेक क्षेत्रांतील प्रगती थक्क करणारी आहे. झाडावरून फळ खालीच का पडते? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधातून विज्ञानाचा शोध लागला. आजवर मागे वळून पाहताना आपल्याला पडलेले अनेक प्रश्न व त्यांच्या उत्तरातून झालेला नावीन्याचा शोध खरेच विस्मयकारक.
वैद्यकीय क्षेत्रांतील विविध प्रश्न, त्यांची उत्तरे, त्यांचे निराकरण व उपाययोजना शोधण्यासाठी निरनिराळ्या औषध योजना अनेकविधयंत्र, त्यांचा आपल्या आरोग्यासाठी झालेला उपयोग याची उपयोगिता आपण सर्वचजण अनुभवत आहोत. कायदा क्षेत्रातील खटल्यादरम्यानचे प्रश्न, त्यावर मिळणाऱ्या उत्तरांमधून कितीतरी समस्या, घटनांची सत्यता पुढे येते. “लीडिंग प्रश्न” (Leading Question) हा नेहमीच ऐकण्यातील शब्द कारण त्यातच मिळणाऱ्या उत्तराची खात्री असते. काही प्रश्न कायम गूढ बनून राहतात. प्रश्नार्थक ‘नजर’ कायम उत्तरे मिळू शकणाऱ्या ‘नजरेचा’ वेध घेते.
शालेय जीवनातील परीक्षेला पालकांनी पहाटे उठवून घेतलेली प्रश्न-उत्तरांची उजळणी आणि प्रत्यक्ष परीक्षेला त्याची झालेली आठवण… परीक्षेचा पेपर सोपा गेला की अवघड गेला? हा परत पडणारा प्रश्न आणि त्याचे उत्तर परीक्षेचा रिझल्ट लागल्यावर मिळणार असते. वर्गात मागे-पुढे बसलेल्या आपल्या वर्गमित्र परिवाराला खाणा-खुणा करून विचारलेले प्रश्न आणि सर्व शिक्षकांच्या नजरेच्या आडून दिलेली उत्तरे हे सर्व आठवले तरी गंमत वाटते आणि आता महत्त्वाच्या परीक्षांच्या प्रश्नांच्या पेपरफुटीचे प्रकरण.
रोमांचकारी नात्यामध्ये प्रश्न नजेतून उत्तर पण नजरेतून जणू शब्दांची गरज नसावी.
“कुछ सवालों के जवाब ‘सवाल’ नही होते।”
कधी काळी ऐकलेला हा संवाद….
राजकपूर व नर्गिसजी यांच्यावर चित्रित झालेल्या “इचक दाना, बिचक दाना, दाने उपर दाना…!” यातून अल्लडपणे विचारली जाणारी प्रश्नार्थक कोडी, त्यातून बुद्धीला चालना मिळून मिळणारी गंमतीशीर उत्तरे.
मराठी चित्रपटांमधून पूर्वी ‘लावणी’ या लोकप्रिय व संस्कृतीप्रधान कलाप्रकारामध्ये “सवाल-जवाब” हा मनोरंजक कार्यक्रम असायचा. दोन प्रतिस्पर्धी लावणी संघांमध्ये समोरा-समोर, आमने-सामने होऊन अतिशय कलात्मकदृष्ट्या अवघड प्रश्न-कोडी गीताच्या माध्यमातून एकमेकांना विचारली जात. यात प्रश्न (सवाल) विचारणारा व उत्तर (जवाब) देणारा यांचे कौशल्य पणाला लागायचे, प्रतिष्ठेची चुरस असायची. “ऐका” असे ठसक्यात म्हणत सुरुवात असायची.
अनेक नावाजलेले, कसलेले कलावंत हा ठेवा जिवंत करून ठेवत. कधी चांगले अनुभव येतात, तर कधी वाईट अनुभव. तेव्हा असे का घडले? कोण? कसे? का वागले आपल्यासोबत हा कायम सतावणारा प्रश्न. हवाई अपघात, विमान अपघातामध्ये त्या संदर्भात असणाऱ्या किती तरी प्रश्नांची उत्तरे त्या घटनेचा (Black Box) ब्लॅक बॉक्स सापडल्यावर मिळणार असतात. सागरी अपघातामध्ये एखाद्या जहाजाला जलसमाधी, अग्निप्रकोप घडल्यावर अनेक नवीन प्रश्न, नवीन कारणे यांचा शोध.
कधी, कधी वाटते काय उपयोग ते मिळून झालेले नुकसान, मनुष्यहानी कधी भरून निघणार आहे का? अगदी कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाच्या उत्तरादाखल या चित्रपटाचा नवीन भाग पाहण्याच्या विनंतीवजा प्रेमळ सूचनेतही प्रश्नच. राजकीय कार्यकाळामध्ये राखून ठेवलेला ‘प्रश्नोत्तरा’चा तास. एखाद्या जीवाचा अचानक संपलेला जीवनप्रवास अनेक प्रश्नांना जन्म देऊन जातो. का झाले? कसे झाले? अविश्वसनीय असे प्रश्न. अनेक प्रकारची प्रश्न-मंजूषा व त्यांच्या अनेक स्पर्धा. “हॉट-सीट”वरच्या स्पर्धकाला अनेक प्रश्नांच्या अडथळ्याची शर्यत पार करून करोडपती बनवण्याची संधी देणारी ‘प्रश्नमंजूषा’ स्पर्धा. “लॉक किया जाय?” खात्रीचे उत्तर मिळण्यासाठी विचारलेला प्रश्न. अनेक नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीमध्ये विचारले जाणारे आव्हानात्मक प्रश्न, त्यांची अनेक वेळा केलेली रंगीत तालीम.
लहानपणी दारी येणाऱ्या ‘भोलानाथ’ला विचारले जाई “सांग, सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?” आणि आता “सांग, सांग भोलानाथ, महामारी संपून परत शाळा सुरू होईल का?” या उत्तर द्यायला भोलानाथही नाही. नुकतीच अनाथांची माय दूरच्या प्रवासाला मार्गस्थ झाली, त्या माऊलीला कायम एकच प्रश्न भेडसावत असे अनेक अनाथ लेकरे, मुक्या गाई यांची पोटा-पाण्याची तहान-भूक कशी मिटेल?
अत्यंत टोकाची हिंसा, अत्याचार पाहण्यास अनुभवास येतो, अनेक नाती संपवली जातात किंवा एवढे क्रूर कोणी का वागू शकतो? असाच प्रश्न पडतो. भर राजसभेत अपमानीत स्त्रीने, संपूर्ण राजसभेला अत्यंत विषादाने, दु:खी अंतःकरणाने विचारलेले अनेक प्रश्न वर्षानुवर्षे आपल्या नजरेसमोर असतात. युद्धभूमीवर पार्थाला पडलेला प्रश्न व त्यातून निर्माण झालेली संभ्रमावस्था आणि ती दूर करण्यासाठी साक्षात भगवंताने उत्तरादाखल केलेली श्रीमद्भगवतगीतेची रचना, अतिशय सुंदर निराकारण. अजूनही कायम नवे-जुने प्रश्न निर्माण होत राहणार, वेगवेगळ्या टप्प्यांवर आयुष्य जगताना आणि त्यांची उत्तरे व त्यातील नवे ‘शोध-बोध’ कधीही न संपणारे…
[email protected]