
आतापर्यंत मोकाट सुटणाऱ्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्या वाचत होतो. हल्ली दिवसेंदिवस पाळीव कुत्र्यांचे हल्ले सुद्धा वाढत असताना दिसून येत आहेत. याचा अर्थ असा की त्यावर कडक कायदेशीर कारवाई झालेली दिसत नाही. जर झाली असती, तर असे धोके वाढले नसते. कुत्रा चावला तर कुत्रा मालकावर कलम २८९ अन्वये ६ महिने कारावास आणि रुपये एक हजार दंड, त्याचप्रमाणे कलम ३२४ अन्वये २ वर्षे कारावास आणि रुपये पाच हजार दंड भरावा लागतो. मग सांगा असे हल्ले होतातच कसे. जर बेकायदेशीरपणे कुत्रा सोसायटीत पाळत असतील, तर त्याची संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस तसेच महानगरपालिकेत तक्रार करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा हल्ल्यांना आळा बसून नागरिकांवरील हल्ले होऊ नयेत म्हणून जनजागृती होणे गरजेचे आहे.
सध्या घरात कुत्रा पाळणे एक फॅशन झाली असली तरी त्यात सर्वसाधारण लोकांना हकनाक त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी प्राणीमित्र जातात कुठे? हा खरा प्रश्न आहे. पाळीव प्राण्यांना घरात पाळायचे असेल, तर त्यांची योग्य प्रकारे नोंदणी करणे आवश्यक असते. त्यांचे पालनपोषण तसेच जर सोसायटीमध्ये राहत असतील, तर त्याचे हमीपत्र सोसायटीला देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे बाहेर फिरताना त्याच्या तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. मात्र कुत्रेधारक अशा नियमांना केराची टोपली दाखवतात. त्यामुळे कुत्र्यांचे हल्ले वाढताना दिसतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या सोसायटीत अशा कुत्र्यांचा वावर असेल त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित बाब कुत्रा धारकांच्या निदर्शनात आणून दिली पाहिजे. अन्यथा सोसायटीतील एक गंभीर बाब म्हणून स्थानिक नगर परिषद किंवा महानगरपालिकेला तशा आशयाची लेखी तक्रार देणे आवश्यक आहे. काही सोसायटीत कुत्रा मोकळा सोडून त्याच्याबरोबर खेळत बसतात. जरी त्यांचा खेळ होत असला तरी इतर रहिवाशांना सोसायटीच्या परिसरात फिरणे अवघड होऊन बसते. आत किंवा सोसायटीच्या बाहेर जाताना जीव मुठीत धरून जावे लागते.
दिवसभर घरात आणि रात्री गळ्यात पट्टा लावून सार्वजनिक रस्त्यावरून कुत्र्यांना फिरविले जाते. बऱ्याच ठिकाणी कुत्र्याला बांधलेला पट्टा काढून रस्त्यावर मोकळा सोडला जातो. त्यामुळे समोरून येणाऱ्या व्यक्तीवर नकळत उडी मारून चावण्याचे प्रकार होत आहेत. असाच हल्ला बोरिवलीमध्ये झाला होता. त्यामुळे एकंदरीत असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिक सुद्धा रस्त्यावरून चालताना कुत्री पाहिल्यावर घाबरताना दिसतात. मग ज्याला कुत्रा चावला असेल त्याची काय अवस्था होत असेल याचा विचार होणे आवश्यक आहे. आपण दररोज वर्तमानपत्रे वाचत असाल, तर अमुकाच्या कुत्र्याने अमुक व्यक्तीचा चावा घेतला. पाहा ना दोन महिन्यांपूर्वी बोरिवली मागाठाणे डेपोच्या बाजूला असणाऱ्या फुलपाखरू मैदानात एका मुलीवर कुत्र्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ठिकाणी असणारे सामाजिक कार्यकर्ते संजय ढेंगळे आणि दिलीप मुनेश्वर यांच्या सतर्कतेमुळे त्या मुलीला इजा होऊ शकली नाही.
वर्षभरापूर्वी कुत्र्यांच्या नादामुळे बोरिवली पूर्व विभागातील सुविद्या विद्यालयाच्या परिसरात एका व्यक्तीला मार खावा लागला होता. तसेच हे प्रकरण पोलीस स्टेशनला सुद्धा गेलेले होते. मागच्या आठवड्यात तर पाळलेल्या कुत्र्याला मोकाट सोडल्याने सुविद्या विद्यालयाच्या समोर एका मुलीच्या हाताला चावा घेतला; परंतु अंगात फूल हाताचे स्वेटर असल्यामुळे ती थोडक्यात बचावली. आज या परिसराचा विचार करता कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पाळीव कुत्र्यांना बिनधास्तपणे मोकाट सोडतात. तसेच त्यांना मोकळे सोडून कुत्रा मालक मोबाइलवर बोलताना दिसतात.
काही जण करमणूक म्हणून कुत्र्यांच्या तोंडात अंदाजे तीन फूट बांबू देऊन चालायला लावतात. जरी यातून कुत्राधारकांची करमणूक होत असली तरी त्यासाठी कुत्र्याला किती त्रास सहन करावा लागत असेल याचा विचार प्राणी मित्रांनी करावा. तसेच कुत्र्यांच्या तोंडाला मास्क लावत नाहीत. काही जण सांगतात की, मला सांगण्याची गरज नाही माझा कुत्रा शिकावू आहे. तो काय करत नाही. मग सांगा असे प्रकार घडतातच कसे, याचा विचार होणे गरजेचे आहे. आपण कारमधून कुत्रा फिरविताना पाहिला आहे. आता तर काही लोक स्कूटरवरून सुद्धा आपल्या कुत्र्याला फिरवितात. मग सांगा हा केवढा मोठा धोका आहे. यावर योग्य ती कायदेशीररीत्या कारवाई होणे आवश्यक आहे तरच असे हल्ले थांबू शकतात. अन्यथा असे हल्ले अधून-मधून होतच राहतील.
यासाठी कायदेशीरपणे पाळीव कुत्र्यांची नोंदणी करायला हवी. त्याचप्रमाणे ज्या सोसायटीत राहत असतील त्या सोसायटीला हमी पत्र द्यायला हवे. सोसायटी परिसरात फिरताना पट्टा बांधावा. लहान मुलांच्या हातात कुत्रा न देता संबंधित व्यक्तीनेच फिरवावे. मुलांच्या हातात कुत्र्याचा बेल्ट देऊ नये. बऱ्याच वेळा मुलांच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या व्यक्तीला कुत्रा चावल्याचे प्रकार घडत आहेत. काही मुले तर कुत्र्याचा बेल्ट सोडून मोबाइलवर बोलत असताना दिसतात. यावर महानगरपालिकेची कडक नजर असली पाहिजे. कारण त्यांना कायदेशीररीत्या परवानगी महानगरपालिका देत असते. पाळीव कुत्री बिनधास्त मोकळी फिरतात, रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांवर लघुशंका करतात. तसेच बाहेरील रबर असेल त्याला चावा सुद्धा घेतात. त्याचे कुत्राधारकाला काहीही देणे-घेणे नसते.
सध्या कुत्रे चावण्याच्या घटना वाढत आहेत. यात सकाळी शाळेत जाणारी मुले आणि रात्री उशिरा घरी येणाऱ्या नागरिकांना अशा कुत्र्यांचा त्रास जास्त सहन करावा लागतो. मागील वर्षा अखेरीस राज्यात ३४९२९७ नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले होते. तर मुंबईमध्ये ४१८२८ जणांवर हल्ले झाले होते. कुत्र्यांचे नागरिकांवरील वाढते हल्ले धोकादायक असल्याने संबंधित विभागाने ज्या विभागात असे प्रकार होतील त्यावर योग्य ती कायदेशीरपणे कारवाई करणे आवश्यक आहे. तरच अशा हल्ल्यांना आळा बसेल.