Wednesday, April 23, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखआदिवासी महिला सक्षम होतील, तो असेल खरा जागतिक महिला दिन!

आदिवासी महिला सक्षम होतील, तो असेल खरा जागतिक महिला दिन!

सुनीता नागरे

संयुक्त राष्ट्र संघटनेने १९७५ या सालापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा यासाठी आवाहन केले. तेव्हापासून ८ मार्च हा जागतिक स्तरावर महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा एक दिवस असा आहे, जेव्हा आपण महिलांना त्यांच्या बलिदान, संघर्ष आणि यशाच्या स्मरणार्थ समर्पित आणि सन्मानित करतो. हा दिवस भारतासह विविध देशांमध्ये महिलांच्या उत्थानासाठी आणि त्यांचे समान हक्क सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या चळवळीचे स्मरण करतो. खरं म्हटलं तर आपण जागतिक महिला दिवस हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा करतो.

आदिवासी भागामध्ये जेव्हा आम्ही विविध कामांसाठी आदिवासी पाड्यावर-तांड्यावर फिरत असतो, तेव्हा आम्हाला प्रकर्षाने असे जाणवते की, आपण जागतिक महिला दिन साजरा करत आहोत. पण एकीकडे आपल्या आदिवासी भगिनी आहेत त्या आजही अनेक संकटांना सामोरे जात आहेत. कुपोषण – आजही आदिवासी महिला या मोठ्या प्रमाणात कुपोषित आहेत. एकात्मिक बाल विकास प्रकल्प व आरोग्य विभागाच्या अनेक योजना राबवूनही राज्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. आजही आदिवासी मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे तसेच आदिवासी भागातील मुलींचे कमी वयातच लग्न करून दिले जाते आणि या मुली खूप कमी वयामध्ये माता बनल्या जातात. त्यामुळे या महिला माता बनल्यानंतर स्वतःही कुपोषित असतात आणि त्या कुपोषित असल्याकारणाने कुपोषित बालकांना त्या जन्म देतात. त्याचप्रमाणे आदिवासी महिला या आपल्या उपजीविकेसाठी भटकंती करत आहेत, हे कुठे तरी थांबले पाहिजे.

महिला सक्षमीकरण यासाठी राज्य सरकारच्या केंद्र शासनाच्या खूप योजना आहेत. पण या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत म्हणून महिला सक्षमीकरण हे नावापुरतेच आहे, असे आपल्याला म्हणता येईल. ज्याप्रमाणे शहरी भागातील महिला या सक्षम बनल्या आहेत त्याचप्रमाणे आदिवासी महिला यासुद्धा सक्षम बनणे गरजेचे आहे. आदिवासी भागांमधील महिला या आजही आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसत नाहीत. आजही बऱ्याच प्रमाणामध्ये महिलांना मासिक पाळी किंवा इतरही अन्य आरोग्यविषयक पुरेसे ज्ञान नाही. यासाठी आदिवासी महिलांना आरोग्याबाबतचे शिबीर राबवून आणि त्यांच्यासाठी विविध आरोग्य विषयांवर मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

आदिवासी लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहाचा, त्यांच्या जमिनींचे संरक्षण करण्याचा, त्यांचे व्यवहार व्यवस्थापित करण्याचा, त्यांच्या जमिनीवरील प्रकल्पांसाठी त्यांची संमती देणे किंवा रोखणे, त्यांच्या धर्माचे पालन करणे आणि भारतीय संविधान आणि कायद्यांनुसार त्यांचे भविष्य निश्चित करण्याचा अधिकार आहे. कधीकाळी आदिवासी समाज म्हणजे जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज असणारी ओळख आता आदिवासी समाजनेही पुसून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपुण्य दाखविणाऱ्यांचा टक्कादेखील वाढला आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण करण्यासाठी आणि आदिवासी महिलांना सक्षम करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

स्त्री शक्ती म्हणजे रणरागिणी असे नेहमी म्हटले जाते. आपण जेव्हा महिला सक्षमीकरणाचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर माँ जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ही नावे येतात. घरातील कर्ती महिला जी अतिशय त्यागी वृत्तीने परिवाराचा चरितार्थ चालवत असते. अशा माता भगिनींच्या उत्कर्षासाठी व त्यांच्या सक्षमीकरणासाठी जशा अनेक योजना आहेत, त्यांचा लाभ आदिवासी महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आदिवासी विकास अधिकाऱ्यांनी राज्यातील प्रत्येक आदिवासी पाड्यांवर जाऊन त्यांचे प्रबोधन करून त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे.

आज प्रत्येक देशामध्ये प्रत्येक क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. आज महिला वैमानिक आहेत, महिला रेल्वे चालवत आहेत, महिला अंतराळवीर आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. एवढेच नाही तर या देशाच्या राष्ट्रपतीसुद्धा एक महिलाच आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एक स्त्री असते. पण आज महिला पुरुषांच्या बरोबरीने नाही, तर त्यांच्या दोन पावले पुढे जाऊन काम करत आहेत. मात्र हे चित्र आदिवासी महिलांच्या बाबतीत दिसत नाही. ज्या वेळेला आदिवासी महिला या प्रत्येक मूलभूत सुविधांपासून परिपूर्ण होतील किंवा आपल्या आरोग्याविषयी परिपूर्ण होतील किंवा आपल्या शिक्षणासंबंधीत त्या जागरूक होतील, तेव्हाच आपण खरा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करू शकतो, यासाठी आपण सर्वांनीच मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
sunitanagare0@gmail. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -