Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीरायगड

Rumours : या निव्वळ वावड्या आणि केवळ अफवा; जागा वाटपासंदर्भात काहीच चर्चा झालेली नाही

Rumours : या निव्वळ वावड्या आणि केवळ अफवा; जागा वाटपासंदर्भात काहीच चर्चा झालेली नाही

जागावाटपाचा निर्णय सामंजस्याने आणि सामोपचाराने होईल; कुठलाही मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून चर्चा झालेली नाही - सुनिल तटकरे


महाड : येत्या एक-दोन दिवसात तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते दिल्लीत बसून जागावाटपाचा निर्णय सामंजस्याने आणि सामोपचाराने करतील असे सांगतानाच तिन्ही पक्षाने महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा निर्धार केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.


बुधवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर आज रायगड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.


अमित शहा यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा केली असून जागावाटप योग्य पद्धतीने व सन्मानपूर्वक केले जाईल असेही सुनिल तटकरे म्हणाले.


मतदारसंघनिहाय जागा वाटपासंदर्भात पक्षनिहाय काहीच चर्चा झालेली नाही. या निव्वळ वावड्या आणि केवळ अफवा आहेत मात्र पुढील दोन दिवसात मतदारसंघनिहाय एकंदरीत राजकीय चित्र नजरेसमोर ठेवून चर्चा होईल असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.


अजून मागणी करण्याचा प्रश्नच आलेला नाही. बुधवारी प्राथमिक स्वरुपात चर्चा झाली. आम्हाला एनडीएमध्ये सहभागी होण्यामध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य भूमिका बजावली होती. त्यामुळे कुठलाही मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून चर्चा झालेली नाही. येत्या दोन दिवसात नक्की होईल आणि अत्यंत समन्वयाने, सामंजस्याने जागा वाटप होईल व लगेचच दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होईल असेही सुनिल तटकरे म्हणाले.


जागावाटप दोन दिवसात पूर्ण झाल्यावर बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आला तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असणार आहेत असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.


अनंत गीते यांनी २०१४ साली सुनिल तटकरे नावाचे अनेक उमेदवार उभे केले नसते तर त्यांना मी त्याचवेळी पराभूत केले असते. देशात कमी मताने पराभूत त्यावेळी झालो मात्र २०१९ मध्ये देशात आणि महाराष्ट्रात जबरदस्त लाट असताना फक्त पाच जागा त्यापैकी चार राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिसरी जागा कॉंग्रेसला मिळाली होती. त्यावेळी अनंत गीते यांचा ३३ हजाराने पराभव केला होता. त्यावेळेचे मित्रपक्ष आज नसतील परंतु आता वेगळे मित्रपक्ष सोबत आहेत. त्यामुळे विनाकारण पोकळ दावा करत स्वतः च्या मनाची समजूत काढण्याचा प्रयत्न अनंत गीते करत आहेत. जनतेला मी गेल्या ४० वर्षांत केलेल्या कामाची पूर्ण माहिती आहे. हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला तर माझ्या नेतृत्वाने मी उभा रहावे असे ठरवले आहे त्यामुळे अर्ज भरणार त्यावेळी आणि निकाल लागेल त्यावेळी किती मोठ्या फरकाने एकतर्फी विजय होतो ते समजेल असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

Comments
Add Comment