Wednesday, November 13, 2024
Homeताज्या घडामोडीअशोक सराफ, विजय चव्हाण, देवकी पंडित व कलापिनी कोमकली राष्ट्रीय साहित्य अकादमी...

अशोक सराफ, विजय चव्हाण, देवकी पंडित व कलापिनी कोमकली राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वर्ष २०२२ व वर्ष २०२३ साठी विविध श्रेणीत एकूण ९२ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक संगीत आणि लोककलेच्या क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. (Ashok Saraf, Vijay Chavan, Devaki Pandit and Kalapini Komkali honored with National Sahitya Akademi Award) सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत संगीत नाटक अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये देशातील ९२ कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले असून, यापैकी महाराष्ट्रातून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विजय चव्हाण, देवकी पंडित आणि कलापिनी कोमकली या कलाकारांचा समावेश आहे.

राजधानीस्थित विज्ञान भवन येथे हा भव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमात केंद्रीय सांस्कृतिक व्यवहार मंत्री, जी. किशनरेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक व्यवहार राज्य मंत्री अर्जुनराम मेघवाल, विभागीय सचिव गोविंद मोहन तथा संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा उपस्थित होते.

संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान केले गेले. अकादमी पुरस्कार १९५२ पासून प्रदान केले जात आहे. संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक संगीत आणि लोककलेच्या श्रेणींमध्ये एकूण ९२ कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

सुप्रसिद्ध कलाकार अशोक सराफ…

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे, प्रसिद्ध कलाकार अशोक सराफ यांना अभिनय क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्यामुळे, त्यांना आज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्‍यांना वर्ष २०२२ साठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नुकतेच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. आयत्या घरात घरोबा, माझा पती करोडपती, नवरी मिळे नवऱ्याला, यासह अनेक चित्रपटांत अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाने प्रक्षकांची दाद मिळवली आहे. मराठीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी अनेक विनोदी भूमिका सादर केल्या. करण अर्जून, सिंघम यासह अनेक चित्रपटांतून त्यांनी उल्लेखनीय अभिनयाने त्यांनी विशेष स्थान निर्माण केले आहे. अभिनयातील उत्कृष्‍ट योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, पाच फिल्मफेअर पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार, सह्याद्री रत्न पुरस्कार आणि पुरंदरे पुस्कारांचा समावेश आहे.

विजय शामराव चव्हाण…

सुप्रसिद्ध ढोल‍की वादक विजय शामराव चव्हाण यांना वर्ष २०२२ साठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. संगीत श्रेणीतील लोकसंगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल, त्यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रसिद्ध लावणी गायिका श्रीमती सुलोचना चव्हाण यांचे पुत्र असलेले विजय चव्हाण यांची त्यांच्या बहुमुखी प्रतिभेमुळे, लोकप्रिय क्षेत्रातील अग्रगण्य कलाकार म्हणून ख्याती आहे. ते डफ, चांडा, हलगी, आणि फली यांसारखी लोकवाद्य वाजवण्यातही निपुण आहेत.

शास्त्रीय संगीत गायिका देवकी पंडित…

कला क्षेत्रातीतील संगीत श्रेणीमध्ये, हिंदुस्तानी गायनासाठी श्रीमती देवकी पंडित यांना संगीत नाटक अकादमीकडून वर्ष 2022 या वर्षाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे जन्मलेल्या श्रीमती देवकी पंडित यांनी गायनाचे सुरूवातीचे प्रशिक्षण त्यांच्या आई श्रीमती उषा पंडित यांच्याकडून घेतले. जयपूर आणि आग्रा घराण्यच्या गायकीची उत्तम गायिका म्हणून श्रीमती देवकी पंडित यांची ख्याती आहे. त्यांनी देश-विदेशात अनेक प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरणे केली आहेत. शास्त्रीय भक्तिगीते, मराठी आणि हिंदी चित्रपट गीते अशा विविध प्रकारच्या गायनात आपला ठसा उमटवला आहे. हिंदुस्तानी संगीतातील अमुल्य योगदानाबदद्वदल त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले आहे.

शास्त्रीय संगीत गायिका कलापिनी कोमकली…

कला क्षेत्रातीतील संगीत श्रेणीमध्ये, हिंदुस्तानी गायनासाठी श्रीमती कलापिनी कोमकली यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका कलापिनी कोमकली या स्वरतपस्वी पंडित कुमार गंधर्व यांच्या कन्या आहेत. मध्यप्रदेश राज्याच्या देवास येथे जन्मलेल्या श्रीमती कोमकली यांना वर्ष २०२३ साठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुरांचा ठेवा जपतानाच शास्त्रीय संगीतात त्यांचा ताना ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीवर आधारित असले तरी त्यांनी त्यांची स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रसिद्ध गायक कुमार गंधर्व आणि गायिका वसुधरा कोमकली यांच्या कन्या आणि शिष्या आहेत. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अग्रगण्य गायिकांपैकी एक मानल्या जातात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -