Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकृत्रिम मत्स्यभित्तिका...

कृत्रिम मत्स्यभित्तिका…

रूपाली केळस्कर

जर समुद्रात मासे मिळायचे बंद झाले, तर माशांशिवाय एकही घास न उतरणाऱ्यांचे काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. खरंच अशी परिस्थिती आली, तर दर्याचा राजा डोलकरांनी काय करावे. त्यांनी आपले पोट कसे भरावे… हा धोका ओळखून शासनाने मच्छी बचाव कार्यक्रम सुरू केला आहे. सध्या माशांची पैदास वाढविण्यासाठी कोकणातील समुद्रात कृत्रिम भित्तिका उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आता या कृत्रिम भिंती मान्सून पूर्वीच्या खवळलेल्या समुद्रात, उधाणात तग धरतील का? हे येणारा काळच ठरवेल…

वादळ वारं सुटलं गं, वाऱ्यानं तुफान उठलं गं,
या गं, दर्याचा, या गं दर्याचा दरारा मोठा…

खरंच या दर्याचा दरारा मोठा आहे. त्याच्या किनाऱ्यावर राहणाऱ्यांनाच तो समजू शकतो. अगोटीला खवळलेल्या समुद्राची गाज ऐकणाऱ्यांनाच त्याची विशालता माहीत आहे. राजधानी मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अथांग अशी समुद्र चौपाटी लाभली आहे. इथे मनसोक्त डुंबण्यासाठी, इथल्या वाऱ्याची थंडगार झुळुक अंगावर घेण्यासाठी देशभरातले पर्यटक गर्दी करतात. त्यात मासे खवय्यांची गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे माशांचे भाव गगनाला भिडले आहेत. कोकणातील नागरिकांचे भात आणि मासे हे मुख्य अन्न आहे; परंतु आता तांदळचे जसे दर वाढले आहेत. तसे माशांचे दरही दिवसागणिक वाढत चालेले आहेत.

आता पापलेट, सुरमई सारखे मासे हजारोंच्या किमतीतच मिळतात. ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. हातावर पोट असणाऱ्यांना लहान मच्छी, सुकी मच्छी घेताना देखील पैशांची जुळवाजुळव करावी लागते. आता स्थनिकांच्या ताटातून ती गायब हईल की काय? असे वाटू लागले आहे. त्यामुळे शासनाने मत्स्यभित्तिका बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यातले एक महत्त्वाचे कारण म्हणजे, मुंबई आणि कोकणात येणारा परप्रांतीय आणि पर्यटकांचा लोंढा होय. आता गल्लोगल्ली बिहारीबाबू देखील मासे विक्री करू लागले आहेत.

समुद्रातील माशांची संख्या लक्षणीयरीत्या घटू लागली आहे. शासनाने त्याची रेड लिस्ट जाहीर केली असून, त्यामध्ये मुशी, करवत, कानमुशी किंवा कनार, गोलाड किंवा वाकटी, कोंबडा, सोनमुसा, वागबीर, लांज किंवा लाजा, मिगला किंवा वाघोल, शिंग पाकट, वागली, सुंभा किंवा टोळ, घोडा मासा, गोब्रा इत्यादी माशांचा समावेश आहे. त्याचे कारण मांसाहारी माशांची संख्या घटत असून, तारली, बांगडा अशा शाकाहारी माशांची संख्या वाढली आहे. सागरी इको सिस्टिमच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. त्यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास काही माशांच्या जाती लुप्त होण्याची शक्यता आहे. मासेमारीनंतर अनेक मासे शिळे होतात. त्यांचा वापर न झाल्यामुळे ते फेकून द्यावे लागतात. त्यामुळे अशा माशांचा नाहक बळी जातो, तर काही मासे खाल्ले जात नाहीत. ते जाळ्यात अडकतात, मात्र त्यांना जमिनीवर आणल्यावर फेकून द्यावे लागते. समुद्र ही एक जंगलाप्रमाणे असणारी महाकाय परिसंस्था आहे.

जंगलाप्रमाणेच इथली मजबूत अन्न साखळी दुभंगत चालली आहे. मासेमारीसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढत गेला. व्यावसायिकता वाढली. मासे खाणाऱ्यांची संख्या वाढली. मासेमारीसाठी ट्रॉलर्सची संख्या वाढली, मोठी पर्ससीनसारखी जाळी आली. माशांना शोधणाऱ्या सॅटेलाइटवर आधारित यंत्रणांचा वापर सुरू झाला. त्यामुळे माशांची संख्या तर घटलीच; परंतु अनेक प्रजाती नष्ट होऊ शकतात. दहा वर्षांत माशांच्या अनेक जाती समुद्रातून नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास त्याचा थेट परिणाम कोकणात मासेमारीवर अवलंबून आसणाऱ्या हजारो कुटुंबावर होणार आहे.

शासनाने दरवर्षी पावसाळ्यात माशांच्या विणीच्या हंगामात मासेमारीवर बंदी घालण्याचे आदेश देण्यास सुरुवात केली असली तरी त्याची कोटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. त्यामुळे आता सुमारे ६५ मत्स्यप्रजातींपैकी ३५ जाती संकटात सापडल्याची ओरड सुरू झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन, मत्स्य संवर्धनासाठी कोकण किनारपट्टीवर समुद्रात १२१ ठिकाणी कृत्रिम भित्तिकांची उभारणी केली जाणार आहे.

समुद्राच्या तळाशी शास्त्रोक्त पद्धतीने या भित्तिका उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. एका संशोधनात असे आढळून आले की, कोकणात पंचवीस वर्षांपूर्वी समुद्रात जेवढे मासे मिळत होते, तेवढे आज मिळत नाहीत. या परिस्थितीला प्रदूषण आणि हवामानातील बदल कारणीभूत आहेत. कोकण किनारपट्टीवर साधारणपणे १९६०-६२ च्या आसपास यांत्रिक मासेममारीला सुरुवात झाली. त्यासाठी शासनाने सबसिडी उपलब्ध करून दिली. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आणल्या.

माशांचा शोध घेणारे तंत्रज्ञान उपलब्ध झाले. यामुळे कोकणात मासेमारी यांत्रिक बोटींची संख्या झपाट्याने वाढली. या सगळ्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान मत्स्यसंपदा योजने अंतर्गत कोकण किनारपट्टीवर मत्स्य संवर्धनासाठी कृत्रिम भित्तिका उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत समुद्राच्या तळाशी २० मीटर खोलीवर २ हजार स्क्वेअर मीटरच्या भित्तिका उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. विशिष्ट रचनेत उभ्या-आडव्या संरचनेत या भित्तिका पसरवल्या जाणार आहेत. यामुळे समुद्राच्या तळाची मत्स्य संवर्धनासाठी कृत्रिम अधिवास तयार होण्यास मदत होणार आहे.

रायगड जिल्ह्यात ४५ ठिकाणी, रत्नागिरी जिल्ह्यात ३६ ठिकाणी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० ठिकाणी यांसह पालघर जिल्ह्यात कृत्रिम भित्तिका उभारल्या जाणार आहेत. पाण्याची खोली, जलप्रदूषण, पाण्याची पारदर्शकता, लाटांचे प्रमाण या गोष्टींचा अभ्यास करून ही ठिकाणे निवडण्यात आली आहेत. येत्या महिन्याभरात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे कोकण किनारपट्टीवर मत्स्यप्रजातींचे संवर्धन आणि उत्पादन वाढीसाठी मदत होणार आहे. कृत्रिम भित्तिका हे मासळी एकत्रित करण्याचे एक शास्त्रोक्त अभ्यास करून तयार केलेले साधन आहे. ज्यात सिमेंट, लोखंड दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तूंचा वापर करून पोकळ स्वरूपाच्या रचनांची निर्मिती केली जाते. नंतर त्यांची समुद्राच्या तळाची मांडणी केली जाते.

माशांना सुरक्षित वातावरण तयार झाल्याने ते या ठिकाणी अधिवास करण्यास सुरुवात करतात. या ठिकाणी प्रजननाला सुरुवात करतात. समुद्रातील मासे २०४९ नंतर संपणार असल्याचा कॅनडातील अभ्यासकाचा संशोधनाअंती धक्कादायक अहवाल काही महिन्यांपूर्वी समोर आला. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनाअंती हा निष्कर्ष समोर आला आहे. एकंदरीत सध्या बदलत असलेल्या वातावरणाचा समुद्राच्या पोटात घडत असलेल्या घडामोडींवर परिणाम होतो. समुद्रकिनारी कंपन्या उभ्या राहिल्या. त्यामुळे जल प्रदूषण होत आहे. वातावरणात होत असलेला बदल याचा फटका देखील बसतो. मासळीत काही महत्त्वाची जीवनसत्त्वेही असतात. कॉड, हॅलिबट, मुशी या माशांच्या यकृतापासून औषधी तेल निघते. या ना त्या कारणांनी मासे कमी होत आहेत. पाळीव जनावरांच्या आहारासाठी मत्स्यपीठ व झाडांसाठी उत्तम खतही मासळीपासून मिळते. एकूणच काय तर मासे खवय्यांमध्ये एक चिंतेची अदृष्य मत्सभित्तिका मात्र तयार झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -