Sunday, August 24, 2025

अमित शहा यांचे ‘मिशन महाराष्ट्र’

अमित शहा यांचे ‘मिशन महाराष्ट्र’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मंगळवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अमित शहा यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. या सर्वच्या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी निर्धार करा, असे आवाहन शहा यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, वर्धा व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. पक्षाच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समिती व लोकसभा कोअर कमिटीच्या सदस्यांच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.

जळगावमध्ये त्यांनी युवा संवाद कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील सत्तेतील मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरही चर्चा केली. केवळ भाजपाचे उमेदवार नव्हे, तर महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एक व्यूहरचना असेल, याचे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे जे उमेदवार उभे राहतील, त्यांचा संयुक्तिक प्रचार करण्याबाबत शहा यांनी संकेत दिले. शहा यांच्या दौऱ्यानंतर भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आधी महाराष्ट्र भाजपाच्या वतीने ‘मिशन ४५’चा नारा दिला होता; परंतु शहा यांच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्र महायुतीच्या पारड्यात जाईल, यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी दिवस-रात्र मेहनत करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसले.

महाराष्ट्रात जे पेरले जाते, ते देशात उगवते, असे अनेक योजना आणि निर्णयांच्या बाबतीत घडलेले दिसून आले आहे.महाराष्ट्र हे देशातील पुढारलेले आणि प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. अनेक बाबींमध्ये महाराष्ट्र पुढे आणि देश मागे असे चित्र पाहायला मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही महाराष्ट्राचे पुढारपण पाहायला मिळते. अशा वेळी सेनापती बापट यांच्या “महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले| महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले| खरा वीर वैरी पराधीनतेचा| महाराष्ट्र आधार हा भारताचा|”, या ओळी आठवतात. निवडणुकीच्या राजकारणाच्या अंगाने विचार केला तरीही महाराष्ट्रात ज्या पक्षाला जास्त जागा मिळतात, तो केंद्रात सत्तेवर बसलेला दिसतो. २०१४ आणि २०१९ मध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजपाला भरभरून प्रेम दिल्याने विरोधकांच्या खासदारांची संख्या १०च्या वर जाऊ शकली नव्हती. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता पुन्हा भाजपाप्रणीत एनडीए आघाडीला १०० टक्के यश देईल, असा विश्वास निर्माण झाला आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे १० वर्षांचा अनुभव आणि पुढील २५ वर्षांचे व्हिजन आहे, असा नेता पुन्हा पुन्हा होणे नाही. त्याच्या कार्यकाळात मुद्रा लोन, स्टार्टअप दिले, डिजिटल व्यवहार झाले, रेल्वे ट्रॅक बनविले, रोज गॅस सिलिंडर ५० हजार लोकांना दिले. उरी, पुलवामामध्ये आतंकवादी आले तेव्हा १० दिवसांत पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्टाईक केले. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. काश्मीर आपला हिस्सा आहे की नाही? ३७० कलम ७० वर्षे काँग्रेसने हटविले नाही. मोदींनी ते काम केले. राम मंदिर उभारणीतील पंतप्रधान मोदी यांचे योगदान महत्त्वाचे आहे.” या महत्त्वपूर्ण बाबीकडे शहा यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या बैठकीत ऊहापोह केला.

घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधकांना शहा यांनी कोंडीत पकडले. “येणारी लोकसभा ही आत्मनिर्भर भारत बनवण्याची निवडणूक आहे. आपल्यासमोर इतर जे पक्ष आहेत ते सर्व परिवारवादी पक्ष आहेत, हे ओळखा, याची जाणीव शहा यांनी करून दिली. हे सर्व पक्ष आपल्या मुलांना पंतप्रधान बनवण्याच्या मागे लागले आहेत. उद्धव ठाकरे यांना पुत्र आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे आहे. शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे. सोनिया गांधींना राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसवायचे आहे. सोनिया गांधी तिसऱ्या वेळी राहुल बाबाला लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व परिवारवादाच्या पार्टी आहेत. या सर्व राजकीय पार्टी देशात लोकशाही ठेवू शकतील का?” अशी घणाघाती टीका अमित शहा यांनी केल्यामुळे कोण जनतेसाठी झटतो आहे, हे आता महाराष्ट्राच्या समोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

स्वत:ला जाणता राजाची उपमा घेऊ इच्छिणाऱ्या शरद पवार यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले. “शरद पवार यांना ५० वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता सहन करते आहे. ५० वर्षे सोडा, जनतेसाठी काय केले याचा ५ वर्षांचा हिशोब द्या. मी तर १० वर्षांचा हिशोब द्यायला तयार आहे,” असा पलटवार शहा यांनी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा चेहरा उघडा केला. उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि चिरंजीव आदित्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, अशा बातम्या माध्यमात प्रसिद्ध झाल्या; परंतु त्यावर ठाकरे कुटुंबीयांनी खुलासा केला नाही. याचा अर्थ लोकसभा निवडणुकीनंतर आपले काही खरे नाही, याची जाणीव मातोश्रीला झाली असावी. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा संकल्प करावा. कल्पकतेने जनतेशी संवाद साधावा, अशा सूचना त्यांनी केल्या. त्यामुळे भाजप-महायुतीचा प्रत्येक उमेदवार आपण स्वत: आहोत, असे समजून एकदिलाने कामाला लागा, असे आवाहन करतानाच ‘महाराष्ट्र मिशन ४८’चे टार्गेट दिले आहे.

Comments
Add Comment