मुंबई : देशभरातून येणाऱ्या प्रचंड लोकसंख्येला सामावून घेणाऱ्या महानगरी मुंबईमध्ये प्रचंड बांधकामे झाल्यामुळे आता शहर विस्तारासाठी अधिक जागेची गरज निर्माण झाली आहे. यामुळे आता लवकरच तिसरी मुंबई उभारणीसाठीचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) अर्थात अटल सेतूच्या आसपास ‘तिसरी मुंबई’ विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधी राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने नुकत्याच दोन अधिसूचना काढल्या आहेत. नगरविकास खात्याने काढलेल्या पहिल्या अधिसूचनेनुसार अटल सेतुच्या आजूबाजूची गावे मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अंतर्गत असणाऱ्या ‘न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी’ला (New Town Development Authority – NTDA) विकसित करण्यासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे.
सरकारने काढलेल्या दुसऱ्या अधिसूचनेत नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील ८० गावे आणि खोपटा न्यू टाऊन अधिसूचित क्षेत्रातील ३३ गावांच्या विकासासाठी ‘विशेष प्राधिकरण’ म्हणून शहर व औद्योगिक विकास महामंडळाची (सिडको) सरकारने केलेली नियुक्ती अधिसूचनेद्वारे मागे घेण्यात आली आहे. दुसऱ्या अधिसूचनेत सिडकोचे नाव हटवून हटवून एमएमआरडीएच्या नेतृत्वाखालील एनटीडीएची तिसऱ्या मुंबईचे नियोजक प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्याबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
सुमारे ३२३.४४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात वसलेल्या १२४ गावांच्या विकासासाठी एनटीडीएला नियुक्ती करण्याची विनंती एमएमआरडीएने २८ ऑगस्ट २०२३ रोजी राज्य सरकारला केली होती. त्यानुसार ही अधिसूचना काढण्यात आलेली आहे. यामध्ये नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील ८० गावे, खोपटा न्यू टाऊन अधिसूचित क्षेत्रातील ३३ गावे, मुंबई मेट्रोपोलिटन रिजनल प्लॅन मधील दोन गावे आणि रायगड प्रादेशिक आराखड्यातील नऊ गावांचा समावेश आहे.खोपटा व पेणचा बराचसा भाग पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कोस्टल झोन रेग्युलेशनअंतर्गत येत असल्याने जमिनीच्या विकास क्षमतेवर मर्यादा येतात. त्यामुळे नाव हटविल्यामुळे सिडकोला कोणतीही अडचण नसल्याचे सिडकोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.