हैदराबाद : उत्तर प्रदेशमध्ये कधीकाळी सत्ता गाजवलेल्या मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने (BSP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भारत राष्ट्र समितीसोबत (BRS) आघाडी केली आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि बहुजन समाज पक्षाचे तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष आर. एस. प्रवीण कुमार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली.
या आघाडीची घोषणा करताना केसीआर म्हणाले की, दोन्ही पक्षांची युती खूप प्रभावी ठरणार आहे. आम्ही यापूर्वी अनेक बाबींवर एकत्रित काम केले आहे. किती जागांवर निवडणूक लढवायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आपण मायावतींशी अद्याप बोललो नाही. सध्या फक्त आरएस प्रवीण कुमार यांच्याशी बोलले आहे.
बसपाचे प्रदेशाध्यक्ष आर. एस. प्रवीण यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, देशात संविधान संपवण्याचे षडयंत्र सुरू आहे. आमची मैत्री तेलंगणाला पूर्णपणे बदलून टाकेल. तसेच केसीआर यांना भेटून आनंदच झाला. लोकसभा निवडणूक आम्ही एकत्र लढणार आहोत.
दरम्यान, भारत राष्ट्र समिती-बहुजन समाज पक्षाच्या युतीची घोषणा झाल्यानंतर आता भारत राष्ट्र समिती तेलंगणातील काही जागा बहुजन समाज पक्षाला सोडण्याची तर भारत राष्ट्र समिती उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षला काही जागा सोडण्याची शक्यता आहे.