पनवेल : कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना भेटण्यासाठी नातेवाइकांना तासनतास उभे राहावे लागते. मात्र, आता नातेवाइकांना ई-मुलाखतच्या माध्यमातून थेट वीस मिनिटे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलता येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन सोमवारी राज्याचे अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते तळोजा मध्यवर्ती कारागृहात झाले. यावेळी अपर पोलिस महासंचालक प्रभात कुमार, तळोजा कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ, तुरुंग अधिकारी राहुल झुताळे आदी उपस्थित होते.
तळोजा कारागृहातील कैद्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या नातेवाईकांना ई मुलाखत देता येणार आहे. ई किस्कॉय आणि ग्रुप फोन ही एक नवीन सुविधा आहे. तळोजा कारागृह हा स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील पहिला कारागृह आहे. २००८ साली सुरु झालेल्या या कारागृहात सध्याच्या घडीला जवळपास ४०० कैद्यांची जागा असलेल्या या तुरुंगात तीन हजार कैदी शिक्षा भोगत आहेत. यामध्ये बॉम्बस्फोट, दंगल, नक्षलवादी, देश विघातक घटना आदींसह अनेक मोठ मोठ्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांचा समावेश आहे. या बायोमेट्रिक टच स्क्रीन मशीनमुळे कैद्यांना कुटुंबातील सदस्यांच्या सेलफोन नंबरवर सणाच्या शुभेच्छा पाठवता येणार आहेत.
दुसऱ्या सुविधेच नाव ग्रुप फोन सुविधा आहे. एलन ग्रुप या तामिळनाडू स्थित कंपनीने सर्वप्रथम देशात हि सुविधा उभारली आहे. यापूर्वी येरवडा मध्यवर्ती कारागृहात ४० कॉलिंग बूथ स्थापित केले आहेत. राज्याच्या गृहविभागाने तामिळनाडूस्थित कंपनीची मोफत कैदी कॉलिंग प्रणाली सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार तळोजा कारागृहात या सुविधांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी भायखळा कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ, उपअधीक्षक महादेव पवार, तुरुंग अधिकारी राहुल झुटाले आदी उपस्थित होते. कैद्यांना आठवड्यातील ३ वेळा फोन करता येणार आहे. ६ मिनिटांच्या या फोन दरम्यान नातेवाईक, वकील आदींना फोन करता येणार आहेत.एकुण १० मशीन तळोजा कारागृहात बसविण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे कैद्यांच्या नातेवाईकांना कारागृहात कैद्यांना भेटण्यासाठी कारागृहाचे खेटे मारण्याची गरज नाही.