Monday, July 22, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यगोपाळ नवजीवन केंद्र, मावळ

गोपाळ नवजीवन केंद्र, मावळ

  • सेवाव्रती : शिबानी जोशी

पुण्याला विद्येचे माहेरघर असे म्हटले जाते; परंतु याच पुणे जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये आडगावी शिक्षणासाठी अनेक किलोमीटर चालून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत असे आणि त्यामुळे प्राथमिक शिक्षण गावात झाल्यानंतर अनेक मुले शाळा सोडून देत असत. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुका हा असाच एक तालुका. या तालुक्यात संघाचे प्रचारक गोपाळ रावजी देशपांडे यांचे वारंवार येणे होत असे. काहीतरी कार्य करता येईल  यासाठी त्यांनी आणि त्यांच्या परिचितांनी येथे छोट छोटे प्लॉट घेऊन ठेवले होते. सुरुवातीला आपल्या प्लॉटवर संघ कार्यकर्त्यांना राहता येईल अशी काही सोय करावी, असे त्यांच्या मनात होते; परंतु त्यानंतर त्यांना मावळ भागातील शिक्षणाची  उणीव जाणवली आणि त्यांनी मावळ भागामध्येच काहीतरी ठोस कार्य करायचे ठरविले. त्याप्रमाणे १९७८ – ७९ पासून एक छोटे वसतिगृह सुरू झाले. त्यांना  अनंतराव आठले आणि दादा चांदेकर या कार्यकर्त्यांचीही बहुमोल साथ लाभली. हे दोघेही पुण्याचेच कार्यकर्ते होते.

आधी एका खोलीत ५ – ६ मुलांची सोय, मग अजून एक खोली असे करत २५ – ३० मुलांची सोय करण्यात आली. हळूहळू वसतिगृहाचा विस्तार होत गेला व १९८७ साली गोपाळ नवजीवन केंद्र या नावाने ट्रस्ट स्थापन करण्यात आले आणि वसतिगृहाचे नाव कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृह असे ठेवण्यात आले. तीन मजली इमारत उभी राहिली, त्यानंतर २००४ ते २००६ या कालावधीत नवीन इमारत बांधणी झाली आणि त्यामुळे  आज तिथे ६० मुले निवास करून शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी ८० टक्के मुले ही मावळ तालुक्यातीलच आहेत, कारण मावळ तालुक्यातील अतिदूर पसरलेल्या वाड्या-वस्त्यांमध्ये प्राथमिक शाळेपर्यंतच्याच शिक्षणाची सोय होती. पुढील शिक्षणासाठी या मुलांना बाहेर पडावे लागत असे, अन्यथा ही मुले शिक्षण सोडून देतात. म्हणून त्यांना तालुक्यातच निवासी व्यवस्था करून शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हे वसतिगृह सुरू झाले.

आज शासनाच्या समाज कल्याण विभागाचा अ दर्जा वसतिगृहाला प्राप्त झाला आहे, तसेच मावळ भागामध्ये  गोपाळ नवजीवन संस्थेला एक आदर्श, विश्वसनीय संस्था मानले जाते. वसतिगृहामध्ये मुलांच्या राहण्याची सोय तर केली जातेच त्याशिवाय मुलांना गणवेश, दप्तर, पुस्तके, शैक्षणिक साहित्य सुद्धा वितरित केले जाते. त्याशिवाय त्यांच्यावर संस्कार घडावेत, त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने काही उपक्रम हाती घेण्यात आलेत.

गोपाळराव देशपांडे यांच्या जागेवर छोटेखानी वसतिगृह उभे होते; परंतु त्या शेजारीच लोकांच्या सहकार्यांने तीन मजली इमारत उभी राहिली. ही  नवीन इमारत बांधून झाल्यावर जुन्या जागेमध्ये एक वाचनालय सुरू करण्यात आले. प्रथमपासून गोपाळ नव जीवन संस्थेमध्ये स्वतःला वाहून घेतलेले बाबा चांदेकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू झाले. सध्या वाचनालयाचे १९७५ सभासद असून,  २ हजार पुस्तके उपलब्ध आहेत. वाचनालयाला सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांच्यासारख्यांनीही भेट दिली असून, त्यांनीही ७०० ते ८०० पुस्तके दान केली आहेत. वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांना तसेच गावकऱ्यांना पुस्तके मिळू लागल्यानंतर मुलांसाठी अभ्यासिका सुरू करावी असे कार्यकर्त्यांच्या मनात आले आणि २०१२ साली  स्व. अशोकभाई शहा अभ्यासिका सुरू करण्यात आली. या ठिकाणी उच्च शिक्षण घेणारी किंवा स्पर्धा परीक्षांना बसणारी मुले येऊन अभ्यास करतात. ४० विद्यार्थ्यांना बसण्याची सोय आहे.

या ठिकाणी पुस्तके, संगणक, वायफाय सेवा, इंटरनेट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते. अत्यंत वाजवी मूल्य आकारून विद्यार्थ्यांना येथे अभ्यास करण्याची सोय केली जाते. या ठिकाणी अभ्यास करून मावळ तालुक्यातील अनेक मुले प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी पदावर रुजू झाली आहेत. त्या बरोबरच गेल्या पंचवीस वर्षांपासून लहान मुलांसाठी गोपाळ बालक मंदिर ही बालवाडी सुद्धा चालविली जाते. बालवाडीमध्ये सुद्धा ४० ते ५० मुले दरवर्षी शिकतात. संस्थेतर्फे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण, तसेच इतरही उत्सव उत्साहात साजरे केले जातात.

मावळ तालुक्यात श्री स्वामी समर्थ यांचे अनेक भक्त आहेत आणि स्वामी समर्थांचे मंदिर या भागात नव्हते हे लक्षात घेऊन त्यांचे मंदिर  २०११ साली  बांधण्यात आले. या मंदिरामध्ये भाविकांचा वाढता ओढ आहे. मंदिरामध्ये दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यानिमित्ताने गावकरी एकत्र जमून सत्संग साधतात. संघाचे कोणी प्रचारक मावळ भागात आले, तर त्यांची निवासाची व्यवस्था केली जाते, तसेच संघाची नियमित शाखाही येथे भरते. संघाचे काही वर्गही येथे चालतात.

या इमारतीमध्ये वसतिगृह, वाचनालय, बालक मंदिर तसेच शेजारी स्वामी समर्थांचे मंदिर असे उपक्रम सध्या संस्थेमार्फत चालविले जात आहेत. दरम्यानच्या काळात जुन्या जागेवर आणखी एक  अद्ययावत अशी इमारत उभारून कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण  देण्याची संस्थेची योजना आहे. त्यासाठी पुण्यातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेशी करार करून त्यांना येथे प्रशिक्षण देण्यासाठी बोलावणे किंवा महिला, युवक यांना कौशल्य विकास, रोजगाराभिमुख व्यावसायिक प्रशिक्षण देणे अशी कार्ये हाती घेण्यात येणार आहेत. महिलांना नर्सिंग, शिवणकाम यांसारखे प्रशिक्षण देणे तसेच विद्यार्थ्यांना संगणक किंवा इतर कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचा संस्थेचा मानस आहे.

चांगले निरलस, नि:स्वार्थी काम असले तर समाजाकडूनही मदतीचे हात तसेच प्रोत्साहन मिळत असते. पुण्यातील पुष्पा नाथानी ट्रस्टतर्फे दोन वर्षांपूर्वी संस्थेला उत्कृष्ट संस्थेचा दहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता, त्याशिवाय सांगलीच्या विजयंत मासिकाच्या संस्थेतर्फे गेल्या वर्षी गोपाळ नवजीवन संस्थेला पुरस्कार मिळाला आहे.

सध्या सुरू असलेल्या कामांबरोबरच नवीन निर्माण होत असलेल्या इमारतीमध्ये कौशल्य आधारित शिक्षण देणे ही संस्थेची भविष्यकालीन योजना आहे.

joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -