कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनी केली घोषणा
कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर अनेक पक्षप्रवेश घडत आहेत. त्यात भाजपात (BJP) प्रवेश करणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे. कोलकातामध्ये (Kolkata) देखील भाजपात एक पक्षप्रवेश होणार आहे, मात्र हा पक्षप्रवेश थोडा वेगळा असणार आहे. कारण थेट कोलकाता हायकोर्टचे (Kolkata Highcourt) न्यायाधीश आपला राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील होणार आहेत. अभिजीत गंगोपाध्याय (Abhijeet Gagopadhyay) असं या न्यायमूर्तींचं नाव असून त्यांनी आज सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला व त्यानंतर लगेच दुपारी भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली.
अभिजीत गंगोपाध्याय आज सकाळी हायकोर्टात पोहोचले आणि त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्याकडे सुपूर्त केला. याशिवाय राजीनाम्याची प्रत मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टीएस शिवग्ननम यांना पाठवली आहे. काल न्या. अभिजीत गंगोपाध्याय यांनी म्हटलं होतं की, आपण न्यायमूर्ती म्हणून आपलं काम पूर्ण केलं आहे. काही वकिलांनी त्यांना न्यायमूर्तीपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह धरला होता. मात्र, त्यांनी आता राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिजीत गंगोपाध्याय यांची २०१८ मध्ये कोलकाता उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०२० मध्ये त्यांची नियुक्ती कायम करण्यात आली. शिक्षक भरती घोटाळ्यासह अनेक प्रकरणात न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनी एकापाठोपाठ एक महत्त्वाचे निर्णय दिले. विशेष म्हणजे गंगोपाध्याय या वर्षी ऑगस्टमध्ये निवृत्त होणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला.
तमलुक लोकसभा मतदारसंघातून लढवू शकतात निवडणूक
अभिजीत गंगोपाध्याय हे येत्या ७ मार्च रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत. कोलकाता येथे होणाऱ्या संवाद कार्यक्रमात गंगोपाध्याय भाजपात सहभागी होतील. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससोबत भाजपा लढू शकते, त्यामुळे तमलुक लोकसभा मतदारसंघातून गंगोपाध्याय निवडणूक लढवू शकतात. ही जागा तृणमूल काँग्रेसचा गड मानली जाते. २००९ पासून सातत्याने या जागेवर टीएमसीचा उमेदवार जिंकला आहे. यंदा काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राजकारणात पाऊल टाकण्याचे दिले होते संकेत
अभिजीत गंगोपाध्याय याआधी म्हणाले होते की, ‘न्यायालयात न्यायाधीश त्यांच्यासमोर येणाऱ्या खटल्यांचा निपटारा करतात, तेही एखाद्या व्यक्तीने खटला दाखल केल्यास. पण मी आपल्या देशात आणि पश्चिम बंगालमध्येही खूप असहाय्य लोक मोठ्या संख्येने पाहिले आहेत. त्यामुळे अशा गरजू लोकांसाठी काहीतरी करायचं असेल तर त्यांच्यासाठी काम करण्याची संधी फक्त राजकीय क्षेत्रच देऊ शकते असा माझा विचार आहे’. यावरुन राजकारणात येण्याचे संकेत त्यांनी आधीपासूनच दिले होते.