Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीनवी मुंबईतील ९३ वर्षीय आजोबांनी स्ट्रोकवर केली मात

नवी मुंबईतील ९३ वर्षीय आजोबांनी स्ट्रोकवर केली मात

तीव्र स्ट्रोक येणारे ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतात

नवी मुंबई: जगभरात होणाऱ्या मृत्यूच्या आणि अपंगत्वाच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक कारण म्हणजे स्ट्रोक. स्ट्रोक सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो, परंतु स्ट्रोकचा धोका वयानुसार वाढत जातो, ५५ वर्षांनंतर प्रत्येक दहा वर्षांनी स्ट्रोक दुप्पट वाढतो. तीव्र स्ट्रोकसाठी रुग्णालयात येणारे ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतात. ९३ वर्षांचे श्री.जवाहरलाल फोतेदार (स्ट्रोक रुग्ण) यांनी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे इंट्राव्हेनस थ्रोम्बोलिसिसद्वारे तीव्र स्ट्रोकवर विजय मिळवला आहे.

या प्रकरणाने हे सिद्ध केले आहे की खूपच जुनाट स्ट्रोक असलेल्या रुग्णांवर उपचार करताना वय हा निकष नसतो. रुग्ण नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर येथे राहत असून त्यांना आधीपासूनच उच्च रक्तदाब आणि पार्किन्सन्स रोग होता, त्याचबरोबर लेफ्ट हेमिपेरेसीस (डाव्या बाजूला अशक्तपणा) होता आणि त्यांचे बोलणे देखील अस्पष्ट झाले होते. इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजीचे सल्लागार डॉ.विशाल चाफळे तसेच प्रौढ आणि लहान मुलांच्या न्यूरोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. शेखर पाटील यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नेले. त्यांच्यावर इंट्राव्हेनस थ्रोम्बोलिसिस करण्यात आले आणि विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये आश्चर्यकारकरित्या सुधारणा दिसून आली.

डॉ. विशाल चाफळे, इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजी सल्लागार, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले की,“या प्रकरणामुळे फक्त वेळेवर उपचार करणे याचे महत्त्व अधोरेखित होत नाही, तर स्ट्रोकच्या उपचारात वय हा अडथळा नसावा हे देखील आता समजून घेण्याची गरज आहे. स्ट्रोकच्या व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक म्हणजे वेळ. इंट्राव्हेनस थ्रोम्बोलिसिसमध्ये रक्ताच्या गुठळ्या विरघळण्यासाठी आणि मेंदूला रक्त प्रवाह पुनर्संचयित करण्यासाठी ‘क्लॉट-बस्टिंग’ हे औषध दिले जाते. स्ट्रोकची लक्षणे दिसू लागल्यानंतर, हे औषध ४.५ तासांच्या आत दिल्यास अधिक प्रभावी ठरते. ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये, हा संक्रमण कालावधी (विंडो पिरियड) ३ तासांचा असतो. या प्रकरणात रुग्णाच्या आरोग्यात झालेली सुधारणा, ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्येही इंट्राव्हेनस थ्रोम्बोलिसिसची प्रभावीता अधोरेखित करते.”

डॉ.चाफळे पुढे म्हणाले,“स्ट्रोकची लक्षणे त्वरीत ओळखल्यामुळे जीव वाचू शकतो. अचानक अशक्तपणा येणे, चेहरा वाकडा होणे, बोलण्यात अडचण येणे आणि समन्वय साधता न येणे यासारखी लक्षणे सतत दिसत असतील तर स्ट्रोकवर तातडीने उपचार करण्याची गरज आहे, यशस्वी उपचार म्हणजे वयोवृद्ध रुग्णांमध्ये (खूप आधीपासून स्ट्रोक असलेल्या रुग्णांमध्ये) जटिल न्यूरोलॉजिकल केसेस हाताळण्याच्या अपोलो हॉस्पिटल्सच्या कौशल्याचा दाखला आहे. आमचा एआय-सक्षम स्ट्रोक प्रोटोकॉल, निदान आणि उपचारांच्या निर्णयाची अचूकता वाढवून उपचाराचा वेळ कमी करतो.”

श्री.जवाहरलाल फोतेदार (स्ट्रोक रुग्ण) म्हणाले,“मला ९३ व्या वर्षी स्ट्रोकचा सामना करावा लागेल अशी मी कल्पनाही केली नव्हती, पण मी जिवंत आणि सुदृढ असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे मला मिळालेले उपचार खरोखरच अद्भुत होते. माझे वय जास्त आणि आरोग्याच्या तक्रारी असूनही, डॉक्टर आणि वैद्यकीय टीमने जलद आणि प्रभावीपणे प्रतिसाद दिला. त्यांच्या कौशल्य आणि समर्पणाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कारण त्यांच्यामुळे मी लवकर बरा होऊ शकलो. या अनुभवाने मला हे शिकवले की दर्जेदार आरोग्यसेवा मिळवण्यासाठी वयाचे बंधन नसते.”

संतोष मराठे, प्रादेशिक सीईओ-पश्चिमी क्षेत्र, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले,“नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील ९३ वर्षीय रुग्णामध्ये झालेली उल्लेखनीय सुधारणा म्हणजे स्ट्रोकच्या उपचारातील एक अद्भुत क्रांती आहे. अशा जटिल न्यूरोलॉजिकल प्रकरणांमध्ये आपत्कालीन, गंभीर उपचार आणि पूर्ण-वेळ न्यूरोसायन्स टीमच्या क्षमतांचा वापर केला जातो. या प्रकरणामुळे वेळेवर उपचारांचे महत्त्व आणि इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजीची प्रभावीता अधोरेखित होते. एएचएनएम म्हणजे २४/७ तास तात्काळ रुग्णवाहिका सेवांसह एकप्रकारचे ’स्ट्रोक रेडी हॉस्पिटल’ आहे. आमचे आपत्कालीन विशेषज्ञ गंभीर अटीतटीच्या काळात जीव वाचवण्यासाठी नवी मुंबई, ठाणे आणि रायगड येथील विविध ठिकाणी सामुदायिक बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) प्रशिक्षण घेतात.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -