Friday, July 19, 2024
Homeदेश‘मैं हूँ मोदी का परिवार’

‘मैं हूँ मोदी का परिवार’

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाने नेहमीप्रमाणे आपली संपूर्ण यंत्रणा नरेंद्र मोदी या एका नावाला आणखी मोठे करण्यात लावली आहे. पंतप्रधान मोदी यांना केंद्रस्थानी ठेवूनच यावेळी भाजपा ही लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून बिहारचे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव यांच्या एका विधानानंतर भाजपाने समाजमाध्यमांवर ‘मोदी का परिवार’ असे म्हणत विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.

बिहारमधील पाटणा इथे रविवारी विरोधकांच्या इंडिया आघाडीची विशाल सभा पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजदचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. लालू प्रसाद यांच्या या टीकेला सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या या भाषणानंतर भाजपच्या देशभरातील नेत्यांनीही मोदींच्या घोषणेला प्रतिसाद देत आपल्या नावासमोर ‘मोदी का परिवार’ असे लिहिण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. तुम्हाला कुटुंबच नाही, अशी टीका करणाऱ्या विरोधकांना ‘हा देश हेच माझे कुटुंब आहे,’ असे म्हणत भावनिक अस्त्र वापरत नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे.

बड्या नेत्यांनी नावापुढे लावले ‘मोदी का परिवार’

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री रवीसंकर प्रसाद यांच्यासारख्या बड्या नेत्यांपासून ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या राज्यस्तरावरच्या नेत्यांनी आपल्या एक्स खात्यावर स्वत:च्या नावानंतर कंसात मोदी का परिवार असे लिहीले आहे.

‘१४० कोटी देशवासीय हेच माझे कुटुंब’

‘मी त्यांच्या राजकीय घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केले. आता ते लोक म्हणतात की, मोदींना कुटुंब नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की १४० कोटी देशवासीय हेच माझे कुटुंब आहे. ज्यांना कोणीही नाही. तेही मोदींचे आहेत आणि मोदीही त्यांचा आहे. माझा भारत हाच माझा परिवार आहे,’ अशा शब्दांमध्ये सोमवारी ( दि. ४ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना प्रत्युत्तर दिले. ते तेलंगणामधील आलिदाबाद येथील जाहीर सभेत बोलत होते.

लालू प्रसाद यादव यांनी रविवारी पाटणा येथील रॅलीत पंतप्रधान मोदींना घराणेशाहीच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले होते. याबाबत जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘मी जेव्हा राजकारणातील घराणेशाहीवर बोलतो, तेव्हा ते माझ्यावर टीका करतात. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणात गुरफटलेले विरोधी आघाडीचे नेते अस्वस्थ होतात.

मोदींना कुटुंब नाही, असे म्हणतात. आता त्यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी त्यांचा खरा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, १४० कोटी देशवासी माझे कुटुंब आहेत. ज्यांना कोणीही नाही, तेही मोदींचे आणि मोदीही त्यांचेच. माझा भारत माझा परिवार आहे’.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -