
नड्डांऐवजी कोण येणार नागपूरमध्ये?
नागपूर : नागपूर विद्यापीठाजवळ (Nagpur Unviversity) भाजपच्या युवा मोर्चाच्या (BJP Youth Morcha) राष्ट्रीय नमो युवा संमेलनाचं आज आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) हजेरी लावणार होते. मात्र अचानक त्यांचा नागपूर दौरा रद्द झाला आहे. दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होणार असल्याने जे. पी. नड्डा यांचा नागपूरचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
जे. पी. नड्डा आजच्या कार्यक्रमात तरुणांना संबोधित करणार होते. पण त्यांच्याजागी आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) नमो राष्ट्रीय युवा संमेलनात सहभागी होऊन तरुणांना संबोधित करणार आहेत.
भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द झाला आहे.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची आज तेलंगणामधील अदिलाबाद येथे जाहीर सभा होत आहे. त्यासाठी ते नांदेडमार्गे तिथे जाणार आहेत. तर अमित शाह आज छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव दौऱ्यावर आहेत. दोन्ही ठिकाणी अमित शाह सभा घेऊन संबोधित करणार आहेत.