
ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
रत्नागिरी : ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे गेल्या काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) चौकशीच्या फेऱ्यात आहेत. जानेवारी २०२४ मध्ये एसीबीने राजन साळवी यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. त्यानंतर आज त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ आणि वहिनी असे पाच जण आज चौकशीला हजर राहणार आहेत.
अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी एक वाजता आमदार राजन साळवी आपल्या कुटुंबीयांसह रत्नागिरी एसीबी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. मुंबई हायकोर्टाने जामीन दिल्यानंतर दिलेल्या निर्देशानुसार राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ आणि वहिनी असे पाच जण हजर राहून चौकशीला सहकार्य करणार आहेत.
राजन साळवी यांची पत्नी आणि भावाची दोन दिवसापूर्वी एसीबी चौकशी झाली. आमदार राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला १ मार्चला एसीबीकडून चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली होती. जबाब नोंदवण्यासाठी त्यांना रत्नागिरीच्या एसीबीच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना या नोटीसीद्वारे देण्यात आल्या होत्या.