- कोकणी बाणा : सतीश पाटणकर
तळवणे गावातील मूळ ग्रामस्थांच्या शुद्ध, सात्त्विक व पवित्र भावनेचे प्रतीक असणाऱ्या श्री देव रवळनाथास श्री योगीराजांनी आपल्या तपोबलाने पाचारण केले व त्यास आपल्या मनातील योगसाधना व तपश्चर्येचा हेतू सांगितला. प्रत्यक्ष सिद्ध पुरुष आपल्या गावात राहू इच्छित आहे, हे पाहून श्री रवळनाथास अत्यानंद झाला व त्याने योगीराजास राहण्याकरिता जागा आखून देऊन त्यांचे शिष्यत्व पत्करले.
कोकणातील माणूस श्रद्धाळू आहे. पश्चिमेला असणारा अरबी समुद्र आणि पूर्वेला असणारा उत्तुंग सह्याद्री यामधील कोकणभूमीचा हा पट्टा जंगलांनी आणि डोंगरकड्यांनी व्यापला आहे. जिथे सपाट भूभाग आणि पाण्याची व्यवस्था झाली तिथे मानवी वस्ती वाढत गेली. कोकणात अनेक राजकीय सत्ता होऊन गेल्या. प्रत्येक राजकीय सत्तेने आपला धर्म वाढवण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी कोकणात कधीही धार्मिक वा जातीय दंगली झाल्याचे आढळत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे येथील संतांनी या भूमीवर केलेले महत्त्वपूर्ण कार्य होय.
आपल्या वास्तव्याने आणि तपोबलाने तळवणे आणि परिसर पावन करणाऱ्या राजाधिराज योगिराज महंत श्री परशुराम भारती महाराज यांचे भक्तगण तर महाराष्ट्रभर आहेत. सोळाव्या शतकात देशावरून कोकणात आलेल्या श्री दामोदर भारती, श्री गिरी गोसावी आणि श्री परशुराम भारती या तीन संतांनी कोल्हापूरच्या दिशेने कोकण प्रांतातील सुंदरवाडी संस्थानात प्रवेश केला. पहिल्या दोन साधूंनी सावंतवाडी व मातोड परिसरात आपली साधना सुरू केली, तर तिसरे परशुराम भारती महाराज हे तळवणे गावी आले.
त्यांनी तिथले एकंदर वातावरण पाहून ज्ञानसाधना व तपश्चर्येसाठी हा परिसर निवडला. तळवणे गावाशेजारील तीन बाजूंनी डोंगर व एका बाजूला खाडी अशी दरी पाहून श्री योगीराजांना तेथेच वास्तव्य करण्याची इच्छा झाली. तळवणे गावातील मूळ ग्रामस्थांच्या शुद्ध, सात्त्विक व पवित्र भावनेचे प्रतीक असणाऱ्या श्री देव रवळनाथास श्री योगीराजांनी आपल्या तपोबलाने पाचारण केले व त्यास आपल्या मनातील योगसाधना व तपश्चर्येचा हेतू सांगितला. प्रत्यक्ष सिद्ध पुरुष आपल्या गावात राहू इच्छित आहे हे पाहून श्री रवळनाथास अत्यानंद झाला व त्याने योगीराजास राहण्याकरिता जागा आखून देऊन त्यांचे शिष्यत्व पत्करले. श्री योगीराजांनी त्रिशूल मारून डोंगराच्या पायथ्याशी झरा निर्माण केला आणि डोंगरावरील एका प्रचंड शिळेच्या तळाशी ते ध्यानधारणेस बसू लागले. या निर्जन तसेच जंगलाने वेढलेल्या शिळेखाली ते जेव्हा समाधी लावून बसत, तेव्हा एक वाघ नित्यनेमाने त्यांच्या शेजारी बसत असे. त्या वाघाची समाधी त्याच ठिकाणी कालांतराने बांधली गेली आहे. अशा तऱ्हेने तळवणे गाव हा राजाधिराज योगीराज महंत श्री परशुराम भारती महाराजांच्या तपोभूमीमुळे पावन झाला.
श्री परशुराम भारती हे पहिल्या खेमसावंतांचे मोक्षगुरू असल्यामुळे त्यांच्या मुलांनीही (सोमसावंत, फोंड सावंत आणि लखम सावंत) त्यांना आपले कुलगुरू मानले व तळवणे येथे मठ बांधला. सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेम सावंत यांनी महाराजांच्या योगसामर्थ्याची माहिती घेतली आणि त्यांची भेट घेऊन दर्शन घेतले. पहिल्याच भेटीत ते महाराजांच्या योगसामर्थ्याकडे आकर्षित झाले. त्यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. महाराजांचे शिष्य बनलेल्या श्रीमंत खेम सावंत यांना निर्विकल्प समाधीमध्ये आरोहन अवस्था लाभली. इंद्रिय संवेदन नाहीसे झाले. शरीराची हालचाल बंद झाली. समाधीयोगाच्या अज्ञानामुळे लोकांना असे वाटले की, राजेसाहेबांचे निधन झाले. त्यांनी ओटवणे येथील त्रिवेणी संगमावर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्याची व्यवस्था सुरू केली. यावेळी परशुराम भारती आरोंद्याला होते. त्यांना अंतर्मनाने ही गोष्ट कळली. नदीमार्गे ओटवणे गाठण्यासाठी त्यांनी आपल्या योगसामर्थ्याने तेरेखोल खाडीत भरती आणली व केळीच्या पानावर बसून ते बांधाशेजारील तुळसाण गावापर्यंत पोहोचले. एवढ्यात त्यांना बंदुकीच्या फैरींचा आवाज आला. तिकडे ओटवणे गावी श्रीमंत खेम सावंत यांच्यावर अग्निसंस्कार करून त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली. हे महाराजांच्याही लक्षात आले आणि महाराज तिथून मागे फिरले. मात्र आपला परमशिष्य श्रीमंत खेमसावंतांच्या निधनानंतर श्री महाराज अतिशय दु:खी झाले. त्यांच्या मनात विरक्तीचे भाव दाटून आले. समाधी अवस्थेतच ते तळवणे येथील मठात झोपून राहिले. येणारे भक्तगण त्यांचे दर्शन घेत. आणलेली फुले, प्रसाद त्यांच्या शेजारी ठेवत. अशा प्रकारे फुलांचा ढिग वाढतच गेला, तरीही श्री महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आलेच नाहीत, त्यांनी माघ शु. पौर्णिमा दि. १६ फेब्रुवारी १६४० मध्ये समाधी अवस्थेतच चिरनिद्रा घेतल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या भक्तगणांनी तिथेच जमिनीवर त्यांच्या भोवती बांधकाम केले व वरचा भाग तसाच उघडा ठेवून त्यामध्ये विभूती भरली.
भारतातील जमिनीवर बांधलेली व वरून उघडी असणारी ही एकमेव समाधी असून अलीकडे तेथे नूतनीकरण करताना वरील भाग बंद करून केवळ प्रतीक स्वरूपात एक मोकळी फरशी बसविलेली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या श्री क्षेत्र आळंदी येथील व श्री परशुराम भारती महाराजांच्या श्री क्षेत्र तळवणे येथील संजीवन समाधी व्यतिरिक्त इतरत्र कोठेही अशा प्रकारची समाधी आढळून येत नाही. या संजीवन समाधीमधून प्रतिवर्षी माघ शु. पौर्णिमेला भंडारा उत्सवाचे वेळी विभूती काढली जाते व याप्रसंगी राजघराण्यातर्फे राजेसाहेब स्वत: अथवा त्यांचा प्रतिनिधी छाटी व पूजा तबक घेऊन येतात.
आजपर्यंत सावंतवाडीच्या राजघराण्याने आपल्या अाध्यात्मिक गुरूचा वारसा परंपरागत जपलेला आहे. श्री क्षेत्र तळवणे गाव हे सावंतवाडी, वेंगुर्ले व गोव्याच्या सीमेपासून आरोंदा गावानजीक असून सावंतवाडी येथून तळवणे मठ मार्गे आरोंदा अशी बसगाड्यांची सोय आहे, तसेच आरोंदा येथून तळवणे मठाकडे जाण्याकरिता रिक्षा उपलब्ध असतात. प्रतिवर्षी माघ शु. पौर्णिमेच्या दिवशी “श्रीं”चा मठ परिसरात संचार असतो त्यामुळे साजरा केल्या जाणाऱ्या “भंडारा” या कार्यक्रमास भक्तांची खूपच गर्दी असते. “तळवणे”सारखे एक छोटेसे गाव राजाधिराज योगीराज महंत परशुराम महाराजांच्या तपश्चर्येमुळे पावन झाले असून त्याची कीर्ती सर्वदूर पसरत आहे.
आपल्या वास्तव्याने आणि तपोबलाने तळवणे आणि परिसर पावन करणाऱ्या राजाधिराज योगिराज महंत श्री परशुराम भारती महाराज यांचे भक्तगण, तर महाराष्ट्रभर आहेत.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)