- मनस्विनी : पूर्णिमा शिंदे
समाज परिवर्तन, प्रबोधन यासाठी जसे थोर विचारवंत, व्याख्याते यांचे विचार अनमोल असतात. तसेच संत साहित्याचेही अनमोल मोल आहे. याबद्दल प्रा. डॉ. यशवंत पाटणे सर यांचे सुंदर वाक्य संत साहित्य म्हणजे समाज प्रांगणातील तुळशी वृंदावणे आहेत. खरंच आयुष्याची उसळण विचार की विकार? देवत्वाच्या ज्योती अंधारलेल्या मनात पेटविण्यासाठी ज्यांनी आपल्या लेखणी वाणीच्या ज्ञानचित्तेत वाग्यज्ञ मांडला; असे हे संत साहित्य! आपल्या काव्यप्रतिभेतून मनामनात रुजविला ती भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, रामायण, गीत रामायण, महाभारत, मनाचे श्लोक, गीताई यातून अनुभवास मिळते. शब्दाने भावनेला अर्थ प्राप्त होतो. जीवन व साहित्य यांचा संवेदनशील असा अबिंब प्रतिबिंबित असलेला संग्रह म्हणजे साहित्य.
ऐश्वर्य ते काय गुणाचे? धनाचे? रूपाचे? नाहीतर ते संस्काराचे! चैतन्य, सुख शांती, समृद्धी, स्नेह, संयम, प्रगती, आनंद, परोपकार यामध्ये आहे जे चिरंतन त्यास अखंड म्हणतात. जे झिजते ते चंदन हा गुणधर्म त्याग, सेवा, मांगल्य, करुणा यांचे प्रतीक आहे. सजने सुंदर आहे! मरणे सुंदर आहे. पण त्याहून सुंदर आहे ते जगण्यातून-मरण्यातून “उरणे” या सत्याची कास धरून सर्व दुःखातून सुटका म्हणजे षडरिपूंचा त्याग. निर्मोही, नि:स्वार्थी बनावे. संतांचे आचरण, अनुकरण संत साहित्याचे वाचन जर आपण केले, तर आपला धर्म, पंथ, संस्कृती जोपासली जाते. आपल्या पिढीकडून पुढच्या पिढीस हा वसा आणि वारसा पुढे नेता येतो.
जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, शब्दची आमुच्या जीवनाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका… शब्दची आधार, शब्द धार… शब्दच घडवतात, बिघडवतात. साहित्यातून आपली विचारांची पायाभरणी भक्कम होते, “ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस.” मानवता जीवन धर्म रक्षणासाठी, समतोलासाठी जशी वृक्ष लागवड, जतन, संवर्धन गरजेचे आहे, तसेच समाज विकासासाठी मानवता आणि मूल्य संस्कृती जोपासणे, जतन संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी मोलाचे आहे. त्याचप्रमाणे संस्था अनमोल वाङ्मय मंडळ पुस्तक प्रकाशन, लेखन कार्यशाळा, महाविद्यालय स्पर्धा पुस्तक दिन, संमेलने, वाचन संस्कृती संवर्धन, बालसाहित्य निर्मिती यातून लेखक वाचकांस प्रोत्साहन मिळावे. सहभाग मिळावा प्रेरणा मिळावी आणि सर्वांना व्यासपीठ मिळावं यासाठी प्रतिभावंत, कलावंत निर्माण होतील. या सारस्वतांनी दिग्गज अजिंक्यतारासमान आपल्याला लाभतील.
कबिराचे दोहेही, तुकोबाचे अभंग, मुक्ताईची ओवी, बहिणाबाईंची गाणी, ज्ञानियांचा राजा संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी भूत, भविष्य, वर्तमान यात खूप काही देऊन जातात. शिकून जातात ग्रंथ हेच गुरू जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारा बळ, जिद्द, सामर्थ्य आनंद, कला, गंध, बंध, शस्त्र दुवा, दवा, निर्झर, मृदुता कठोरता, वास्तवता हेच जीवनाचे सार आहे. शब्दरत्नांचे तेज असे प्रकार तेजोयमान सर्जनशील उपदेश संतांच्या साहित्यातून अनमोल लेणी एकनाथी भारुड असे अभंग, काव्य, पंक्ती, ओवी, श्लोक, दोहे, यातून याचे स्मरण होते, आनंदाची प्राप्ती होते. म्हणून संत साहित्य हे अनमोल असे आहे, जीवनाचे दीपस्तंभ आहेत.