- कथा : प्रा. देवबा पाटील
वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू झाला. वेगवेगळ्या प्रकारची मानवोपयोगी झाडे व पळस, पांगारा, काटेसावर, बाभूळ, खैर, रिठा, करंजी अशी काही काटेरी झाडे नि फळझाडे गावाबाहेरील माळरानावर लावली व तेथे आमराई, बोरबन, बाभुळबन, सागवन तयार केले. मुलांनी आणलेल्या वेगवेगळ्या फळझाडांच्या बिया, आंब्यांच्या आठोळ्या काळजीपूर्वक जमिनीत पेरल्या.
त्या दिवशी मुलींच्या हातांमध्ये अनेक विविध झाडांची रोपटे होती. काही मुलांच्या हातात कुदळ, काहींच्या हातात फावडे दिसत होती. काहींच्या हातात पाण्याचे जार होते. ते सारे जणू काही अगदी आनंदाने ऊतू आल्यासारखे वाटत होती. गावचे सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक व काही शिक्षक मुला-मुलींना घेऊन गावात सरपंचांनी सांगितलेल्या जागांवर झाडे लावण्यासाठी गेलीत. मुला-मुलींचा तो उत्स्फूर्त प्रतिसाद बघून गावातील सारेच लोकसुद्धा त्यांच्यासोबत सामील झालेत. गावातील तरुणांनी मुलांच्या हातातील कुदळ, फावडे स्वत:च्या हातात घेतली व खड्डे खोदणे सुरू केलेत. काही तरुणांनी झाडांची रोपटी आपल्या हाती घेतली.
त्या खड्ड्यांमध्ये मुख्याध्यापक, सरपंच, शिक्षक व काही ज्येष्ठ गावकऱ्यांच्या हस्ते गावात वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण झाले. गावातील मोठ्या रस्त्यांवर व मोठ्या चौकात कडूनिंब, गोडनिंब, वड, पिंपळ, आंबा, चिंच, जांभूळ, शिसम, गोड बदाम, कडू बदाम, कढीपत्ता, औदुंबर, कदंब, फणस, चिकू, निलगिरी, कापूर अशी मोठी झाडे लावलीत. त्यातच भरीस भर सरांनी प्रत्येक निंबाच्या झाडाशेजारी गुळवेलीच्या कांड्या लावल्यात. ते बघून तर सारे गावकरी खूपच खूश झालेत कारण गुळवेलीचे औषधी उपयोग सर्वच खेडुतांना माहीत असतात. लहान रस्त्यांवर व लहान चौकांत पेरू, रामफळ, सीताफळ, शेवगा, हदगा, लिंबू यांसारखी फळझाडे, घरासमोरील अंगणात आणि परसबागेत डाळिंब, संत्री, मोसंबी, केळी, पपई, नारळ ही फळझाडे आणि गावातील इतर काही चौकांत बहावा, सोनमोहोर, शाल्मली, पारिजातक, तगर, कण्हेर, बकुळ, खडूचे झाड, गुलमोहर, बकाणी अशी फूलझाडे लावलीत. प्रत्येक झाड लावून झाले म्हणजे ताबडतोब त्याला झारीने पाणी दिले गेले. सरपंच स्वत: खड्डे खोदण्याचे काम बघू लागले, मुख्याध्यापक जातीने झाडे लावण्याची देखरेख करू लागले, तर शिक्षक त्यांना पाणी देण्याचे व्यवस्थापन करू लागले. ‘गाव करी ते राव काय करी’ अशा प्रकारे सर्वांचे बळ एकत्र आले नि वृक्षारोपणाचा कार्यक्रम वेगाने व नीटपणे होऊ लागला.
विशेष म्हणजे गावात जेथे जेथे रोपटे लावले होते, तेथील रोपट्याचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम त्या त्या ठिकाणाच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी स्वयंस्फूर्ततेने आपापसात दिवसांवारी वाटून घेतले. सरपंचांनी मोकाट जनावरांपासून त्या रोपट्यांच्या रक्षणासाठी झाडांसाठी ट्रीगार्ड बनविण्याचे ठरवताबरोबर गावातील एकमेव असलेल्या वेल्डिंगवाल्या वेल्डरने सात-आठ दिवसांतच सारे वृक्षसंरक्षक विनामजुरी बनवून देण्याचे कबूल केले. त्यामुळे दुधात साखर पडली. तोपर्यंत गावातील काही मोकाट जनावरांपाूसन रक्षण करण्यासाठी त्या रोपट्यांना लोकांनी छोटी छोटी काटेरी गोल कुंपणे केली.
नंतर सारेजण मग गावालगतच्या सपाट माळरानावर गेलेत. समस्त जणांसाठी गावातील स्त्रियांनी आपापल्या घरून न्याहऱ्या बांधून आणल्या. जेवणाच्या वेळी साऱ्यांनी मिळून माळरानावरील अगोदर असलेल्या झाडांच्या सावलीत मस्तपैकी वनभोजन केले. तेथीलच डोंगरातून आलेल्या नाल्याचे गार पाणी साऱ्या जणांनी पिले. नंतर पुन्हा त्यांचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू झाला. वेगवेगळ्या प्रकारची आंबे, बिबा, बेल, कवठ, गोंधने, करवंदे, आवळा, बेहडा, हिरडा, देवदार, अर्जुन, सागवान,शमी, आपटा, शिकेकाई, सागरगोटी, चारोळी अशी काही मानवोपयोगी झाडे व पळस, पांगारा, काटेसावर, बाभूळ, खैर, रिठा, करंजी अशी काही काटेरी झाडे नि वेगेवेगळ्या जातींची बोरांसारखी काटेरी फळझाडे गावाबाहेरील माळरानावर लावलीत व तेथे आमराई, बोरबन, बाभुळबन, सागवन तयार केले. मुलांनी छोट्या-छोट्या कागदांच्या पिशव्यांमध्ये व्यवस्थित नावे टाकून आणलेल्या वेगवेगळ्या फळझाडांच्या बिया, आंब्यांच्या आठोळ्या काळजीपूर्वक जमिनीत पेरल्यात.
शेतशिवारांमध्ये बहुविध प्रकारच्या गावरान आंब्यांची रोपटे लावून, कोया पेरून लोकांनी आमराया तयार केल्यात. शेतशिवारांमधील व माळरानावरील रोपट्यांनाही लोकांनी सर्वांनी मिळून हातोहात काटेरी कुंपणे केली. असा दिवसभर हा कार्यक्रम सुरू होता. गावातील वेल्डरकडून तारांची वृक्षरक्षक कुंपणे तयार झाल्यानंतर सरपंच व गावकऱ्यांनीच ती गावातील साऱ्या रोपट्यांभोवती व्यवस्थित व पक्की बसवलीत. त्यांनी आता शिक्षकांचे काहीच कामही पडू दिले नाही. आधीची काटेरी कुंपणे गावाबाहेर नेऊन पुन्हा काही रोपट्यांना लावलीत व मोकाट जनावरांपासून त्यांचेही संरक्षण वाढविले.
पावसाळ्याचे दिवस असल्याने व वृक्षारोपणावर पाऊसही नियमितपणे व व्यवस्थित झाल्याने दिवाळीपर्यंत गावातील सगळ्या लहान-मोठ्या चौकांमध्ये, प्रत्येक छोट्यामोठ्या रस्त्यांच्या बाजूला ट्रीगार्डाच्या आत अंदाजे चार ते पाच फूट उंच अशी हिरवीगार रोपटी वाऱ्यावर आनंदाने डोलू लागली. त्यांना सकाळ-सायंकाळी पाणी देताना आई-बाबांसोबत छोटी छोटी मुलेमुली आपापल्या घराजवळील रोपट्यांसोबत आनंदाने मस्तपैकी झुलू लागली. गावात जिकडेतिकडे शुध्द हवा खेळू लागली.त्यामुळे गावातील रोगराई दूर पळून गेली नि गावकऱ्यांची तब्येतही सुधारली. माळरानावरही सगळीकडे झाडेचझाडे बहरली. तीन-चार वर्षांतच गावकऱ्यांना वेगवेगळ्या ऋतूत मस्तपैकी वेगवेगळी फळेसुद्धा खाण्यास मिळू लागली. सारे गावकरी खुश झाले. फळे खायला मिळाल्यामुळे पुऱ्या गावाचे आरोग्यही चांगले झाले. असा झाडे लावण्याचा समस्त गावकऱ्यांना खूप फायदा झाला.