Wednesday, March 26, 2025
Homeसाप्ताहिककोलाजMultitasking : मल्टिटास्किंग...

Multitasking : मल्टिटास्किंग…

  • संवाद : गुरुनाथ तेंडुलकर

स्वामी विवेकानंद सर्वधर्म परिषदेसाठी अमेरिकेत गेले होते. अमेरिकेत स्वामीजींना मोठा शिष्यपरिवार लाभला. एकदा स्वामीजी त्यांच्या एका शिष्यासोबत अमेरिकेतील काही प्रसिद्ध स्थळं पाहात फिरत होते. तिथे एका बागेत काही तरुण-तरुणी जमल्या होत्या. तिथे एका मोठ्या फलकावर वर्तुळाकार फुगे चिकटवले होते. साधारण २५ फूट अंतरावरून छऱ्यांच्या बंदुकीने ते फुगे फोडायचे, असा खेळ तिथे सुरू होता.

तिथल्या तरुणांचं लक्ष स्वामीजींवर गेलं. त्यातल्या एका मुलानं स्वामीजींना टवाळीच्या स्वरात विचारलं, “चालवणार का बंदूक? फोडणार का फुगे?” त्याचा तो खोचक प्रश्न ऐकून इतर मुलं फिदीफिदी हसली. स्वामीजींनी क्षणाचाही विलंब न लावता त्या मुलाला उत्तर दिलं, “यस्स आय विल… होय मी तयार आहे.”

मुलं पुन्हा फिदीफिदी हसली. स्वामीजींनी शांतपणे त्या मुलाच्या हातातली बंदूक घेतली. त्यात छर्रा कसा भरायचा ते नीट शिकून घेतलं आणि बंदूक त्या फलकावरील फुग्यांवर रोखली. स्वामीजींनी बंदुकीचा चाप ओढला आणि त्या फलकावरील वर्तुळाकार फुग्यांपैकी बरोबर मधला फुगा टिपला. त्यानंतर पुढचा अर्धा तास स्वामीजी बंदुकीत छर्रा भरून एक एक करून फुगा फोडत राहिले. हां हां म्हणता सगळे फुगे त्यांनी फोडले. एकही छर्रा वाया गेला नाही…

उपस्थित सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. मगाशी टवाळी करणाऱ्या त्या तरुणानं स्वामीजींच्या पायावर लोळण घेतली. म्हणाला, मी चुकलो, “तुम्ही ही नेमबाजी कुठे आणि कशी शिकलात ते सांगा.”

स्वामीजी हसले आणि म्हणाले, “नेमबाजी तर मी आत्ताच शिकलो. आयुष्यात मी प्रथमच बंदूक हातात धरली. आज पहिल्यांदाच मी बंदुकीचा चाप ओढला.” स्वामीजींचं हे उत्तर ऐकून सर्वांना वेड
लागायची पाळी आली होती.

“कसं शक्य आहे हे?” सगळ्यांनी एकसुरात विचारलं.

त्यावर स्वामीजींनी हसून उत्तर दिलं. “ज्याचा एकही बाण कधी वाया गेला नाही अशा प्रभू श्रीरामचंद्रांचे आम्ही वंशज आहोत.” त्यानंतर स्वामीजींनी तिथल्या उपस्थित तरुणांना एकाग्रतेचं महत्त्व काय असतं ते विषद करून म्हणाले, “कोणत्याही कार्यावर तुमची श्रद्धा असली आणि मन स्थिर एकाग्र झालं तर चमत्कार वाटावे अशा घटना सहजतेनं घडतात.”

आज ही गोष्ट सांगण्याचं कारण, म्हणजे काल मी माझ्या एका मित्राच्या घरी गेलो होतो. तिथे त्याचा नातू डायनिंग टेबलवर बसून जेवत होता. एका बाजूला टीव्ही सुरू होता. त्यावरचा कार्यक्रम तो ऐकत पाहात होता. एका कानात इअरफोन लावून तो कुणाशी तरी मोबाइलवर बोलत होता. समोर उघडून ठेवलेल्या लॅपटॉपमध्ये पाहून मध्येच काहीतरी टाइप करत होता. वाचत होता… आणखी एका मोबाइलवर त्याचं व्हॉट्सअॅपवर आलेल्या पोस्ट आणखी इतरांना फॉरवर्ड करणं सुरू होतं.

मला आश्चर्य वाटलं, मी मित्राला विचारलं, “काय करतो हा मुलगा?”
“बारावीला आहे. पुढच्या आठवड्यात त्याची परीक्षा आहे.”
“ओह…” माझ्या तोंडून सुस्कारा बाहेर पडला.
“अरे ही आजची पिढी खूप फास्ट आहे. एका वेळी अनेक कामं करतात. मल्टिटास्किंग म्हणतात त्याला.” मित्राने माझ्या ज्ञानात भर घातली.
“हो? असेल असेल…” मी वाद वाढवला नाही. पण डोक्यात मात्र विचारांचं चक्र सुरू झालं. खरोखरच मल्टिटास्किंग हा प्रकार अस्तित्वात असतो का? माणसाचा मेंदू एकाच वेळी अनेक सूचना घेऊन त्याबरहुकूम कार्य करू शकतो का? याचं उत्तर “नाही.” असं आहे.

आपण सर्वसामान्य माणसं एकाच वेळी अनेक कामं करायला जातो. अनेकांना असं वाटत देखील असतं की, आपण एकाच वेळी अनेक कामं करू शकतो. पण ते धादांत खोटं आहे. माणूस ज्यावेळी एक काम करत असताना दुसरं काम करतो, त्यावेळी त्याचं पहिल्या कामावरचं लक्ष दुसऱ्या कामावर गेलेलं असतं. पुन्हा पहिल्या कामाकडे येताना त्याच्या मेंदूला काही क्षणांचा अवधी लागतो, ही गोष्ट अनेक मानसशास्त्रज्ञांनी आणि शरीरशास्त्रातील पारंगत डॉक्टरांनी सप्रमाण सिद्ध केली आहे. आपणच जरा विचार करा –

आपल्या एखाद्या जवळच्या नातेवाइकाचं ऑपरेशन करताना जर ते डॉक्टर आणि त्यांची टीम ऑपरेशन थिएटरमध्ये टीव्ही लावून त्यावर क्रिकेटची मॅच बघत किंवा मधे मधे मोबाइलवर बोलत, व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवत… मध्येच डब्यातलं खात खात ऑपरेशन करू लागले तर… त्यावेळी त्यांनी तशा प्रकारचं मल्टिटास्किंग केलेलं तुम्हाला चालेल का?

याचं उत्तर जर “नाही.” असेल, तर आपल्या हातात एक काम सुरू असताना अशाप्रकारचं मल्टिटास्किंग करावं का?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -