- निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
भारतात एकूण सण किती हे आपण सांगू शकत नाही, कारण भारतात अनेक राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यानुसार विविधतेने सण साजरा केला जातो. महत्त्वाचे म्हणजे सणांची नावे वेगळी असतात. पण साजरा करण्याच्या पद्धती त्या त्या राज्यानुसार असतात. भारत एकच असा देश आहे की, जिथे सर्व मौसम असतात आणि ऋतूनुसारच त्या त्या राज्यात ते सण साजरे होतात.
हिंदू संस्कार आणि संस्कृतीतला एक भाग म्हणजे आपले सण आणि उत्सव. या सणांची निर्मिती का झाली? जर खोलवर विचार केला, तर काही गोष्टी लक्षात येतात. पूर्वीचे ऋषीमुनी हे अत्यंत बुद्धिमान वैज्ञानिक होते. त्यांना सर्वसामान्य लोकांची मानसिक स्थिती त्यांची बुद्धिमत्ता पूर्णपणे माहीत होती. भूत, भविष्य आणि वर्तमान काळाचा पूर्ण विचार करून त्यांनी या पर्यावरणाला वाचविण्यासाठी म्हणजे ही पंचतत्त्व सुदृढ करण्यासाठी, समाजाला सकारात्मक बनविण्यासाठी सणांची निर्मिती केली. जी समाजाला अंधश्रद्धेकडे न नेता योग्य तऱ्हेने महापुराण, गीता, रामायण, वेद यातून पूजा-पाठ, मंत्रोच्चार, होम हवन यातर्फे समाजापर्यंत त्यांनी विज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न केला. ज्यासाठी नियम बनविले गेले त्याला आपण रूढी-पारंपरिक पद्धती म्हणतो. प्रत्येक सण-उत्सव हा सजीव सृष्टीशी निगडितच आहे. ज्याची निर्मिती अभ्यासपूर्वक संशोधनात्मक आणि परिपूर्ण संयोजनानेच झालेली आहे.
सर्वच सणांबद्दल मी तुम्हाला इथे सविस्तर सांगू शकणार नाही. पण काही सणांबद्दल थोडक्यात सांगते. कोणत्याही धर्मात पूजा-प्रार्थना करणे म्हणजे ध्यानधारणे मधून शरीराचे, मनाचे नकळतपणे होणारे शुद्धीकरण. शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण हे आपल्या संतुलनासाठीच आहे. ही प्रक्रिया नैसर्गिक संरक्षण आणि संवर्धनासकट व्हावी म्हणूनच झालेली ही सणांची निर्मिती. फक्त आपल्या भारतीय संस्कृती आणि संस्कारांमध्येच या जगात ब्रह्मांडापासून ते प्रत्येक सजीव सृष्टीतील घटकांना सुदृढ करण्यासाठी अनेक गोष्टींची रचना या ऋषीमुनींनी केल्या आहेत.
भारतात राष्ट्रीय, बौद्ध, सिंधी, हिंदू, जैन, मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी, शीख असे अनेक सांस्कृतिक सण आणि उत्सव साजरे केले जातात. भारतात एकूण सण किती हे आपण सांगू शकत नाही, कारण भारतात अनेक राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यानुसार विविधतेने सण साजरा केला जातो. महत्त्वाचे म्हणजे सणांची नावे वेगळी असतात. पण साजरा करण्याच्या पद्धती त्या त्या राज्यानुसार असतात. तरीही एकाच वेळेला बरेच सण साजरे केले जातात. याचाच अर्थ ऋतूनुसार हे सण साजरे होतात. भारत एकच असा देश आहे की, जिथे सर्व मौसम असतात आणि ऋतूनुसारच त्या त्या राज्यात ते सण साजरे होतात. त्यामुळे या वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण पारंपारिक संस्कृती आणि संस्कारानुसार झालेल्या सणांचा परिणाम हा पूर्णपणे त्या राज्यातील हवामान, तेथील जमीन, पर्यावरण, पशुपक्षी, मानव यांच्यावर होतो. प्रत्येक सणांमध्ये विशिष्ट मर्यादा आहेत. वर्षभर खूप सण असले तरी आपण पावसापासून या सणांची एक आखणी थोडक्यात पाहूया, या जूनपासून ते त्या जूनपर्यंत झालेली.
पावसाळ्यात येणारे सर्व सण उपवासाचेच आहेत. आपण श्रावण पाळतो म्हणजे पूर्ण महिना शाकाहारी. कारण पावसाळ्या दरम्यान होणारे आजार आपल्याला होऊ नये यासाठी जे पदार्थ आपल्यासाठी योग्य आहेत की ज्यामुळे आपल्याला अन्नपचन होणार आहे असा हलका आहार या उपवासाच्या माध्यमातून खाल्ला जातो. जड अन्न खाल्ल्याने अनेक आजार होतात. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी असते या सर्वांचा विचार केल्यामुळे तेच सण पावसाळ्यात आले आहेत. पावसाळ्यात उगवणाऱ्या प्रत्येक वनस्पती ह्या आपल्या आजारांशीच संबंधित आहेत. रानभाज्या, रानमेवा, औषधी वनस्पती या सगळ्यांची रेलचेल या ऋतूत असते. टाकळा, कपाळ फोडी, कर्टोली, अळू, आघाडा, मायाळू, अडुळसा अशा सगळ्या औषधी वनस्पती सगळीकडेच दिसायला लागतात. म्हणजेच ऋतूनुसारच फळ, फुलं, वनस्पती उगवत असतात आणि हे पशुपक्ष्यांना चांगले माहीत असते म्हणूनच ते आजारी पडत नाहीत. कारण ते निसर्गनियमानुसार चालतात. जून-जुलै-ऑगस्ट या पावसाळ्याच्या दिवसात जास्त सण येतात. त्यानंतर छोट्या मोठ्या सणांबरोबर नोव्हेंबर मध्ये सर्वात मोठा सण दिवाळी येतो. प्रत्येक सण हा या निसर्गाबरोबरच संबंधित आहे. या सणांमध्ये असणाऱ्या पूजाअर्चा, त्यात असणारे श्लोक, मंत्र हे सर्व सजीव सृष्टीला सुदृढ करतात. प्रत्येक सणांमध्ये विशिष्ट मर्यादा आहेत. जी फळ ज्या मोसमानुसार उगवतात तोच फलाहार करण्याचा आग्रह त्या त्या सणांमध्ये आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असणारे उपवास पूजा-पाठ त्यावरून असलेला आपला आहार म्हणजेच भारतीय अन्न. हाच सर्व आजारांवरचा उपाय आहे. निसर्गनियमानुसार घेतलेला आहार हा आपल्याला निरोगी ठेवून नक्कीच दीर्घायुष्य देतो.
प्रत्येक सण साजरा करण्यामागे एकच उद्देश आहे. मानवाची निसर्गाशी जवळीक आणि पंचतत्वाचे संतुलन. या सणांच्या रूपाने मानवाकडून निसर्गाची भक्ती करण्यात यावी आणि संरक्षण आणि संवर्धन करण्यात यावे यासाठी या सणांची निर्मिती करण्यात आली. मुळातच मानव खूप श्रद्धाळू आहे आणि हळव्या मनाचा सुद्धा. तेव्हा कुठेतरी कळत नकळत त्याच्यावर चांगले संस्कार व्हावे आणि तो मानसिक आणि शारीरिक सुदृढ व्हावा यासाठी हे परिपूर्ण आणि आपल्या आरोग्याशी, कुटुंबाशी, या पर्यावरणाशी पूर्णपणे निगडित अशी या सणांची नियोजित पणे आखणी करून परिपूर्ण सजीवसृष्टींसाठी पर्यावरण संतुलन होण्यासाठी असलेली ही सणांची निर्मिती.
सकाळी उठल्यापासून “कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, कर मध्ये गोविंदम्, प्रभाते कर दर्शनम्” ते रात्री झोपताना परमेश्वराला हात जोडून दर्शन घेईपर्यंत “ओम श्री पद्मनाभय नमः” हा शांत झोप लागण्यासाठी असलेला मंत्र आपल्या शास्त्रांमध्ये आहे. सकारात्मकता आणि शक्ती ही फक्त आपल्या अध्यात्मामध्येच आहे.
प्राचीन काळापासून सकाळी उठून स्त्रिया तुळशीची पूजा करीत, कारण तुळस ही २४ तास ऑक्सिजन देत असते. स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कायमच कमी असते, त्यामुळे त्यांना शारीरिक अनेक त्रास होत असतात. जेव्हा स्त्री सकाळी तुळशीची पूजा करते, तेव्हा पूजा केल्यानंतर ही तुळशीची दोन पानं प्रसाद म्हणून खाणारच, असे एक गणित होते. पाळीच्या दिवसात तुळशीवर सावली पडू नये म्हणून त्या स्त्रीला पूजा करण्याची परवानगी नव्हती, कारण एवढेच होते की, एकत्रित कुटुंबामुळे त्या स्त्रीला पाच दिवसांचा आराम मिळावा हे सर्वश्रुत आहे. ती तुळशीची पूजा करीत असे, त्यानंतर तिने बनवलेल्या जेवणाच्या प्रसादावर तुळशीचे पान ठेवून त्याचा नैवेद्य देवाला ठेवण्यात येत असे, कारण तुळशीत असणाऱ्या गुणधर्मामुळे कोणताही हानिकारक जीव ते शिवत नसल्यामुळे अन्न निर्मळ, शुद्ध, परिपूर्ण होत असे. पण काळाच्या ओघात घरातली तुळशी वृंदावनही गेलीत आणि त्यांची पूजा ही थांबली. तुळशीत ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्यामुळे आणि स्त्री सतत स्वयंपाक घरात काम करत असल्यामुळे तिच्यात नैसर्गिकरीत्या ऑक्सिजनचा स्तर कमी होऊन तिला अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत असे. तुळशीमध्ये असणारे अनेक आजार बरे करण्याचे गुण त्या स्त्रीला सगळे कुटुंब आरोग्यवंत ठेवण्यासाठी भाग पाडीत असे. लहान बाळांच्या हवामान बदलानुसार होणाऱ्या आजारांपासून ते वृद्धांना होणाऱ्या आजारांपर्यंत सर्व आजार बरे करण्याचे गुण हे फक्त तुळशीत होते. जन्मलेल्या बाळाला सुद्धा तुळशीचा काढा दिला जातो आणि मृत्यूनंतर ही आपल्या तोंडात तुळशीचेच पान ठेवले जाते. सर्व गुणसंपन्न असणाऱ्या या तुळशीचे महत्त्व आपल्याला पटावे म्हणून तुळशीची पूजा ही कायमच केली जाते आणि प्रत्येक पूजेत तुळस वापरलीच जाते. वास्तुशास्त्र नियमानुसार घराच्या मुख्य द्वारात लावण्यात येणारी झाडे, पडवीत लागणारी झाडे यांचेसुद्धा नियम केले गेले. पुढील भागात पाहूया आपले काही सण आणि ऋतूमान व प्रकृतीनुसार त्यांचे महत्त्व…
क्रमश:
dr.mahalaxmiwankhedkar@gmail.