Friday, July 11, 2025

Smile : ओठांची मोहर खोलना...

Smile : ओठांची मोहर खोलना...

  • हलकं-फुलकं : राजश्री वटे


एक अनोखं वरदान आहे हसणं... मानवी चहऱ्याला मिळालेलं! अनेक भाव दर्शवते हे हसू... कितीतरी उपमा मिळाल्या आहेत हसण्याला!



जितकं लाजरं, तितकं साजरं... जितकं दिलखुलास तितकं दिलखेचक...!



कधी बरसणारं चांदणं, कधी दु:खाची किनार असलेलं... मधुर, गोड, मधाळ, लडिवाळ हे सौम्य हास्य प्रकारात मोडणारे...



खट्याळ, मिश्कील, खुदुखुदू हे खेळकर हास्य प्रकारातले...



या हास्यांचे शत्रूदेखील आहेत. जसे, छद्मी, कपटी, भेसूर, कुत्सीत, धूर्त! सहानुभूती मिळवणारे हसू... केविलवाणे, भकास, दयनीय...



हसू कसं फुलतं बघा... डोळ्यांतून, खळीतून, ओठांतून, हळुवार, प्रेमळ झांक असते त्यात... मैफलीत गाणं म्हणताना ओठांवर स्मित असेल, तर गाणं अधिक खुलत जातं... निवेदकाचा चेहरा हसरा हवाच, रंगणारच नाही कार्यक्रम हास्याशिवाय...



कुणाचा चेहराच हसरा असतो, बघताच प्रसन्न वाटतं... काही चेहऱ्यांवर कायम बारा वाजले असतात, किती वर्षात हसला नसेल हा चेहरा... असा प्रश्न नक्कीच पडतो!



बाळाच्या चेहऱ्यावरचे खट्याळ, गोजिरवाणे भाव बघताच नकळत हसू येतं, नंतर तेच अवखळ होत जातं, ओठतून फुटू लागतं, तरुणाईच्या हास्याचे अनेक रंग उलगडत जातात!!



तिचं हसू म्हणजे... मधुर, मधाळ, लाडीक, लडिवाळ, मादक, गालातल्या गालात फुलतं, कधी ओठातून, तर कधी खळीतून, कधी हास्याचे फवारे असतात. कधी झऱ्याचा खळखळाट, तर कधी कोसळणारा धबधबा... नववधूचे अश्रूसुद्धा लाजरं हसतात ओल्या पापणीआडून!



त्याचं हास्य... कधी सात मजली, तर कधी डोळ्यांतील मंद हसू प्रेमळ संवाद साधतात आणि हे संवाद वाचता वाचता हसली... ती फसली!



अनेक पावसाळे पाहिलेली ती... अनुभवाचं गंभीर हसू असते, तर कधी हळवं... कधी समाधानाचं सुद्धा!



करड्या केसांमधील त्याच्या मिशीतल्या मिशीत हसण्यामध्ये समुद्राची गहराई असते, तृप्तीचं लेणं असतं... एक मोठा निश्वास असतो!



हे सगळं पार करत पुन्हा निरागसतेकडे वळतं ते हसू... म्हणजे वृद्धत्व!



जन्मापासून सुरू होते ही हास्य क्रिया... ती आयुष्याचे सर्व रंग पांघरून पुन्हा पहिल्या हास्यप्रक्रियेवर येऊन थांबते!



मग हसताय ना... हसलंच पाहिजे... एक बार मुस्कुरा दो...

Comments
Add Comment