- ऋतुराज : ऋतुजा केळकर
कलाकार हा कसा असावा बरं? मनस्वी… संवेदनशील… आता आपला नाना पाटेकर किंवा अगदी मकरंद अनासपुरेचं पाहा ना… आज समाजाने त्यांना त्यांच्या फक्त अभिनयाकरिताच नावाजलयं असं नाही, तर आपण या समाजाचे काहीतरी ऋण लागतो, या जाणिवेतून त्या दोघांनी “नाम” या संस्थेची स्थापना केली. त्याद्वारे ते दोघेही करत असलेल्या समाजकार्याला तोड नाही. पण… परवा पुण्याच्या एका व्हीडिओमुळे मन व्यथित झालं.
‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसी’ हे बोधवाक्य लक्षात घेऊन या भूमातेकरिता जर पुढे येऊन कोणी काही करेल तो आजचा तरुण… अशी व्याख्या मी आजच्या संपूर्ण तरुणाईची करेन. मग तो पाच वर्षांच्या बालकापासून ते शंभर वर्षांच्या वयोवृद्धापर्यंत कुणीही असू शकतो. यातीलच एक तरुण “पिंट्या भाई” यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. सदर गृहस्थ हे पुणेकर असून एक कलाकार आहेत असं कळलं. हे पुणेकर, पुण्यातील एका टेकडीवर सुप्रभाती फिरायला गेले असता, त्यांना तिथे दोन अत्यंत कोवळ्या मुली नशेत धूत होऊन अर्धवट बेशुद्धावस्थेत आढळल्या. एक सजग तसेच समाजातील आदर्श नागरिक म्हणून यांनी काय केलं असेल, तर ताबडतोब त्यांनी त्यांचा चांगला दहा-बारा मिनिटांचा व्हीडिओ काढला आणि त्यात, “मलाही ‘याच’ वयाची मुलगी आहे. त्यामुळे एक जागृत पालक म्हणून मला ही गोष्ट प्रचंड खटकली आहे की, सदर मुली या बाहेरगावच्या असून त्यांच्या पालकांनी त्यांना इथे उच्च शिक्षणासाठी पाठवले आहे आणि ही अशी मुलं इथे येऊन आपल्या पुण्याचं वातावरण बिघडवत आहेत. म्हणूनच या अशा बेलगाम मुलींना आळा घातलाच पाहिजे आणि त्यामुळे या नशेबाज ‘मुली’ पुण्यनगरीची संस्कृती रसातळाला पोहोचवत आहेत.” असं कळवळून या गृहस्थांनी सांगितले आणि भराभर फेसबुक म्हणून नका, इंस्टा म्हणून नका, व्हाॅट्सअॅप म्हणू नका, जमेल तितक्या सोशल मीडियावर पोस्ट करून ‘बाहेरगावच्या नशेबाज मुली हटाव… पुणे बचाव’ ही मोहीम उघडली आणि मग… त्या मुलींना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. ते सारं इतकं तळमळीने या पिंट्याभाईंनी केलं की, माझ्या डोळ्यांतून तर घळाघळा अश्रूच वाहू लागले.
अशा तथाकथित आणि स्वयंघोषित समाजसेवकांचं मला भारी कौतुक वाटतं. कारण पहिली गोष्ट म्हणजे सशक्त आणि सुदृढ समाजाकरिता अशा प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या समाजसेवकांची समाजाला अत्यंत गरज आहे. कारण या गृहस्थांना एव्हढ्या मोठ्या टेकडीवर फक्त या दोनच ‘मुली’ नशा करताना दिसल्या, तिथे दूर दूरपर्यंत कुणीही असा पुरुषवर्ग नव्हता की जो अशा प्रकारे नशा करत होते… नाही का…? नाहीतर त्यांनी ‘त्यांचाही तसा’ व्हीडिओ नक्कीच केला असता. पण जर का सदर गृहस्थांनी तेथील अशा नशा करणाऱ्या पुरुषांचा व्हीडिओ करण्याचा ‘प्रयत्न’ जरी केला असताना तरी त्या नशेबाज गावगुंडांनी त्यांना असा धू धू धुतला असता ना की सुप्रभाती टेकडीवर फिरायला जाणं तर सोडाच, पण हे सद्गृहस्थ स्वतःच्या घरातही शतपावली घालण्याच्या लायकीचे उरले नसते.
अगदी परवा परवाच एका सुप्रसिद्ध अशा पुणेकर बिल्डरनी सोशल मीडियावरच मान्य केले आहे की, “हल्ली पुण्यातील डेक्कनसारख्या परिसरात तोकडे कपडे, अर्वाच्च भाषा, गुंडगिरी आणि नशा हे इतके वाढले आहे की, आम्हाला संध्याकाळी फिरायला जाणचं नकोसं होतं.” मग ही पुण्यात सर्रास वावरणारी आजची बेलगाम, बेमुर्वत पुणेरी तरुण पिढी ही संपूर्णपणे पुण्याच्या बाहेरून आलेली असून पुण्यातील स्थानिक कुणीही यापूर्वी आणि आताही असं वागत नाही असं म्हणावं का?
कसं आहे ना की, आजकालचं नव्हे, तर पूर्वापारच प्रत्येकालाच स्वतःची वाह वाह करून घ्यायला आवडतं आणि त्यात काही गैरही नाही. बरं पण, ते करत असताना आपण समोरच्याचं जे काही नुकसान करत आहोत, त्याकडे सरळसरळ कानाडोळा करून प्रसिद्धीच्या झोतात राहणारे हे संधीसाधू समाजसेवक हे अक्षरशः कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे जागोजागी दिसून येत आहेत. त्यामुळे समाजात वावरताना आजूबाजूला कोणताही वाईट प्रसंग घडला की हे सोशल मीडियावरील तथाकथित पुरोगामी समाजसेवक आपापले मोबाइल घेऊन सरसावतात. काही महिन्यांपूर्वी बदलापूर गाडीत एका स्त्रीवर ट्रेनमध्ये जागा पकडण्यावरून जो भयानक हल्ला झाला ते यांचे जिवंत उदाहरण आहे असं नाही का वाटतं तुम्हाला? त्या क्षणी मोबाइलवर शूटिंग करण्याऐवजी जर का सर्व दोनेकशे बायका मधे पडल्या असत्या, तर त्या स्त्रीशी हा जीवघेणा प्रकार घडलाच नसता. आता या प्रसंगात ही पिंट्याभाईंनी समाजापुढे ही जी व्यसनाधीनता आणली ती खरोखरच अत्यंत प्रशंसनीय आहे याबद्दल प्रश्नच नाही. पण… तो वेगवेगळ्या अँगल्समधून व्हीडिओ काढत बसण्याऐवजी प्रथमदर्शनीच त्या मुलींना वैद्यकीय सेवा मिळवण्याचा प्रयत्न का बरं केला गेला नाही…? शिवाय हे करत असताना अगदी ठळकपणे त्या मुलींचे चेहरे बघ्यांना व्यवस्थित दिसतील याचीही काळजी यांनी घेतलेली दिसत आहे. या जागी त्यांची स्वतःची मुलगी जर का अशा अवस्थेत आढळली असती, तरीही ते तिचा असाच जास्तीत-जास्त चेहरा व्यवस्थित दिसेल, असा व्हीडिओ काढत बसले असते का? की त्यांनी तिला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता…? आणखी एक प्रश्न मनात डोकावून गेलाच की जो मी विचारू इच्छिते… “पिंट्या भाई, आपणाला नक्कीच सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसेलच… हो ना…???”
मी मान्य करते की, त्या आणि त्यासारख्या तरुण पिढ्या या चुकीच्या मार्गाने जात आहेत. आपणही या वयातून गेलो आहोत. थोड्या अधिक प्रमाणात आपल्या तरुणपणीही आपल्याही हातून चुका झाल्या आहेतच. इथं कुणीही यातून सुटलेला नाही. पण म्हणून आपल्या त्यावेळी आजूबाजूला असलेल्या काका, मामा, मावशांनी असा त्यांचा प्रपोगंडा कधीच केला नाही, तर उलट घरी न समजू देता बाहेरच्या बाहेर आपल्याला कधी मदत करून, तर कधी धाटधपटशा दाखवून त्यातून बाहेर काढून सन्मार्गावर आणले. पिंट्या भाई आणि त्यांसारख्या सोशल मीडियावर वावरणाऱ्या व्यक्तींना मी विचारते की, अशा पद्धतीने त्या मुलींना एक्सपोझ करून तुम्हाला काय मिळालं…? जेव्हा भविष्यात यांना आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होईल आणि त्या परतीच्या प्रवासाला लागण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा या एका व्हीडिओमुळे त्यांचा तो मार्ग कायमचा बंद होऊ शकतो इतकही कळू नये…? बरं या प्रकरणी बदनामीला घाबरून जर या दोन्ही मुलींपैकी कुणी एकीने जरी जीव दिला तर…? किंवा यांचा फायदा घेऊन समाजकंटकांनी त्याना पुढे जाऊन अजूनही वाममार्गाला म्हणजे वेश्या व्यवसायात किंवा गुन्हेगारी क्षेत्रात ओढलं, तर याला जबाबदार कोण…? या आणि अशा समाजसेवकांच्या विरोधात कायद्यात काही सजा आहे की नाही…? आणि जर ती असेल, तर मग सरकारने ती कडक पावले तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे… तरच या आगाऊ व्हीडिओप्रेमींना चाप बसेल.
पुणे शहर हे माझे अतिशय आवडते शहर आहे. अगदी खरं सांगायचं झालं, तर “पुणे तिथे काय उणे” ही उक्ती या सुबक, सुंदर आणि पर्यावरणप्रेमी शहरास अगदी चपखल बसते, असं माझं प्रामाणिक मत आहे. पण एक छोटासा प्रश्न या पिंट्या भाईंमुळे माझ्या मनात आला आहे तो म्हणजे, “पुण्यात चारशे कोटी ड्रग्सचा साठा सापडला अशी बातमी सध्याच झळकली आहे” त्या धर्तीवर या गृहस्थांनी हा व्हीडिओ केला, असं ते म्हणतात. ते पुढेही असं म्हणतात की, “त्या नशेचं ही परगावातून आलेली मुले सेवन करतात. त्यामुळे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखली जाणारी पुण्यनगरी आता पार बिघडत चालली आहे.” पण… पण… पण… आपण असं म्हणू या का? की, “हे सर्वच्या सर्व ड्रग्स हे फक्त आणि फक्त पुण्याच्या बाहेरून आलेले लोकंच वापरतात का? यापूर्वी म्हणजे हे लोकांचे लोंढे येण्यापूर्वी आणि आताही शंभर टक्के पुणेकर पूर्णपणे निर्व्यसनी आहेत असं म्हणायचं का…?”
मी काही त्या नशेबाजांची बाजू घेत नाहीये. हे ही मान्य आहे की, एक नासका आंबा संपूर्ण आढी नासवतो. पण “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट” हा आविर्भाव अयोग्य आहे. मी परत एकदा नमूद करते कीम पिंट्या भाईंनी जे केलं ते खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. पण हाच प्रकार खूप खूप वेगळ्या पद्धतीने हाताळला जाऊ शकत होता… असं नाही का वाटतं तुम्हाला…?
विचारांची तसेच वयाची परिपक्वता ही आपल्या कृतीमध्ये दिसून आलीच पाहिजे. पिंट्या भाईंसारखे हे यूट्यूबर असे व्हीडिओ चित्रीकरण करून सोशल मीडियावर पुढचा पाठचा विचार न करता प्रसिद्धीकरता टाकतात. आज पुढे, त्या कोवळ्या मुलींपुढे संपूर्ण आयुष्य आहे. त्यांना सावरायला, घडवायला त्यांचे पालक सक्षम आहेतच त्याबद्दल तर प्रश्नच नाही. पण आपण जेव्हा सोशल मीडियावर वावरतो, तेव्हा सर्वार्थाने यांचा विचार करणं गरजेचं आहे की, आज जे समोर घडत आहे, ते माझ्या बाबतीतही केव्हाही घडू शकते, असं मला वाटतं आणि हातातील मोबाइलचा वापर हा फक्त व्हीडिओ करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी नसून सर्वप्रथम मदतीकरिता आहे हे विसरून चालणार नाही आणि या सोशल मीडियाच्या बळावर समाजात सत्-प्रवृत्तींचा विकास होणं गरजेचं आहे, हा विचार मनात जोपासला गेला पाहिजे. काही वेळा स्वार्थाच्या पलीकडे जाऊन ‘मी मी’ करतं समाजात फक्त आपली लाल करण्याच्या प्रयत्नात कधी कधी आपलाच आत्मकेंद्री स्वभाव हा उघडा पडू शकतो असं नाही का वाटतं तुम्हाला…? नशेच्या तसेच समाजातील वाईट गोष्टींच्या विरोधात उभं राहाणं हे कधीही उत्तमच आहे आणि ते साऱ्यांनाच जमतं असंही नाही पण, या ठिणगीची त्या दोन्ही मुलींच्या आयुष्यात लाव्हा झाली, तर त्याला जबाबदार कोण…???
अधम वृत्तींच्या विरोधात उभे राहताना सारासार विचारांची तितकीच गरज आहे. थोडंसं मंथन केलं, तर लक्षात येईल की, ऋतूचक्राच्या या करुणामय एकांतात वाट चुकलेल्या या कोकरांना गरज आहे ती, मायेची पखरण घालणाऱ्या हाकेची की ज्यामुळे, त्यांच्यासमोर आलेल्या एकच प्याल्याला झुगारून मायेच्या मोरगोंदणी सावलीत शिरण्याची ओढ निर्माण व्हायला हवी. नाहीतर निर्लज्ज देहोत्सवाला चटावलेले आणि वासनेने बरबटलेले धनदांडगे लांडगे या अश्राप जीवांचे लचके तोडण्यासाठी मोकाट सुटलेलेच आहेत.
म्हणूनच म्हणते, कट्यार ही हिऱ्याची असली तरी ती कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहात नाही म्हणूनच आपल्या म्यानातील कट्यारीचा वापर कसा करावा हे ज्याचे त्यानेच ठरवायचं असतं आणि सोशल मीडिया हीदेखील अशीच एक कट्यारच आहे बरं. आता त्या निरागस वाट चुकलेल्या मुलींबद्दल म्हणालं, तर माझ्या शब्दांतच सांगायचे झाले तर…
“ती मंदिरात तडफडली… रक्ताळली…
ती जमीनच होती, भेगाळलेली…
कारण… ऋजूतेनं मोहरलेल्या…
अर्धोन्मिलीत कळीला…
कुणीतरी होती… पोखरलेली…”