- नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड
बाबुरावीण म्हणजे चोणगावातला ढाण्या वाघ. चोणगावची ही म्हातारी नवऱ्याविना एकटी टुकीनं राहात होती. तिच्या तिन्ही मुली मुंबईकडे दिलेल्या होत्या आणि ती वस्ताद म्हातारी मनास येईल, तेव्हा त्यांच्या घरला एष्टीत बसून जात होती.
झिंज्या पसरलेल्या. डोळे तांबारलेले. नाक फुगलेले… गाल फुग्ग-फुस्स फुग्ग-फुस्स करीत लक्ष वेधून घेणारे…
भानुमती हातवारे करीत गोल पिंगा घालीत होती. मधेच विकट हसत होती. दात करदावत होती. हनुमान उडी मारून घशातून विचित्र आवाज काढीत होती.
“अंगात भुताचं वारं शिरलं तिच्या… भगत बोलवायला हवा…”
“भानुमतीच्या सासूची आता काय खैर नाय… बोंबा मारत फिरती गावभर भानुमतीच्या नावानं… आता हे भूत पिशाच्च भानूच्या सासूची मानगुट पकडतं की नाय बघ. लगी बेट!” ज्ञानोबा नि मालोजी एकमेकांशी बोलत होते. बाबुरावीण ऐकत होती. तिची म्हातारी हाडं कडकडली. भानुमतीची सासू तिची सख्खी मैत्रीण होती. उगाच बोंबलत नव्हती ती भानूच्या नावे. भानू म्हणजे आळशी ओंडा नि चिकट गोंडा होती. असली चेंगट… असली चेंगट… की सकाळच्या जेवणाची संध्याकाळी पंगत. बिचारी सासूमाय… तिच्या अंगाला चिकटलेली चूल साठीची झाली तरी सुटत नाय आणि ही माणसं बेट लावतायत. बाबुरावीण तरातरा पुढे झाली आणि गुरं हाकायची शिमटी तिनं भानुमतीच्या कंबरेवर दाणकन फटकारली. भानुमती चवताळली, पण बाबुरावीण आता ऐकायला तयार नव्हती. भानुमतीच्या अंगावर सपासप वार करीत ती बडबडू लागली.
“कसं भूत निघत नाही बघते ना. अगं भूत तुला पछाडतं, तर ही शिमटी पिशाच्चाकडून आणलीय मी.”
सप् सप् सप्पासप्! शिमटी वळ उठवू लागली. रक्त काढू लागली तसं भानुमतीचं भूत हादरलं.
“ह्यो पिशाच्च भयाण आसा.” ती घाबरून ओरडली नि पळू लागली. आख्खं चोणगाव बाबुरावीण आणि तिची शिमटी ह्यांच्याकडे आ वासून पाहू लागलं नि तिनं शिमटी गरगर फिरवताच पांगलं. भानुमतीची सासू मात्र देवळीच्या आडोशाला जीव धरून बसली होती. बाबुरावीण तिथं गेली… तशी भानूची सासू लगालगा पुढे झाली आणि तिनं बाबुरावीणीस घट्ट मिठी मारली. इतके दिवस तिला सुनेला अद्दल घडवायची होती… पण मऊ स्वभावामुळे जमत नव्हतं.
“आता माझी म्हातारी हाडं मोडतील बयो तुझ्या कडाडमिठीमधी.” बाबुरावीण म्हणाली. दोघी किंचित विलग झाल्या आणि त्यांनी एकमेकींच्या हातावर टाळ्या दिल्या.
बाबुरावीण म्हणजे चोणगावातला ढाण्या वाघ. नवऱ्याविना एकटी टुकीनं राहात होती. तिच्या तिन्ही मुली मुंबईकडे दिलेल्या होत्या आणि ती मनास येईल तेव्हा त्यांच्या घरला एष्टीत बसून जात होती.
“चोणगावचं बोचकं पार्कसाईटीला पडलं” ती धाकट्या लेकीला दर महिना पंधरा दिवसांनी भेटीस येते सांगायची. जावयाला खुशाल बाहेर झोपायला लावायची. स्वत: लेकीच्या अंगावर हात टाकून झोपायची.
“रुबाब दाखवू नको. माझी बायकू… माझी बायकू! मी पोटातून काढली तवा तुझी झाली. ल्येक पह्यले छूट मायची मग जगाची!” ती जावयाला सुनवीत असे. धाकट्या लेकीची लेक लग्नाला आली तरी बाबुरावीण तरतरीत होती. तिच्या अंगात अनोखा उत्साह संचारला.
“ह्ये बघ, धाकटे, तुझी कालिंदी माज्या घरून उजवणार.” ती उल्हासाने म्हणाली. जावयाचं नाक चढलं. बायकोची आई माझ्या लेकीच्या लग्नात काय म्हणून नाक खुपसणार?
“ते काय चालायचं नाय. आमची लेक हितूनच उजवणार. आम्ही मुंबैकर… आमचा जावई, मुंबईकर. आम्ही काय म्हणून आडगावात जावं न् लगीन करावं?”
“पैशाला डरून राह्यला का रे तू?” म्हातारीनं खडा सवाल केला. आपली गोधडी उसवली आणि आतल्या नोटांची बंडलं जावयाच्या डोक्यावर ओतली.
“चोणगावची म्हातारी कंगाल नाय.” ती बडबडत होती.
“धाकटे, सांग तुझ्या घोवाला. मणभर भात आन् कांद्याची पात… सर्वे फुक्कट दिल मी. तुझं लगीन चोणगावात धूमधडाका करीत झालं तवा बाबुराव होते. पण बाबुरावीण एकटीच्या हिमतीवर पुन्ह्यांदा धूमधडाका करू शकते. सांग तुझ्या नटखट घोवाला.” ती हातवारे करीत म्हणाली.
“यवढी आई म्हणते तर करू या ना कालिंदीचं लग्न तिकडे.” धाकटी नवऱ्याला आग्रह करू लागली. म्हातारीनं बंडल गोळा केली नि ती परत गोधडीत भरू लागली तसा कालिंदीचा बाप म्हणाला, “दम जरा. बाबुरावीण… करूया लग्न चोणगावात.”
वस्ताद म्हातारीने परत भरलेली बंडल धाकटीच्या घोवाला दिली. कालिंदी खूश होती. गावी लग्न म्हणजे धमाका. मुंबईच्या दोन खणी घरात काय मौज येणार? खिडकीतनं दिसणारा आभाळाचा तुकडा नि डालडाच्या डब्यात लावलेली तुळस! या गिचडगर्दीपेक्षा बाबुरावीण गावी चौसोपी अंगणात धमाका करील.
वऱ्हाड गावी पोहोचलं. पोरगी बारकाशा गावी आली, तरी होती मुंबईची! लग्नासाठी ब्यूटिशिअन हवी म्हणून हटून बसली. कालिंदीची हौस पुरवायलाच हवी म्हणून बाप चिपळुणास गेला आणि घेऊन आला ब्यूटिशिअन ती पोरगी नवा वाण! बाबुरावीण धाडकन् पुढं झाली. हातात शिमटी.
“कोण गं तू?”
“मी? मी लीलाई तळेकर.”
“हिथं कशाला आली?”
“मी? अं… आयब्रो काढायला!”
“कुनाची? कालिंदीची?”
“तर हो!”
म्हातारीनं शिमटी उगारली. आब्रू काढती? आब्रू काढायला आली म्हणून टेचात सांगते… दोन दिवस नाय राह्यले लग्नाला! तिची आब्रू काढतीऽऽ…” सपकन् शिमटी बसली तशी लीलाई तळेकर रानभरी झाली. म्हातारी बडबडत होती नि कालिंदीचा बाप आ वासून बसला होता.