
- प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
आयुष्यात असे अनेक प्रसंग घडतात, जेव्हा आपण बोलणं टाळतो आणि मग आयुष्यभर पस्तावतो. तुमच्या बाबतीतही कधी असे घडलेय का की बोललो असतो, तर कदाचित काही वेगळे घडले असते? म्हणून माणसाने जिथे आवश्यक आहे, तिथे तरी बोलले पाहिजे.
खूप दिवस झाले म्हणजे साधारण दहा-बारा वर्षे उलटून गेलीत. तरी एक गोष्ट मला नेहमी अस्वस्थ करते. एकदा मी लोकल ट्रेनने प्रवास करत होते. दुपारची वेळ होती. ट्रेनमध्ये अजिबातच गर्दी नव्हती. लेडीज डब्यामध्ये साधारण दहा ते बारा बायका असाव्यात, इकडे तिकडे निवांत बसलेल्या. तेव्हा फार मोबाइलचे फॅड नव्हते. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आपल्या विचारात गढून गेलेल्या होत्या. कोणी खिडकीतून बाहेर बघत होत्या, तर दुपारची वेळ असल्यामुळे कोणी डुलक्याही खात होत्या. एका सीटवर मी एकटीच असल्यामुळे मध्यावर बसले होते. माझ्या समोरच्या सीटवर एक बाई बसलेली होती. इतक्यात एका स्टेशनवर एक विक्रेती बाई टिकल्यांच्या पाकिटांचे दोन बॉक्स घेऊन चढली. ती आत येताच या बाईंनी हात पुढे केल्यामुळे तिच्या मांडीवर तिने एक टिकल्यांच्या पाकिटाचा बॉक्स ठेवला आणि दुसरा बॉक्स घेऊन ती थोडीशी पुढे दुसऱ्या कुठच्या तरी बाईला देण्यासाठी निघून गेली. या बाईने त्याच्यात हात फिरवला आणि दोन-तीन पाकिटे हातात घेतली. मलाही बरे वाटले. दुपारची वेळ होती. गाडीत जास्त बायकाही नव्हत्या. मला वाटले, बिचारी गरीब बाई चढल्यासारखी तिला काहीतरी फायदा झाला. मी त्या समोर बसलेल्या बाईकडे पाहिले. तिने मान वळवून इकडे-तिकडे पाहिले आणि अगदी सहज ती तिन्ही पाकिटे आपल्या मांडीवर रुळणाऱ्या पदराखाली ठेवून दिली. ती विक्रेती बाई आली आणि तिने विचारले, “कुछ अच्छा लगा क्या?” ही म्हणाली, “नही.” त्या बाईने तो बॉक्स उचलला. दुसरा बॉक्स तिच्या हातातच होता. ती दोन्ही बॉक्स उचलून पुढच्या स्टेशनवर उतरून निघून गेली. या बाईने मांडीवरचा पदर किंचित वर गेला आणि ती तिन्ही पाकिटे उचलून पर्समध्ये टाकली. या घटनेची मी पूर्णपणे साक्षीदार होते.
त्या बाईने जेव्हा ही तीन पाकिटे तिच्या मांडीवर ठेवली आणि त्याच्यावर पदर सरकवला, तेव्हा मी ही घटना त्या विक्रेत्या बाईला का सांगितली नाही की तिच्या मांडीवर टिकल्यांची तीन पाकिटे आहेत म्हणून... जर मी हे सांगितले असते, तर त्या बाईने ती पाकिटे तिला परत केली असती. यामुळे त्या गरीब बाईचे कुठचेही नुकसान झाले नसते आणि या बाईला खूप व्यवस्थित धडा मिळाला असता. ट्रेनमध्ये ज्या काही दोन-चार बायका होत्या त्यांच्यासमोर तिची इज्जत गेली असती, तर पुढच्या वेळेस अशी कृती करायला ती धजावली नसती.
प्रसंग घडून गेलेला होता. माझ्या हातात आता काहीच नव्हते. मी त्या बाईकडे पाहात शांतपणे बसून राहिले. चांगल्या आर्थिक परिस्थितीची बाई असावी, हे तिच्या अंगावरच्या साडीवरून, तिच्या दागिन्यांवरून, तिच्या हातात असलेल्या पर्सवरून, तिच्या सँडेलवरून व्यवस्थित कळत होते. या घटनेमुळे माझे कोणतेही नुकसान झाले नव्हते आणि कोणताही फायदाही मला मिळाला नव्हता. पण तरीही आज दहा-बारा वर्षे झाली तरी हा प्रसंग माझ्या डोक्यातून काही केल्या जात नाही. हा प्रसंग जेव्हा जेव्हा आठवतो, तेव्हा मला स्वतःचा खूप राग येतो की, आपण बोलायला हवे होते. आयुष्यात असे अनेक प्रसंग घडतात, जेव्हा आपण बोलणं टाळतो आणि मग आयुष्यभर पस्तावतो. तुमच्या बाबतीतही कधी असे घडलेय का की बोललो असतो, तर कदाचित काही वेगळे घडले असते?
इथे हा प्रसंग लिहिताना मला हेही सांगायचे आहे की कधीकधी आपल्या मनात असलेले आपण समोरच्याला स्पष्ट बोलतो आणि तो माणूस कायमचा तुटतो. तरीही मला नेहमी वाटते की माणसाने बोलायला हवे! मी माझ्या घरात येणारी कामवाली असो, माझी आई असो वा माझी मुलगी असो... मी त्यांना स्पष्ट सांगते की मी काही ज्योतिषविद्या जाणत नाही की माइंड रीडर जादूगार नाही, त्यामुळे तुमच्या मनात काय चाललेय हे मला कळत नाही. मला तुम्ही स्पष्टपणे सांगा, माझ्याकडून काही काम करून घेणे तुम्हाला अपेक्षित आहे किंवा माझ्याकडून एखाद्या प्रकारचे वागणे तुम्हाला अपेक्षित आहे का? जे काही असेल ते स्पष्ट सांगा. मनात ठेवू नका. मी ते करेन वा ते करण्याची माझी कुवत, क्षमता, आवड, मूड आहे किंवा नाही हा परत वेगळा मुद्दा आहे. पण जर एखादी गोष्ट मी सहज करू शकत असेन, तर मी जरूर करेन. समोरच्यांच्या मनासारखे घडू शकेल. ‘मौन’ या विषयावर खूप बोलता येईल किंवा लिहिता येईल; परंतु मला असे वाटते की माणसाने जिथे आवश्यक आहे तिथे तरी बोलले पाहिजे. न बोलण्यापेक्षा बोलल्यामुळे मनाती अस्वस्थ करणाऱ्या भावनांचा निचरा तर होईलच; परंतु स्वतःचेच नाही तर समोरच्याचेही आयुष्य कदाचित सुलभ होऊन जाईल. चांगल्या प्रकारे बदलूनही जाईल!
pratibha.saraph@gmail.com