पुढील दोन दिवसांत वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता
शेतकरी हवालदिल! रब्बी हंगामातील पिके आणि फळबागांवर परिणाम
मुंबई/पुणे : मागील चार- पाच दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. महाराष्ट्रासह (Weather Update) अनेक राज्यात मुसळधार पाऊस (Unseasonal Rain) सुरू आहे. काही ठिकाणी तर गारपीट झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पाऊस अनेक ठिकाणी हजेरी लावत असतानाच राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. त्यातच काल आणि आज मुंबई, ठाण्यासह राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारपीट झाल्याने याचा परिणाम रब्बी पिके आणि फळबागांवर होणार आहे. अचानक होणाऱ्या या बदलांमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तपमानाकडे वाटचाल सुरु झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिके आणि फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. आणखी दोन दिवस अशीच परिस्थिती राहिल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain Alert) इशारा दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामान राहिल. पाऊसही होईल असा अंदाज आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यांत गारपीटीसह पावसाची शक्यता आहे. धुळे, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हा पाऊस अवकाळी असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जानेवारी महिन्यात दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर बरेच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र कालपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
या पावसामुळे वीज पुरवठाही वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अवकाळी पावसाने केलेल्या या नुकसानीची तत्काळ माहिती घ्यावी. पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी आता होत आहे. आणखीही काही दिवस पावसाची शक्यता असल्याने अडचणी वाढल्या आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी सायकांळनंतर किंवा मध्यरात्री, पहाटेच्या वेळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी शनिवारी वादळी पावसासह गारपीट होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या विभागात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली देखील असल्याचे समजते.