
गौतम गंभीरची जे. पी. नड्डा यांच्याकडे मागणी
नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू (Cricketer) आणि भाजपा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ते पूर्व दिल्लीतील भाजप खासदार असून आता २०२४ ची लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढणार नसल्याची त्यांनी घोषणा केली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच गौतम गंभीर यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. तशी विनंती त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे कळवले आहे.
गौतम गंभीर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी माननीय पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विनंती केली आहे की, मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करा जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद!, असं म्हणत त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
गौतम गंभीर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीच्या जागेवर दमदार विजय मिळाला होता. तर क्रिकेटमध्ये त्यांनी भारतासाठी ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. गौतम गंभीर २०११ च्या वनडे वर्ल्ड कप विजेत्या टीमचे भाग होते. याशिवाय ते २००७ च्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियन टीमचेही एक भाग होते. ते सध्या पुन्हा एकदा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहेत.