Saturday, July 13, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सCyber crime : विवाह संकेतस्थळाच्या माध्यमातून तरुणीला लाखोंचा गंडा

Cyber crime : विवाह संकेतस्थळाच्या माध्यमातून तरुणीला लाखोंचा गंडा

  • गोलमाल : महेश पांचाळ

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नातेवाइकांपासून नवी पिढी दुरावल्याची स्थिती समाजात पाहायला मिळते. त्यामुळे, विवाहासाठी आता तरुणाईही वधूवर सूचक मंडळ, विवाह संकेत स्थळांना प्राधान्य देताना दिसतात. विवाहासाठी अनुरूप उपवर मुलगा शोधण्यासाठी संकेतस्थळावर अनेक मुलींचे पालक आणि उपवर मुली नावनोंदणी करतात. अशाच संकेतस्थळावर निवडलेली काही मुले बतावणी करीत लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहेत. तसाच एक प्रकार ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी आरोपीचा शोध घेत उघडकीस आणला आहे.

चांगल्या पगाराची नोकरी करणाऱ्या एका तरुणीने लग्नासाठी विवाह संस्थेच्या एका संकेतस्थळावर अलीकडेच नाव नोंदवले होते. मुलांची स्थळ शोधताना भास्कर शिर्के हा पुण्यातील मुलगा तिने निवडला. एमबीए झालेल्या भास्करने आपली ट्रेडिंग कंपनी आणि बांधकाम व्यवसाय असल्याचाही दावा संकेतस्थळावर दिलेल्या माहितीतून केला होता. बोलताना चांगली छाप पाडणाऱ्या भास्करने या मुलीला चांगलेच भुलवले. रोज तो तिच्याशी मोबाइलवरून संपर्कात राहत असे. या संभाषणातूनच त्याने व्यवसायासाठी ४० हजारांची रक्कम मुलीकडे मागितली. आपला विवाह त्याच्याशीच होणार असल्याने विश्वासाने तिने त्याला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केले. जानेवारी महिन्यात ओळख झाल्यानंतर त्याने तिच्याकडून वेगवेगळी कारणे सांगत त्याने तिच्याकडे पाच हजारांपासून ते ५० हजारांपर्यंतची रक्कम मागितली. तिनेही तो आपल्या भावी जीवनसाथी होणार असल्याने त्याला आतापर्यंत तब्बल ११ लाख रुपये दिले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने या प्रकरणी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी ठाणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याचे सर्व बँक डिटेल, त्याचबरोबर मोबाइल लोकेशन तपासून मोठ्या कौशल्याने त्याला पोलीस उपनिरीक्षक ज्योतीराम भोसले यांच्या पथकाने नांदेडमधून २७ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. मौजमजेसाठी हे सर्व पैसे उधळल्याची कबुली त्याने पोलीस चौकशीत दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आले. या आधीसुद्धा आणखी काही तरुणींना त्याने अशा पद्धतीने गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे मुलींची फसवणूक करणाऱ्यांची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. विवाह संकेतस्थळावर उच्चशिक्षित, व्यावसायिक मुलगा शोधणाऱ्यांनी थोडी सावधानता बाळगण्याची गरज आहे, असे या प्रकरणावरून दिसते. स्वत:च्या चैनीसाठी मुलींना संकेतस्थळावर हेरून, लाखो रुपयांची लुबाडणूक करणारा मूळचा पुण्यातील भास्कर शिर्के हा २५ वर्षीय भामटा सध्या पोलीस कोठडीत असला तरी, असे आणखी भामटे समाजात उजळमाथ्याने वावरत असल्याची बाब नाकारता येत नाही.

तात्पर्य : विवाह संकेतस्थळावर नाव नोंदवताना मुलगा किंवा मुलीची संपूर्ण माहिती घेऊन पुढील प्रक्रिया करावी. भूलथापांना बळी न पडता, मुला-मुलींची कौटुंबिक माहिती, पार्श्वभूमी याची सखोल माहिती मिळाल्यानंतर स्वत: किंवा नातेवाईक मित्रपरिवाराच्या मार्फतने समक्ष भेट घेणेही आवश्यक आहे.

maheshom108@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -