भारतीय नद्यांना देवता मानून पूजा करण्याची पद्धत एकीकडे पाहायला मिळत असताना दुसरीकडे नद्यांमध्ये स्नान करून पवित्र होण्याची भावना असते; परंतु केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ताजा अहवाल तमाम भारतीय आणि शासकांच्या डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालणारा आहे. देशातल्या काही नद्या विषारी झाल्या असून त्यांचे पाणी अंगावर घेणे किंवा त्यांच्यात स्नान करणे जीवघेणे ठरू शकते, असे हा अहवालच सांगतो.
बिहारमध्ये गंगा नदीसह २२ नद्या इतक्या घाण झाल्या आहेत की त्यातील पाण्यामध्ये आंघोळ करणे धोकादायक झाले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वार्षिक अहवालात ही बाब समोर आली. या कालावधीत विविध ठिकाणी पाण्याची चाचणी करून सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. गंगेसह अनेक नद्यांना सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. त्यांना जीवनदायिनीदेखील म्हणतात; परंतु त्यांचे पाणी पिण्यास योग्य नाही. बिहारमधील २२ नद्या जीवनदात्यांऐवजी रोगांचे मुख्य स्त्रोत बनत आहेत. बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२३-२४ च्या वर्षाच्या वार्षिक अहवालात हा गौप्यस्फोट केला आहे. अहवालानुसार, गंगेसहित सर्व उपनद्यांच्या पाण्यामध्ये सांडपाणी आणि मलमूत्रात धोकादायक जीवाणू सापडले आहेत. या सर्व नद्यांचे पाणी आता आंघोळीसाठी योग्य राहिलेले नाही. बिहारच्या २७ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या नद्यांच्या पाण्याची ९८ ठिकाणांहून गुणवत्तेसाठी चाचणी करण्यात आली. धोकादायक जीवाणुंमुळे फेकल कॉलीफॉर्म आणि टोटल कोलिफॉर्मची मानके कोलमडल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की नदीचे पाणी प्रदूषित होण्याचे मुख्य कारण म्हणजे नद्यांच्या काठावर राहणाऱ्या लोकांच्या घरातील कचरा आणि मूत्र प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडले जाते. ‘नमामि गंगे’ प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेले पाटण्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे एकूण सहा प्रकल्प बंद आहेत आणि त्याच्या नेटवर्कवर काम सुरू आहे. त्यामुळे पाटणा शहरातील बहुतांश सांडपाणी प्रक्रिया न करताच गंगेत सोडले आहे.
मानकांनुसार, गंगेच्या पाण्यात जीवाणूंची संख्या पाचशे असेल, तर पाण्यात स्नान करता येते. जीवाणूंची संख्या पाच हजारांपेक्षा जास्त असेल तर ते पाणी शुद्धीकरण करूनही उपयोग होत नाही. बिहार राज्याची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या नद्यांचा राज्यातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येवर परिणाम होत आहे. जाणूनबुजून किंवा नकळत लोक श्रद्धेच्या नावाखाली नदीचे पाणी वापरत असले, तरी त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, गंगा आणि तिच्या सर्व उपनद्यांच्या पाण्यात सांडपाणी आणि मलमूत्रात धोकादायक जीवाणू सापडले आहेत. या सर्व नद्यांचे पाणी आता आंघोळीसाठी योग्य राहिलेले नाही. नद्यांच्या पाण्याने २३ मानके ओलांडली आहेत. नदीच्या पाण्यात आढळणाऱ्या जीवांच्या विष्ठेमध्ये आणि लघवीमध्ये (स्युएज) जीवाणूंच्या संख्येला विष्ठा कोलिफॉर्म म्हणतात. हा जीवाणू मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो. फेकल कोलिफॉर्म व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या जीवाणूंच्या संख्येला टोटल कॉलिफॉर्म म्हणतात. पाटणा शहरात बांधण्यात येत असलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची (एसटीपी) एकूण क्षमता ३५० लाख लिटर प्रति दिन आहे. सर्व एसटीपी पूर्ण क्षमतेने चालत नाहीत, तोपर्यंत गंगाजल मानवी आरोग्यासाठी स्वच्छ होऊ शकत नाही.
गंगा, सोन, पुनपुन, गंडक, बुढी गंडक, घाघरा, बागमती, कोसी, सिकरहना, महानंदा, रामरेखा, हरबोरा, धौन्स, परमार, मनुसममर, लखंडेई, दाहा, कोहरा, सिरसिया, कमला, गंगी, हरहा या नद्या प्रदूषित आहेत. बिहारमध्ये गंगा नदीचा एकूण प्रवाह ४४५ किलोमीटर आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकूण ३५ ठिकाणी गंगाजलाची शुद्धता तपासली. बक्सर ते सुलतानगंजपर्यंत गंगेच्या काठावर वसलेल्या शहरांमध्ये जलप्रदूषणाने गंभीर पातळी गाठली आहे. पाटणा येथील गांधी घाट येथे विष्ठेतील कोलिफॉर्म बॅक्टेरिया प्रमाणापेक्षा ३६ पट अधिक आढळले. सिरसिया ही बिहारमधील सर्वात प्रदूषित नदी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीरगंज चेकपोस्ट आणि मंदिराजवळील कोईरिया टोला येथून नमुने घेतले. तेव्हा फेकल कोलिफॉर्म जीवाणूंची संख्या दोन लाख ४० हजार असल्याचे आढळून आले. नागरी कचरा प्रक्रिया न करता थेट या नदीत टाकला जात आहे. आताही गंगेमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी मोठ्या प्रमाणावर थेट सोडले जात आहे. जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री विश्वेश्वर तुडू यांनी संसदेत सांगितले की ‘नमामि गंगे’ कार्यक्रमामुळे गंगेतील प्रदूषणाचा भार कमी झाला आहे. २०१४ पासून केंद्राने गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी ३२ हजार ९१२ कोटी रुपयांचे ४०९ प्रकल्प उभे केले आहेत.
जानेवारी २०२३ मध्ये गंगा नदीच्या पाण्याच्या नमुन्यांच्या चाचणीच्या डेटाचे विश्लेषण केले तेव्हा ७१ टक्के मॉनिटरिंग स्टेशनवर मल कोलिफॉर्मची स्थिती चिंताजनक असल्याचे आढळले. फेकल कोलिफॉर्म हा जीवाणूंचा समूह उबदार रक्ताच्या प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आणि विष्ठेमध्ये आढळतो. पाण्याच्या नमुन्यांमध्ये त्याची उपस्थिती सूचित करते की हे पाणी मानवी किंवा इतर प्राण्यांच्या विष्ठेने दूषित आहे. हे संक्रमण प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याद्वारे नद्यांपर्यंत पोहोचते. येथील प्रदूषणाचा आकडा आणखी मोठा असू शकतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जानेवारी २०२३ मध्ये एकूण ९७ निरीक्षण केंद्रांपैकी केवळ ५९ स्थानकांवरून (६१ टक्के) चाचणी नमुने घेतले होते. या चाचणीचा डेटा दर्शवतो की, उत्तराखंडच्या सर्व बारा स्थानकांवर विष्ठा कोलिफॉर्म त्याच्या विहित मानक मर्यादेत आहे तर उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. झारखंडमधून एकही नमुना गोळा केला गेला नाही. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सर्व ३७ स्थानकांवर मल कोलिफॉर्मचे प्रमाण सामान्य ते खूप जास्त आढळले. उत्तर प्रदेशमधील दहापैकी पाच मॉनिटरिंग स्टेशनवर उच्च स्तरावरील मल कोलिफॉर्म आढळून आले. ४२ प्रदूषित स्थानकांपैकी ३४ अशी आहेत, जिथे मल कोलिफॉर्मची संख्या प्रति शंभर मिलिलीटरमध्ये ११ हजार एमपीएनपेक्षा जास्त आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…